सुधारित पध्दतीने हळद लागवडीचे नियोजन

सुधारित पध्दतीने हळद लागवडीचे नियोजन
ठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसतात. परिणामी, उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
ज्या जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त, साहजिकच तिची सुपीकता जास्त असल्याने केवळ शाकीय वाढ जोमाने होते; परंतु अशा जमिनीत वाढणारे कंद कमी पोसतात. त्यांचा आकार अतिशय लहान राहतो. म्हणून हळद लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीचे परीक्षण करून घ्यावे. परीक्षण अहवालानुसार शिफारशीत प्रमाणात खते देणे सोयीचे होते, परिणामी उत्पादनात वाढ होते.
हळद लागवडीपूर्वी पूर्वमशागत करणे फार महत्त्वाचे आहे. यामध्ये प्रामुख्याने नांगरट, ढेकळे फोडणे, शेताच्या कडा कुदळीने किंवा टिकावाने खणून काढाव्यात.
हळद हे जमिनीत वाढणारे खोड आहे. त्यामुळे जमीन जितकी भुसभुशीत तितके हळदीचे उत्पादन चांगले मिळते. पहिले पीक काढल्यानंतर ट्रॅक्‍टरच्या साह्याने १८ ते २२ सें.मी.पर्यंत खोल नांगरट करून घ्यावी. त्याचवेळी जमिनीमधील कुंदा, हराळी, लव्हाळ्याच्या गाठी यांसारखे बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळासह काढून जाळून नष्ट करावेत.
पहिल्या नांगरटीनंतर कमीत कमी १ ते २ महिन्यांनी दुसरी नांगरट आडवी करावी. दुसऱ्या नांगरटीपूर्वी शेतात मोठी ढेकळे दिसत असल्यास तव्याचा कुळव मारून घ्यावा आणि मगच नांगरट करावी. हेक्‍टरी ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घ्यावे.
बेणेप्रक्रिया
कंदमाशी आणि बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळण्यासाठी लागवडीसाठी निवडलेले गड्डे बेणे क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २० मि.लि. अधिक कार्बेन्डाझीम २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणात बेणे १५ ते २० मिनिटे बुडवावे.
बीजप्रक्रिया करताना बेणे किमान १५ ते १५ मिनिटे द्रावणात बुडून राहतील याची दक्षता घ्यावी. १० लिटरचे द्रावण १०० ते १२० किलो बेण्यासाठी वापरावे.
जैविक प्रक्रिया
ही प्रक्रिया प्रामुख्याने लागवड करतेवेळी करावी. यामध्ये ॲझोस्पिरीलियम १० ग्रॅम, स्फुरद विराघळणारे जिवाणू संवर्धक (पीएसबी) १० ग्रॅम आणि व्हॅम २५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. त्यामध्ये बेणे १० ते १५ मिनिटे बुडवून लगेच लागवडीसाठी वापरावे.
ही प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत रासायनिक बेणे प्रक्रियेच्या अगोदर करू नये.
अगोदर रासायनिक बेणेप्रक्रिया करून बियाणे सावलीमध्ये दोन ते तीन दिवस सुकवूनच जैविक बेणेप्रक्रिया करावी.
लागवडीचे अंतर
सरी-वरंबा पद्धतीत सरीच्या दोन्ही बाजूस ३७.५० x ३० सें.मी. अंतरावर वरंब्यामध्ये लागवड करावी. रुंद वरंबा पद्धतीत ३० x ३० सें.मी. अंतरावर लागवड करावी.
खत व्यवस्थापन
हळदीस सेंद्रिय खतांचा भरपूर पुरवठा केल्यास भरपूर उत्पादन मिळते. त्यासाठी हेक्‍टरी ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत लागवडीपूर्वी पूर्वमशागतीच्यावेळी जमिनीत मिसळावे.
एक हेक्‍टर क्षेत्रासाठी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश द्यावे.
संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्यावेळी द्यावे. नत्र दोन हप्त्यांत विभागून द्यावे. नत्राचा पहिला हप्ता (१०० किलो) लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावे. राहिलेला दुसरा हप्ता (१०० किलो) भरणीच्यावेळी (लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी) द्यावा.
भरणीच्यावेळी हेक्‍टरी २ टन निंबोळी किंवा करंजी पेंडीचा वापर करावा.
पाणी व्यवस्थापन
लागवड एप्रिल-मे महिन्यात होत असल्याने सुरवातीच्या काळात पाऊस पडेपर्यंत पाण्याची अत्यंत आवश्‍यकता असते. कारण या दरम्यानच्या काळात मुळाकडून स्थिरता प्राप्त होण्यासाठी महत्त्वाचा कालावधी असतो.
लागवडीनंतर आंबवणीचे पाणी ४ ते ६ दिवसांच्या अंतराने द्यावे. जमिनीच्या प्रतिनुसार हा कालावधी कमी-जास्त ठेवावा. पावसाळा सुरू झाल्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार पाणी देण्याचे नियोजन करावे. पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळीमधील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे. पाऊस समाधानकारक असेल तर हलक्‍या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत पाण्याच्या १३ ते १५ पाळया द्याव्या लागतात.
पाण्याचे प्रमाण कमी पडले तर हळदीच्या कंदांची योग्य वाढ होत नाही, प्रक्रियेनंतर हळकुंडांचा रंग फिका पडतो, चमक घटते.
रेताड जमिनीमध्ये तुषार किंवा ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. ठिबकचा वापर करावयाचा असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावी आणि दोन लॅटरमधील अंतर ४ ते ५ फूट ठेवावे. दोन तोट्यांमधील अंतर जमिनीच्या प्रतीनुसार ठेवावे.
लागवडीच्या पद्धती
सरी-वरंबा पद्धत
हळद पिकास पाटपाण्याने पाणी द्यावयाचे लागवड सरी-वरंबा पद्धतीने करणे फायद्याचे ठरते. या पद्धतीत ७५ ते ९० सें.मी. अंतरावर सरी पाडून घ्याव्यात.
सरी पाडण्यापूर्वी शिफारशीनुसार स्फुरद आणि पालाश जमिनीत मिसळावे. कारण स्फुरद आणि पालाश खते जमिनीत मिसळल्यावर पिकांना लगेच उपलब्ध होत नाहीत.
जमिनीच्या उताराप्रमाणे ६ ते ७ सरी वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरे बांधावेत. वाकुऱ्यांची लांबी ही जमिनीची लांबी आणि उतार लक्षात घेऊन ५ ते ६ मीटर ठेवावी. सोयीप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाण्याचे पाट सोडावेत.
रुंद वरंबा पद्धत
ठिबक सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसतात, परिणामी उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
रुंद वरंबा तयार करताना १२० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. त्या सऱ्या उजवून ६० ते ७५ सें. मी. माथा असलेले २० ते ३० सें.मी. उंची व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन योग्य त्या लांबी रुंदीचे वरंबे (गादीवाफे) पाडावेत. वरंब्याचा माथा सपाट करून घ्यावा. त्यानंतर ३० बाय ३० सें.मी. अंतरावर लागवड करावी. लागवडीच्यावेळी गड्डे पूर्ण झाकले जातील, याची दक्षता घ्यावी. एका गादीवाफ्यावर दोन ओळी बसवाव्यात. या पद्धतीसाठी जमीन समपातळीत असणे गरजेचे असते.
लागवडीचा हंगाम आणि बेणे
लागवड जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. हळदीच्या लागवडीस उशीर झाल्यास त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. मे ते जूनमध्ये लागवड केलेल्या हळदीचा कालावधी जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत जातो, त्यामुळे दुसरे भाजीपाला पीक घेता येते.
एक हेक्‍टर हळद लागवडीसाठी २५ क्विंटल जेठे गड्डे (आकाराने त्रिकोणाकृती मातृकंद) बेणे आवश्‍यक असते. जास्त उत्पादन घेण्याच्या दृष्टीने आंगठे गड्डे आणि हळकुंड बियाण्यांपेक्षा जेठे गड्डे वापरल्याने उत्पादन अधिक येते.
जेठे गड्डे ५० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे सशक्त, निरोगी तसेच रसरशीत, नुकतीच सुप्तावस्था संपवून थोडेसे कोंब आलेले असावेत. गड्डे स्वच्छ करून मुळ्या काढून घ्याव्यात.
कुजलेले, अर्धवट सडलेले बेणे लागवडीसाठी वापरू नये. जर जेठे गड्डे उपलब्ध होत नसतील तर बगल गड्डे (४०-५० ग्रॅम वजन) किंवा हळकुंडे बेणे म्हणून वापरावे.
निवडलेली हळकुंडे ठळक, लांब, जाड, ठसठशीत वाढलेली, निरोगी आणि एकसमान आकाराची, भेसळमुक्त असावीत.
सरी वरंबा पद्धतीत ३० सें.मी. अंतरावर गड्ड्यांची लागवड करावी किंवा वाकुरी पाण्याने भरले नंतर गड्डे पाण्यामध्ये वरंब्यात ३ ते ५ सें.मी. खोल दाबून घ्यावेत. पाण्यात लागवड करताना गड्डे खोलवर जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. जर गड्डे खोल लावले गेले तर उगवणीवर परिणाम होण्याची शक्‍यता असते. लागवडीपासून २१ ते २६ दिवसांत संपूर्ण उगवण होते.
Ref:-http://sakal.com
Wealthy Life OrganicsClick HereSoil MultiplerClick Hereप्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर स्प्रेClick Hereॲग्रीराईज क्रॉप कव्हरClick Hereबावके पाटील नर्सरीClick Hereऊस रसाचा चरक मिळेलClick Hereकोंबडी खत विकणेClick Hereराजमातोश्री नर्सरी पिंपळद(नाशिक)Click Hereन्यू आदर्श नर्सरीClick HereSharvi BeekeepersClick HereDD Sprayer PumpClick Hereद्राक्ष नर्सरीClick HereAloe MagicClick Hereॲग्रीराइज मल्चिंग पेपरClick Hereनिर्मल नॅचुरल गांडुळ खतClick Hereन्यू किसान ऊस रोपवाटीकाClick Here
Previous
Next

Leave a Comment