Big hike in the price of Tur : तुरीच्या दरात मोठी वाढ

Big hike in the price of Tur : तुरीच्या दरात मोठी वाढ

 

सध्या तुरीचे दर वाढले आहेत. सरकारने मोठ्या प्रमाणात तुरीची आयात केल्याने दर दबावात होते. मात्र मागील महिनाभरात तुरीच्या दरात जवळपास एक हजार रुपयांची सुधारणा झाली. सध्या बाजारात तुरीला ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपये सरासरी दर मिळत आहे. तर सणांच्या काळात तुरीची मागणी वाढेल. त्यामुळं दर टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

तर देशात आतापर्यंत तुरीची लागवड ३६ लाख ११ हजार हेक्टरवर झाली. मागील वर्षी याच काळातील लागवड ४१ लाख ७५ हजार हेक्टरवर होती. म्हणजेच यंदा १३.५१ टक्क्याने तूर लागवड कमी झाली.

तुरीचे भाव वाढण्यामागे कमी लागवड हे सुद्धा एक कारण आहे. देशात तुरीची जास्त उत्पादकता आणि चांगली गुणवत्ता यासाठी तेलंगणा राज्याचा नावलौकिक आहे. परंतु तिथे यंदा तूर लागवड ४५ टक्क्यांनी घटली आहे. तसेच महाराष्ट्रात ११ टक्के आणि कर्नाटकात १० टक्के तूर लागवड कमी झाली आहे.

दुसरं महत्वाचं कारण म्हणजे हमीभाव (MSP). सरकारनं यंदा तुरीला प्रति क्विंटल ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला. तर मुगाचा हमीभाव ७ हजार ७५५ रुपयांपर्यंत नेला. मागील हंगामात बाजारात तुरीच्या तुलनेत मूग आणि इतर कडधान्याचे दर चांगले होते.

तर यंदा तुरीपेक्षा मूग आणि इतर कडधान्यांच्या हमीभावातील वाढ अधिक आहे. त्यामुळे खरिपात तुरीची लागवड कमी होऊन, शेतकऱ्यांनी मुगाला पसंती दिल्याचं जाणकारांनी सांगितलं. आतापर्यंत देशात मुगाची लागवड गेल्या वर्षीपेक्षा १६ टक्क्यांनी वाढलीय.

तुरीच्या दरात सुधारणा होण्याचं तिसरं कारण म्हणजे पिकाचं नुकसान. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांत एका बाजूला तूर लागवड घटलीय. तर दुसरीकडे सततच्या पावसामुळं पिकाचं नुकसानही (Crop Damage) झालं. तूर उत्पादनात महत्वाच्या या तीनही राज्यांमध्ये जुलै महिन्यात सतत पाऊस झाला. त्यामुळं पिकाला फटका बसला. प्राथमिक अंदाजानुसार देशात तुरीचं २० टक्क्यांपर्यंत नुकसान झालं.

हे पण वाचा:- Punjab Dakh Havaman Andaj : 8 ऑगस्ट पर्यंतचा पंजाब डख यांचा मान्सून हवामान अंदाज आला..! कुठं-कुठं कोसळणार पाऊस

सध्या देशात म्यानमार येथील लेमन तुरीची आयात होत आहे. मात्र या तुरीचे दर अधिक असतात. सध्या म्यानमारची लेमन तूर ७ हजार ३५० रुपये प्रतिक्विंटलने आयात होत आहे. त्यामुळे देशातील दरही या पातळीवर पोचले. सध्या बाजारात तुरीला ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपये सरासरी दर मिळत आहे. पुढील तीन महिने सणासुदीचे दिवस असल्याने तुरीची मागणी वाढेल. त्यामुळे दरही टिकून राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.

हे पण वाचा:- Agricultural Pumps : शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी, पंप संच घेण्यासाठी मिळणार २० हजार रुपये, असा घ्या लाभ..

सरकारने यंदा केवळ ३५ हजार टनांच्या दरम्यान तूर हमीभावाने खरेदी केली. त्यामुळं सध्या सरकारकडे ५० हजार टन बफर स्टाॅक असण्याची शक्यता आहे. तर देशात ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे सणांचे महिने असतात. त्यामुळे या काळात तुरीच्या डाळीलाही मागणी असते. परंतु देशात स्टाॅक कमी असल्यानं तूर दरातील तेजी कायम राहू शकते.

– दिनेश सोमाणी, शेतीमाल बाजार विश्लेषक

source:- ऍग्रोवोन