BBF Perni Yantra : शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे का? साध्या पेरणी यंत्राने बीबीएफ पेरणी करता येते..! वाचा सविस्तर?

BBF Perni Yantra : शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे का? साध्या पेरणी यंत्राने बीबीएफ पेरणी करता येते..! वाचा सविस्तर?

 

सगशेती शास्त्रज्ञ आणि प्रयोगशील शेतकरी बीबीएफ यंत्राने पेरणी करण्याचा सल्ला देतात. पण अनेक शेतकऱ्यांना या यंत्राविषयी माहिती नाही. तर बऱ्याच जणांकडे हे यंत्र उपलब्ध नाही. बीबीएफ पेरणी यंत्र म्हणजे रूंद वरंबा सरी पेरणी यंत्र. अनेक शेतकऱ्यांचा असा प्र्श्न आहे की, बीबीएफ यंत्र उपलब्ध नसले तर काय करायचे? अशा वेळी साध्या पेरणी यंत्राचाही कल्पक वापर करता येऊ शकतो. साध्या पेरणी यंत्राचे योग्य ते फण बंद करुन बीबीएफ यंत्राप्रमाणे गादीवाफे व मृतसरी तयार करून पेरणी करता येते. त्यामुळे पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरवणे, तसेच अधिक पावसामध्ये अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षितपणे निचरा करणे शक्य होते. अतिवृष्टी किंवा कोरडा दुष्काळ यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठी घट होते. त्यासाठी रुंद वरंबा सरी यंत्राद्वारे बियाण्यांची पेरणी केली तर ते फायद्याची ठरते.

बीबीएफ म्हणजे नेमके काय?

रुंद वरंबा सरी पेरणी यंत्र म्हणजेच ब्रॉड बेड फरो यंत्र हे ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्र आहे. रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी केली जातात. यामध्ये दोन फाळ आणि पेरणीचे फण यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते. सऱ्यांची रुंदीही कमी जास्त करता येते.

बीबीएफ पेरणी यंत्राचे प्रकार..!

 • हैद्राबाद येथील केंद्रिय कोरडवाहू कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेले चार फणी बीबीएफ पेरणी यंत्र.
 • परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले पाच फणी बीबीएफ पेरणी यंत्र. या यंत्रामध्ये बियाणे, खत पेरणीसह फवारणी आणि रास करता येते.
 • ट्रॅक्टरचलित बीबीएफ पेरणी यंत्राच्या साहाय्याने सोयाबीन, मका, हरभरा, तूर, भुईमूग, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, कापूस इ. पिकांची टोकण पद्धतीने वरंब्यावर पेरणी करता येते. प्रत्येक पिकांकरिता वेगवेगळ्या बीजाच्या चकत्या असून, त्या सहजपणे बदलता येतात.

बीबीएफ यंत्र उपलब्ध नसेल तर..!

 1. समजा आपल्याकडे बीबीएफ यंत्र उपलब्ध नसेल तर साध्या ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राचे कोणतेही फण बंद करुन बीबीएफ यंत्राप्रमाणे पेरणी करता येते.
 2. साध्या ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राला बियाणे पेटी, खत पेटी आणि बियाणे सोडण्यासाठी तबकड्या जोडलेल्या असतात. या यंत्राच्या दोन्ही बाजूला संरी यंत्र म्हणजे रिजर जोडावे. पेरणी करताना सरी यंत्राने केलेल्या बाजूच्या सरी जास्त खोल होणार नाही याची काळजी घ्यावी. सरी यंत्र जोडणे शक्य नसेल तर तीन, चार किंवा पाच ओळीनंतर एक ओळ मोकळी सोडावी. या सोडलेल्या ओळीलाच मृत सरी म्हणतात.
 3. साधे ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र हे ३, ४, ५ किवा ७ फणाचे असते. समजा पाच फणी पेरणी यंत्र असेल तर आणि चार ओळीनंतर एक मृत सर काढायची असेल तर तीसरा फण बंद करावा. जर तीन फणी म्हणजे तीफण पेरणी यंत्र असेल आणि दोन ओळीनंतर मृत सर काढायची असेल तर मधला फण बंद करून पेरणी करावी. म्हणजे दोन ओळीनंतर मृत सरीसाठी जागा सुटेल. अशा प्रकारे कोणतेही पेरणी यंत्र असले तरी योग्य तो फण बंद करुन हव्या तेवढ्या ओळीनंतर मृत सरीसाठी जागा सोडता येते.

हे पण वाचा :- राज्यात ३ ते ४ दिवस मुसळधार पाऊस, अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज..!

मृत सरीचे फायदे..!

 1. वरंब्यावर ओलावा टिकवून ठेवला जातो. त्यामुळे पावसाच्या खंडाच्या काळात पिकाला पाण्याचा ताण बसत नाही.
 2. जास्त पाऊस झाल्यास मृत सरीमधून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास मदत होते.
 3. पिकाला मुबलक हवा, सूर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होते.
 4. उभ्या पिकामध्‍ये आंतरमशागत, फवारणी करणे सोपे जाते.
 5. जमिनीची सच्‍छिद्रता वाढून जमीन भुसभुशीत होते. परिणामी पिकाची वाढ उत्‍तम होते.

मृत सर काढताना हे लक्षात घ्या..!

 • मातीचा प्रकार, जमिनीचा उतार, पावसाचे प्रमाण, पेरणीतील अंतर या गोष्टी लक्षात घेऊनच किती ओळीनंतर मृत सर काढायची हे ठरवावे.
 • पेरणी नंतर साधाणतः १५ ते २१ दिवसांनी मृत सर बळीराम नांगराने किंना डवऱ्याने काळजीपुर्वक पिकाला धक्का न लागू देता खोल करुन घ्यावी.
 • मृत सरीतून निचरा होणारे पाणी वाहून जाण्यासाठी शेताच्या बाजूला चर काढावा.

source :- Agrowon