भेंडी पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन

भेंडी पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन

 

डॉ. साबळे पी. ., सहायक प्राध्यापक (उद्यानविद्या विभाग) के.व्ही.के., सरदारकृषीनगर दांतीवाडा कृषिविद्यापीठ, साबरकांठा, गुजरात आणि डॉ. सुषमा साबळे, आचार्य पदवी (कृषिविदया विभाग) महात्मा फुले कृषिविद्यापीठ, राहुरी, महाराष्ट्र.

संपर्क ८४०८०३५७७२

krushi kranti : भेंडी खरीप (kharif) आणि उन्हाळी हंगामातील एक महत्वाचे पीक आहे. भेंडी पिकासाठी (okra crop) योग्य वेळी योग्य मात्रा मध्ये खत देणे आवश्यक असते. खत व्यवस्थापन माती परीक्षण अहवालानुसार बदलू शकते. नत्र विभागून दोन ते तीन हप्त्यात दिले असता त्याचा चांगला फायदा होतो. पिकासाठी लोह, जस्त, मँगेनीज, बोरॉन इ. सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज भासते त्यानुसार खत व्यवस्थापन (Fertilizer management) करावे.
खरीप  भेंडी लागवड (Kharif okra cultivation) साधारणतः जून ते जुलै मध्ये केली जाते. एक हेक्टर साठी साधारणतः १२-१५ किलो बियाणे पुरेशी ठरते. जिवाणू खते वापरल्यास पीक उत्पादनात ७-१० % वाढ झाल्याचे आढळून आले आहे. जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढते. बियाण्याला अझाटोबँक्टर आणि पी.एस.बी. जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करावी व बियाणे सावलीत ठेवावे.

प्रति किलो बियाणे प्रक्रियेसाठी २५ ग्रा. जिवाणू संवर्धक वापरावे. प्रक्रिया केल्यानंतर बियाणे २४ तासांच्या आत पेरावे. रासायनिक खत किंवा रासायनिक घटकांबरोबर जिवाणूसंवर्धक मिसळू नये तसेच जैविक बियाणे प्रक्रिया नंतर रासायनिक बीज प्रक्रिया करू नये. भेंडी लागवड साधारणतः ३० x १५ से.मी. अंतरावर करतात.

संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन करून महिला शेतकरी कृषिकन्या शुभांगी टेकने यांनी घेतले भेंडीचे अधिक उत्पादन

अन्नद्रव्य व्यवस्थापन

माती परीक्षणानुसार शिफारशीत मात्रेत योग्य वेळी खत देणे महत्वाचे ठरते. माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेप्रमाणे वर्गीकरण करावे व त्यानुसार खतांची मात्रा द्यावी. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य (किलो/ हे.) प्रमाण मध्यम असेल तर शिफारशीत खतमात्रा द्यावी. उपलब्ध अन्नद्रव्य प्रमाण अत्यंत कमी तर शिफारशीत खत मात्रेपेक्षा ५० % जास्त खतमात्रा द्यावी आणि जर प्रमाण कमी असेल तर शिफारशीत खतमात्रेपेक्षा २५ % जास्त खतमात्रा द्यावी.
याशिवाय जर जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य (किलो/ हे.) प्रमाण जास्त असेल तर शिफारशीत खतमात्रेपेक्षा २५ % खतमात्रा कमी द्यावी आणि जर प्रमाण अत्यंत जास्त असेल तर शिफारशीत खतमात्रेपेक्षा ५० % कमी खतमात्रा द्यावी. अधिक उत्पादनासाठी हेक्टरी २०-२५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा १०-१५ टन गांडूळ खत + ५ किलो ट्रायकोडर्मा द्यावे. जमिनीत निसर्गतः अनेक प्रकारचे जिवाणू व अक्टिनोमायसीट्स असतात त्यापैकी काही अद्राव्य स्वरूपात स्थिर झालेले स्फुरद विरघळून ते पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम करतात. पिकांसाठी आवश्यक असलेले वाढवर्धक द्रव्ये तयार करण्याचे कार्य देखील हे सूक्ष्मजीव करत असतात. प्रयोगशाळेत कृत्रिम पद्धतीने
पी.एस.बी. जिवाणू वर्धके (जिवाणू खत) तसेच नत्र स्थिर करणारे जिवाणू खत तयार केले जाते. यांची एकत्रित मिसळून बियाण्यास प्रक्रिया करता येते तसेच सेंद्रिय खतातून किंवा ठिबक सिंचन मधून देखील जमिनीतून देता येते. लागवडीपूर्वी हेक्टरी ट्रायकोडर्मा ५ किलो, अझोटोबॅक्टर २.५ किलो आणि पी.एस.बी. २.५ किलो शेणखतातून मातीत मिसळून देऊ शकतो. जैविक घटक हे रासायनिक घटकांबरोबर देऊ नये.
जर ट्रायकोडर्मा, अझोटोबॅक्टर आणि पी.एस.बी. द्रव स्वरूपात असतील तर ठिबक संचाद्वारे देखील देऊ शकतो (साधारणतः पायाभूत रासायनिक खताच्या मात्रेनंतर १० दिवसांनी). कंपोस्ट खत देताना ब्युवेरिया बेसियाना आणि मेटारिझियम अॅनिसोप्लिया ही जैविक नियंत्रक हेक्टरी ५ लिटर/किलो देऊ शकतो किंवा ठिबक किंवा आळवणी (ड्रेंचिंग) द्वारे देखील देऊ शकतो. हेक्टरी २५० किलो निंबोळी पेंड देखील मातीत मिसळून देऊ शकतो. माती परिक्षणानुसार भेंडी पिकासाठी अन्नद्रव्याची (खत) मात्रा द्यावी.
नत्र १०० किलो (युरिया २१७ किलो), स्फुरद ५० किलो (सिंगल सुपर फोस्फट ३१३ किलो) आणि पालाश ५० किलो (म्युरेट ऑफ पोटॅश ८३ किलो) प्रति हेक्टर द्यावे. अर्धे नत्र (५० किलोयुरिया १०९ किलो), पूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडी वेळी द्यावे. उर्वरित नत्र (५० किलोयुरिया १०९ किलो) लागवडी नंतर १,.५ आणि महिन्याने तीन समान हप्त्याने विभागून द्यावे. खते देण्यापूर्वी माती परीक्षण करून त्याप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याने खताची मात्रा द्यावी.
भेंडी पिकाच्या उत्कृष्ठ वाढ आणि विकासासाठी सूक्ष्म सूक्ष्मअन्नद्रव्ये कमी प्रमाणात आवश्यक असतात परंतु त्यांच्या कमतरतेमुळे वनस्पती शरीर व चयापचय प्रक्रियेत बदल होऊ शकतो आणि शेवटी उत्पादन व गुणवत्ता कमी होते. भेंडी पिकास लोह, जस्त, मँगेनीज, बोरॉन . सुक्ष्म अन्नद्रव्याची गरज भासते. माती परीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असणाऱ्या जमिनीत फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट प्रत्येकी २० किलो आणि बोरॅक्स ५ किलो प्रति हेक्टरी लागवडीच्या वेळी जमिनीतून द्यावे.
जर जमिनीतून सदर पोषणतत्त्वे देणे शक्य झाले नसेल तर सूक्ष्म अन्नद्रव्ये कमतरतेच्या लक्षणानुसार झिंक सल्फेट ०.५ %,  फेरस सल्फेट ०.५ %, मँगेनीस सल्फेट ०.५ % आणि बोरिक ऑसीड ०.२ % किंवा बोरॅक्स ०.५ % लागवडीनंतर १ आणि १.५ महिन्याने फवारणी करावी. किंवा पीक लागवडीनंतर
१ आणि १.५ महिन्याने सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रण ग्रेड-४ (लोह ४ %, जस्त ६ % मँगेनीस १ % तांबे ०.५ % बोरॉन ०.५ %) २ ग्रा./लि. पाणी या प्रमाणात देखील फवारणी करू शकतो.
घटकांचे वेगवेगळे प्रमाण असलेले सूक्ष्मअन्नद्रव्यांचे विविध मिश्रणे उपलब्ध असल्यामुळे घटकांच्या प्रमाणानुसार शिफारशीप्रमाणे सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या विविध प्रमाणातील मिश्रणांची फवारणी करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पाण्यात विरघळणाऱ्या पोषण तत्वांची जर शिफारशीत मात्रापेक्षा जास्त मात्रा फवारली गेली तर पिकांच्या पानांवर स्कॉर्चिंग येते असे दिसून आले आहे.

भेंडी लागवडीनंतर ३०, ४५ आणि ६० दिवसांनी ०.५ % १९:१९:१९ फवारणी केल्यास अधिक उत्पादनात मिळते. पाण्यात विरघळणाऱ्या पोषण तत्वांची फवारणी करताना शिफारशीत प्रमाणात स्टिकर चा वापर करावा. फळ तोडणीप्रमाणे १९:१९:१९ देण्याची वेळा वाढवत गेल्यास उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

सूक्ष्मअन्नद्रव्ये व १९:१९:१९ फवारणी न केलेले भेंडी प्रक्षेत्र (लागवडीनंतर ४५ दिवसांनी)

सूक्ष्मअन्नद्रव्ये ग्रेड-४ (०.२ %) +१९:१९:१९ (०.५ %) फवारणी (लागवडीनंतर ३०,४५ दिवसांनी)

 

शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारणीमुळे भेंडी पानांवर स्कॉर्चिंग

Leave a Comment