Cotton Rate : कापसाची अवाक कमी होऊनही मार्केट मध्ये कापसाचीच चर्चा!

Cotton Rate : कापसाची अवाक कमी होऊनही मार्केट मध्ये कापसाचीच चर्चा!

 
शेतीमालाच्या दरात चढ-उतार हे ठरलेलेच असतात. शिवाय आवकवरुन याचे दर ठरतात. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून ते आता अंतिम टप्यात कापूस पिकाने महत्व टिकवून ठेवले आहे. यामध्ये शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची राहिली असून संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांनी मागणीपेक्षा केव्हाच अधिकची आवक केली नाही. त्यामुळे दर टिकून होते.
शिवाय रशिया आणि युक्रेन युध्दाचा परिणाम  कापसाच्या दरावर होणार असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले होते. पण स्थानिक पातळीवर आजही कापूस 10 हजाराच्या पार आहे. मराठवाड्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या परभणी बाजारपेठेत 10 हजार 550 ते 10 हजार 600 पर्यंतचा दर टिकून आहे. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाचीही विक्री केली आहे. आता हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी अनेकांनी फरदडचे उत्पादन हे घेतलेले आहेच.

यंदाच्या हंगामात विक्रमी दर

खरीप हंगामातील कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. पण या पदरी पडलेल्या या पांढऱ्या कापसाचे सोनं करण्याचा निर्धारच जणू काही शेतकऱ्यांनी केला होता असेच चित्र हंगामाच्या सुरवातीपासून अंतिम टप्प्यापर्यंत कायम राहिलेले आहे. अपेक्षेप्रमाणे दर असेल तरच विक्री अन्यथा साठवणूक. त्यामुळेच गेल्या 50 वर्षात जो दर विदर्भात मिळाला नव्हता त्या दरात व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात येऊन खरेदी करीत होता. उत्पादन घटले तरी वाढीव दरातून झालेला खर्च काढण्याचा शेतकऱ्या्ंनी सर्वकश प्रयत्न केला आहे. आता अंतिम टप्प्यातही 10 हजारापेक्षा अधिकचा दर हा कायम आहे.

कापसाच्या आवकमध्ये घट

वाढत्या मागणीमुळे यंदा प्रथमच व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या दारात जाऊन कापसाची खरेदी केली आहे. शिवाय जागोजागी खरेदी केंद्रही उभारले गेले होते. आता हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळेच परभणीसारख्या मुख्य बाजारपेठेतही दिवसाकाठी 400 क्विंटल कापसाची आवक सुरु आहे. शिवाय साठवणूकीतल्या कापसाचीही शेतकऱ्यांनी विक्री केलेली आहे. सध्या कमाल दरात वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

आता फरदडच्या उत्पादनावर लक्ष

मुख्य कापूस हंगाम संपला तरी फरदडच्या माध्यमातून कापसाचे उत्पादन घेण्याची शेतकऱ्यांची परंपरा आहे. हे जरी नुकसानीचे असले तरी शेतकरी उत्पादन घेतातच. यातच यंदा विक्रमी दर मिळत आहे शिवाय शेतकऱ्यांकडे पाणीसाठाही उपलब्ध आहे. त्यामुळे पाणी देऊन पुन्हा कापसाचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. दर टिकून राहणार असल्यानेच शेतकरी हे धाडस करीत आहेत.
source:- tv9 marathi

Leave a Comment