E Pik Pahani : ई-पीक पाहणी ॲपवर ९० लाख शेतकऱ्यांची नोंदणी

E Pik Pahani : ई-पीक पाहणी ॲपवर ९० लाख शेतकऱ्यांची नोंदणी

 

महाराष्ट्रात सुरू असलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी केली असून ७० लाखांहून अधिक शेतकऱ्यांची सात-बारावरील ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण झाली आहे. या ‘ई-पीक-पाहणी प्रकल्पात गेल्या वर्षभरातील विविध हंगामांमध्ये सुमारे ८२६ पिकांची नोंदणी करण्यात आली आहे.

वर्षा फडके-आंधळे

सामान्यतः शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याची नोंद ही तलाठ्यांमार्फत केली जाते. बहुतांश वेळा प्रत्यक्ष गट क्रमांकात न जाता शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीकपेरा नोंदवला जात असे. मात्र नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे नुकसानभरपाई देण्याची वेळ उद्भवल्यास शेतकरी व अधिकाऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होई. शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाची अचूक नोंद शासनाच्या अभिलेख्यांमध्ये व्हावी आणि त्याचा शेतकऱ्यांनाही संकटकाळात नुकसानभरपाईसाठी लाभ व्हावा या हेतूने ‘ई-पीक पाहणी’चा प्रकल्प राज्यात राबविण्यात येत आहे.

१५ ऑगस्ट २०२१ पासून राज्य शासनाच्या महसूल आणि कृषी विभागांनी संयुक्तरीत्या राज्यात ‘ई- पीक पाहणी’ या व्यापक प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली. आजवर त्यात ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई- पीक नोंदणी केली असून, ७० लाखांहून अधिक शेतकऱ्यांची सातबारावरील ई-पीक नोंदणी पूर्ण केली आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात ३८० पिकांची तर रब्बी हंगामात २६३ पिकांची आणि उन्हाळी हंगामात १८३ अशा एकूण ८२६ पिकांची नोंद केली गेली. त्यानुसार गेल्या वर्षात सोयाबीन पिकाखाली २५ लाख ८८ हजार ४१३ हेक्टर, तर हरभरा पिकाखाली ९ लाख ९१ हजार ९६४ हेक्टर क्षेत्र आहे. १ लाख ९१ हजार ३३८ हेक्टरवर भात पीक घेतले गेले.

जमीन महसूल कायद्यानुसार शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. दोन तीन गावांत एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नसल्याचा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप असे. मात्र महसूल विभागाने आपल्या पिकाची रिअल टाइम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध केली आहे. त्यासाठी टाटा ट्रस्टच्या साह्याने ‘ई-पीक पाहणी ॲप’ हे स्वतंत्र ॲप्लिकेशन तयार केले आहे. त्यात शेतकरी पिकांची माहिती भरतील. आणि तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. ही प्रत्यक्ष माहिती त्याच वेळी (रिअल टाइम) संकलित होईल.

 1. या ॲपमध्ये केलेल्या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज मिळवणे शक्य होईल.
 2. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळणेदेखील सुलभ होणार आहे.
 3. ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजण्यास मदत होईल. त्यामुळे राज्यातील आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन करणे शक्य होणार आहे.
 4. शेतकऱ्यांचे पीकविमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल.
 5. या ॲपमध्ये शेतकऱ्यांनी केलेली पिकांची नोंदणी स्वयंप्रमाणित मानण्यात येते. तसेच केवळ १० टक्के तपासणी तलाठ्यांमार्फत करण्यात येते.

…असा करता येतो ॲपचा वापर

 1. गुगल प्ले स्टोअरवरुन ई-पीक पाहणी (e peek pahani) हे ॲप डाउनलोड करावे. त्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait.epeek या लिंकवर क्लिक करा.
 2. त्यात आपला मोबाईल नंबर टाकून, त्यावर येणारा संकेतांक/पासवर्ड/ओटीपी भरून नोंदणी पूर्ण करावी.
 3. परिचयामध्ये स्वत:चा फोटो अपलोड करून इतर माहिती साठवा.
 4. शेतावर पीक पाहणी करतेवेळी इंटरनेट नसले तरी अडचण नाही. फक्त आपल्या फोनमधील ‘जीपीएस (GPS)’ चालू असावे लागते.
 5. पुढे गावामध्ये जिथे इंटरनेट नेटवर्क उपलब्ध असेल, तिथून ‘पीक पाहणी ॲप’मधील अपलोड पर्याय निवडून माहिती अपलोड करावी.
 6. ई-पीक पाहणीच्या अधिक माहितीसाठी गावातील तलाठी किंवा कृषी सहायकाशी संपर्क साधावा. (मदतकक्ष क्रमांक : ०२०-२५ ७-१२ ७-१२)

‘ई-पीक पाहणी’ आता राजस्थानात ‘ई- गिरदावरी’

महसूल विभागाने टाटा ट्रस्टच्या मदतीने विकसित केलेला ‘ई-पीक पाहणी प्रकल्प’ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२१ पासून राज्यव्यापी सुरू केला. महाराष्ट्रामध्ये महसूल आणि कृषी क्षेत्रात राबविलेला हा महत्त्वाकांक्षी ‘ई-पीक पाहणी प्रकल्प’ राजस्थान सरकारनेही स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. तिथे त्याचे नाव ‘ई- गिरदावरी’ असेल. राजस्थानप्रमाणेच लवकरच हा प्रकल्प अन्य राज्यांमध्ये – देश पातळीवर राबविला जाईल, असा विश्‍वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

वैशिष्ट्ये :

 • आतापर्यंत ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांची ॲपवर नोंदणी; मराठवाड्यात सर्वाधिक नोंदणी.
 • ई-पीकमध्ये मिश्र पिकातील घटक पिकांसाठी हंगाम, लागवड दिनांक निवडण्याची सुविधा.
 • शेतकऱ्यांनी पीकपाहणी नोंदविल्यानंतर ४८ तासांच्या आत त्यामध्ये सुधारणाही करता येते.
 • गावामध्ये नोंदवलेली पीकपाहणीची माहिती गावातील सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध. (व्ह्यू ओन्ली स्वरूपात)
 • तीन वर्षांची ई-पीक पाहणी माहिती ‘नमुना नंबर १२’ वर दिसणार, तर पुढील ५ वर्षे संग्रहित ठेवली जाणार.
 • काही कायम पड प्रकारासाठी Geo tagged फोटो अनिवार्य.
 • जिओ फेन्सिंगची मोबाईल ॲपमध्ये सुविधा.
 • ई-मेल – varsha१००७८०@gmail.com

(लेखिका या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ सहायक संचालक असून, महसूल विभागाच्या विभागीय संपर्क अधिकारी आहेत.)

source: agrowon