Heavy Rains : अतिवृष्टिग्रस्तांना योग्य मदत देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

Heavy Rains : अतिवृष्टिग्रस्तांना योग्य मदत देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

 

राज्यात अतिवृष्टीमुळे हानी झालेली पिके व मालमत्तेचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीनंतर ‘एनडीआरएफ’ची मदत निकषानुसार कमी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन स्तरावरून योग्य मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शेती, ग्रामविकास व इतर खात्यांशी संबंधित समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री मंगळवारी पुणे दौऱ्यावर आले होते.

महसूल आयुक्तालयात पुणे विभागातील जिल्ह्यांच्या कामकाजाची माहिती घेतल्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. कृषी क्षेत्राला राज्य सरकार प्राधान्य देत आहे. विकासकामांच्या फायलींचा प्रवास कमी व्हावा. लोकांची कामे लवकर आणि तीदेखील दर्जेदार व्हावी. या कामांचे लेखापरीक्षण व्हावे, असा प्रयत्न शासनाचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

फायलींचा प्रवास कमी करा

अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान, पशुधनाची झालेली हानी, घरांची पडझड, खरिपातील पिकांची स्थिती, पीक कर्जवाटप, सिंचन व्यवस्था या सर्वच मुद्द्यांचा आढावा आम्ही घेतला आहे. पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, लवकरात लवकर योग्य ती मदत देण्याचा प्रयत्न सरकारचा राहील. राज्यातील विविध योजनांसाठी निधी देण्याची तयारी केंद्राची आहे. केंद्राच्या योजनांचा फायदा होण्यासाठी केंद्राशी निगडित योजनांमधील समस्यांचा आढावा घेण्यात आला आहे. आम्हाला राज्याच्या विकासविषयक सर्वच योजनांना गती द्यायची आहे. त्यामुळे मी विभागीय बैठका घेतो आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पूरस्थितीतही दौरे केले

राज्यात पूरस्थिती असताना आपण वाढदिवसाच्या कार्यक्रमात दंग होता, अशी टीका झाल्याचे वार्ताहरांची विचारताच, प्रत्यक्ष अतिवृष्टी व पूर सुरू असताना मी व स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी विदर्भाचा दौरा केला. लष्कराचे हेलिकॉप्टर नेण्यास अडचण असल्याचे लक्षात येताच आम्ही रस्ते मार्गे पूरग्रस्तांच्या भेटीला गेलो. मी थेट गडचिरोलीच्या भागात फिरलो तर भंडारा, गोंदिया, अमरावतीला उपमुख्यमंत्री गेले होते, असे मुख्यमंत्री उत्तरले. राजकीय दबावामुळे सातारा येथील म्हसवड एमआयडीसी रद्द करून कोरेगावला स्थलांतरित केली जातेय का, या प्रश्‍नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, की आम्ही कोणाच्याही दबावाने निर्णय घेत नाही. पायाभूत सुविधा व जागेची उपलब्धता पाहून निर्णय होतात. पुणे जिल्ह्यातील नियोजित विमानतळ बारामतीला सरकवले जात आहे का, या प्रश्‍नावर, असे नाही. मंजुरी जेथे आहे तेथेच विमानतळ होईल, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच एकट्याचे मंत्रिमंडळ किती दिवस चालवणार..!

असाही प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. पण सरकार चांगले चालू आहे की नाही, ते सांगा. आवश्यक तेथे सरकार सर्व निर्णय वेळेत व वेगाने घेते आहे. ५० हजार रुपयांची कर्जमाफी देण्याची थांबलेली योजना आम्ही सुरू केली. इंधनावरील कर कमी केले. आम्ही लोकांना भेटतो. लोक आम्हाला भेटायला येतात. आम्ही प्रश्‍न सोडवत आहोत. आम्ही जी कामे करतो आहोत. तेच उत्तर या आक्षेपांना आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तुमच्या नावाची ११ लाख रुपयांची रोकड संजय राऊत यांच्या घरात कशी मिळाली, असे पत्रकारांनी छेडले असता मुख्यमंत्र्यांनी शांतपणे काही प्रतिप्रश्‍न केले. पैसे कोणाकडे मिळाले, माझ्याकडे मिळाले का, मी पैशांवर लिहू शकतो का, मी ते पैस त्यांच्या घरात नेऊन ठेवू शकतो का, ज्यांच्या घरात पैसे मिळाले त्यांना तुम्ही विचारा, असे असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.

हे पण वाचा :- खरीप पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शास्त्रज्ञांचा सल्ला जारी; जाणून घ्या…

सर्व उसाचे वेळेत गाळप करा.

राज्यात आगामी गाळप हंगामासाठी उसाचे बंपर पीक असल्यामुळे गाळपाबाबत काही लोकप्रतिनिधींनी बैठकीत चिंता व्यक्त केली. त्यावर सर्व उसाचे वेळेत गाळप होण्यासाठी नियोजन करा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी साखर आयुक्तांना केली. तसेच विकासकामांबाबत राजकीय भेदभाव नको. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीदेखील माझी चर्चा झाली आहे. विकासकामांना अजितदादांचा पाठिंबाच असतो, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बैठकीत सांगितले.

source :- agrown