सोयाबीन पिकाची काढणी, मळणी व साठवण तंत्र 2021

सोयाबीन पिकाची काढणी, मळणी व साठवण तंत्र 2021

 

प्रा. संजय बडे, प्रा. गणेश घुगे, व प्रा. कु. पुजा सुर्यवंशी

सहाय्य्क प्राध्यापक (कृषिविद्या विभाग)

दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय दहेगांव

ता. वैजापुर, जि. औरंगाबाद

मो. 7888297859


krushi kranti :- सोयाबिन हे महाराष्ट्रातील प्रमुख तेलबिया पीक असुन या पिकाने ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये क्रांती करुन शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक स्तरात सुधारणा केली आहे. महाराष्ट्रात सोयाबीनचा उपयोग मुख्यत: तेल काढण्यासाठी केला जातो व तेलरहित पेंडीची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. प्रथिनासाठी या स्वस्त स्त्रोताचा आहारामध्ये वापर करण्याची अत्यंत आवश्यकता असुन त्यामुळे कुपोषणाच्या समस्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविता येईल आणि सोयाबीनच्या अन्य पोषण तत्वाचा लाभ घेता येईल.
महाराष्ट्रात दरवर्षी सोयाबीनचे क्षेत्र व उत्पादन वाढत असले तरी उत्पादकतेत मात्र स्थिरता आली आहे. उत्पादकता कमी होण्याच्या अनेक कारणांपैकी सोयाबीनची काढणी व नंतरच्या प्रक्रियेत अयोग्य हाताळणी हे एक महत्वाचे कारण आहे. त्यामुळे या पिकाची वेळेवर काढणी योग्य माध्यमाद्वारे मळणी आणि योग्य पदध्तीने साठवण करणे अतिशय गरजेचे आहे. सोयाबीनची काढणी, मळणी व साठवण वेळेवर व योग्य रित्या केल्यास धान्याची प्रत चांगली राहण्यास व बियाण्याची उगवणशक्ती वाढवण्यास मदत होईल.
सोयाबीन खालील क्षेत्राचा विचार करता मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. सोयाबीन या पिकावरील संशोधनमुळे दरवर्षी महाराष्ट्रातील सोयाबीनच्या क्षेत्र व उत्पादनामध्ये वाढ होत आहे. इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात सोयाबीन खालील क्षेत्र या पिकाखाली होते. महाराष्ट्रात या पिकाचे उत्पादन वाढत असले तरी उत्पादकता मात्र कमी आहे.
उत्पादन क्षमता कमी होण्याच्या विविध कारणापैकी त्याची पीक काढणी नंतरच्या प्रक्रियेत अयोग्य हाताळणी हे एक महत्वाचे कारण आहे. त्यामुळे या पिकाचे वाढते महत्व लक्षात घेता या पिकाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने या पिकाची वेळेवर काढणी, मळणी आणि योग्य पध्दतीने साठवण हेाणे अतिशय महत्वाचे आहे.

पिकाची काढणी :

सोयाबीन हे पीक पेरणीनंतर साधारणत 95 ते 105 दिवसात काढणीसाठी तयार होते. पीक पक्व झाल्यानंतर पिकाची काढणी लवकर करणे फार महत्वाचे आहे नसता शेंगा तडकुन उत्पादनात 15 ते 20 टक्के घट येते. पीक पक्व झाल्यानंतर 85 ते 90 टक्के पाने देठासहीत जमिनीवर गळुन पडतात. शेंगाचा रंग पिवळाते काळसर होवू लागतो. सोयाबीन चे उत्पादन व प्रत चांगली ठेवण्यासाठी पावसाचा अंदाज पाहुनच म्हणजे पाऊस येणार नाही याची खात्री करुनच काढणी करावी. कारण बियाण्याला पक्वतेनंतर किंचीत ओलावाचा स्पर्श झाला तरी बियाण्याची उगवण क्षमता कमी होते.
सोयाबीन पिकाची कापणी शारीरिक पक्वता आल्यावर वेळेवर करावी. बियातील ओलावा 14 ते 15 टक्के असला की कापणीला सुरुवात करावी. वेळेवर कापणी केल्यास मळणीत बियांचे नुकसान होत नाही. पिकाची काढणी धारदार कोयत्याने जमिनीलगत कापुन करावी. झाडे उपटुन येणार नाहीत याची काळजी घ्यावी. सोयाबीन शक्यतो एकत्र मोठे ढिग किंवा गंजी करुन ठेवु नये, त्यामुळे त्यास बुरशी लागुन धान्याची प्रत निकृष्ट हेाते. काढणी केलेले पीक उन्हात पसरुन वळवावे व मळणी करण्यास उशीर होत असल्यास अशा वेळेसच गंजी करुन ठेवावे.

सोयाबीन पिकाची काढणी

मळणी :

मळणी यंत्राने मळणी करताना बियाण्यावरील आर्द्रता 14 टक्के पेक्षा कमी नसावी. मळणी करताना बियाण्यातील आर्द्रता 14 टक्के पर्यंत असेल तर मळणी यंत्राच्या फेऱ्याची गती 400 ते 500 फेरे प्रति मिनिट ठेवावी व बियाण्यातील आद्रतेचे प्रमाण 13 टक्के पर्यंत असेल तर मळणी यंत्राच्या फेऱ्याची गती 300 ते 400 फेरे प्रति मिनिट ठेवावी. अधूनमधुन बियाण्यावर लक्ष ठेवुन डाळ होणार नाही याची काळजी घ्यावी. डाळ होण्याचे प्रमाण जास्त असल्यास वेग कमी करावा.

मळणी

साठवण :

सोयाबीन पिकाची मळणी झाल्यानंतर तयार झालेल्या बियाण्याची योग्य साठवण होणे आवश्यक असते नसता बियाण्याच्या उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होते. साठवण करण्यापूर्वी बियाणे 2-3 दिवस उन्हामध्ये चांगले वाळवावे. साठवण करताना बियाण्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण 10 ते 12 टक्के पेक्षा जास्त असु नये. शक्य झाल्यास बियाण्याची साठवण पत्र्याच्या कणग्यामध्ये करावी.
पोत्यात साठवण करावयाची असल्यास पोते सरळ जमिनीवर न ठेवता ते फळीवर ठेवावे तसेच प्रत्येक पोते 80 किलो बियाणे भरलेले असावे व ते एकावर एक रचुन त्यांची संख्या फक्त्‍ 4 एवढी मर्यादित ठेवावी म्हणजे जमिनीतील ओलाव्याच्या पोत्याशी सरळ संपर्क येणार नाही. अशा प्रकारे सोयाबीनची साठवण करावी.
 

Leave a Comment