Fertilizer Stock : तुमच्या जवळच्या दुकानात खताचा किती स्टॉक उपलब्ध आहे, हे कसं पाहायचं?

Fertilizer Stock : तुमच्या जवळच्या दुकानात खताचा किती स्टॉक उपलब्ध आहे, हे कसं पाहायचं?

 

बऱ्याचदा असं होतं की, आपण दुकानात गेल्यावर खताचा साठा शिल्लक नाही, असं दुकानदार सांगतो. कधीकधी खरंच त्या दुकानात खताचा स्टॉक शिल्लक नसतो, तर कधीकधी जास्तीचा भाव मिळावा म्हणून दुकानदाराकडून तसं सांगितलं जातं.

त्यामुळे मग आपण राहत असलेल्या भागातील खताच्या दुकानात आज रोजी किती साठा उपलब्ध आहे, हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं आणि हे आपण आपल्या मोबाईलवर फक्त 5 मिनिटांत जाणून घेऊ शकतो.

ते कसं याचीच माहिती आपण आता पाहणार आहोत.

खताचा उपलब्ध साठा कसा बघायचा?

भारत सरकारच्या खत मंत्रालयाच्या वेबसाईटवर देश आणि राज्यातील खताच्या साठ्याविषयी सविस्तर माहिती दिलेली असते.

कोणत्या दुकानात खताचा किती साठा शिल्लक आहे, याची माहिती इथं दररोज अपडेट केली जाते. ती पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला fert.nic.in असं सर्च करावं लागेल.

त्यानंतर भारत सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालयाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. या वेबसाईटवर उजवीकडील Fertilizer Dashboard या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

पुढे e-Urvarak नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

या पेजवर किती शेतकरी अनुदानित दरानं खताची खरेदी करतात, देशातील खत विक्रेत्यांची संख्या, 1 एप्रिलपासून 29 मे पर्यंत किती खताची विक्री झाली, इत्यादी आकडेवारी दिलेली असते.

आता या पेजवरील उजवीकडच्या किसान कॉर्नर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

Retailer Opening Stock As On Today म्हणजेच आज त्या दुकानात विक्रीसाठी खताचा किती साठा उपलब्ध आहे ते तुम्ही इथं पाहू शकता.

आता इथं सगळ्यांत पहिले तुमचं राज्य आणि जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे त्या दुकानदाराचा आयडी म्हणजेच Retailer Id असेल तर तो टाकायचा आहे किंवा तो माहिती नसेल तर तुम्ही Agency Name या पर्यायासमोर दुकानाचं नाव निवडू शकता.

पण जर तुम्हाला तेही माहिती नसेल तर तिथं ALL हा पर्याय तसाच ठेवून तुम्ही Show या पर्यायावर क्लिक करून जिल्ह्यातल्या कोणत्या दुकानात किती स्टॉक उपलब्ध आहे, याची माहिती पाहू शकता.

आता select retailer या पर्यायाअंतर्गत तुम्ही तुमच्या भागातील दुकानाचं नाव निवडलं आणि Show या पर्यायावर क्लिक केलं की तुमच्यासमोर आज रोजी त्या दुकानात खताचा किती साठा शिल्लक आहे ते ओपन होतं.

त्यानंतर इथं असलेल्या RETAILER ID वर तुम्ही क्लिक केलं की, या विक्रेत्याकडे कोणत्या कंपनीच्या खताचा किती साठा उपलब्ध आहे आणि त्याचा दर किती आहे त्याची सविस्तर माहिती पाहायला मिळते.

अशाच प्रकारे तुम्ही या विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या इफ्को, स्मार्टकेम म्हणजेच महाधन, आयपीएल आणि इतर कंपन्यांच्या खताचा किती साठा उपलब्ध आहे आणि त्याचा दर काय आहे, ते इथं तुम्ही पाहू शकता.

हे पण वाचा:- महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

काय लक्षात ठेवायचं?

आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कंपन्यांनी खतांच्या दरात आता वाढ केली आहे. त्यानुसार कंपन्यांनी त्यांच्या खतांचे नवे दर जाहीर केले आहेत.

पण, या वेबसाईटवर काही ठिकाणी तुम्हाला हे दर अपडेट न झाल्याचं दिसून येऊ शकतं. त्यामुळे त्या त्या कंपन्यांनी जारी केलेले रेट कार्ड पाहून तुम्ही खत खरेदी करू शकता.

तसंच कोणत्या कंपनीचं खत किती रुपयांना मिळेल याविषयीची सविस्तर माहिती बीबीसी मराठीच्या या बातमीतही तुम्हाला वाचायला मिळेल.

Source:- BBC Marathi