Heavy Rain : मुख्यमंत्री शिंदेंचा कामाचा धमाका, शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम आणि अतिवृष्टीने नुकसान झाल्यास अनुदानही, वाचा सविस्तर

Heavy Rain : मुख्यमंत्री शिंदेंचा कामाचा धमाका, शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम आणि अतिवृष्टीने नुकसान झाल्यास अनुदानही, वाचा सविस्तर

 

शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊनच राज्याचा विकास साधला जाणार असल्याचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून सांगत आहेत. आता त्यादृष्टीने निर्णय घेण्यासही त्यांनी सुरवात केला असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जे शेतकरी घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करीत होते त्यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेलच असे नव्हते. पण यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमूलाग्र असा बदल केला आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये हे प्रोत्साहनपर तर दिलेच जाणार आहे पण अशा शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले तर ते भरपाईसाठी देखील पात्र राहणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली प्रोत्साहनपर रक्कमही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे हे म्हणाले आहेत. शिवाय अशाप्रकारचा अध्यादेश काढण्याच्याही सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

नियमित कर्ज अदा करुनही अन्याय

पीक कर्जाचा लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी नियमित कर्ज अदा करण्यावर भर दिलेला आहे. असे असतानाही महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने जाचक नियम लावलेले आहेत. 2018-19 मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे. त्यांना या योजनेतून वगळण्यात आले. त्यामुळे राज्यातील लाखों शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. याशिवाय या योजनेत 2017-18, 2018-19, 2019-20 या कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे. मात्र, यामध्ये बदल करुन पीक कर्ज घेणारे शेतकरी अतिवृष्टीचे अनुदान घेऊ शकणार आहेत.

आमदार अन् खासदारांच्या मागणीला यश

राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्ज योजनेचा लाभ घेतला आहे. त्यापैकी काही शेतकरी हे नियमित कर्ज अदा करीत आहेत .असे असताना त्यांनाच अतिवृष्टीने नुकासन झाले तर भरपाई नाही अशी नियमावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. अशा शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी आ. प्रकाश आबिटकर आणि खा. धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असून या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा असा अध्यादेश काढला जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हे पण वाचा :- पुढील तीन दिवस पावसाचे, राज्यात रेड अलर्ट जारी

प्रोत्साहनपर रक्कमही लवकरच जमा

गेल्या दोन ते तीन वर्षापासून नियमित कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा करण्यात आली होती. मध्यंतरी कोरोनामुळे ते शक्य झाले नव्हते. त्यानंतर महाविकास आघाडीने यंदाच्या अर्थसंकल्पात 10 हजार कोटींची तरतूद केल्याचे सांगितले. एवढेच नाही 1 जुलैपासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार होती. तेवढ्यात सरकारच बदलले. त्यामुळे हा प्रश्न रखडलेला आहे. मात्र, लवकरच 50 हजार ही प्रोत्साहनपर रक्कम लवकरच जमा होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

source :– tv9 marathi