हिंदु संस्कृती-ज्योतिष-पावसाळी नक्षत्र आणि शेती

हिंदु संस्कृती-ज्योतिष-पावसाळी नक्षत्र आणि शेती 
हिंदू पंचांगानुसार वर्षभरात येणा-या २७ नक्षत्रांपैकी ९ नक्षत्रं ही पावसाची असतात. ‘नक्षत्रं आणि दरवर्षी त्यांची बदलणारी वाहनं’ ही अत्यंत मजेशीर आणि तितकीच संशोधनात्मक बाब आहे. पावसाच्या नक्षत्रांची सुरुवात ही जरी ‘रोहिणी’ नक्षत्रापासून होत असली, तरी पावसाच्या आगमनाचा खरा हर्षोल्हास हा ‘मृग’ नक्षत्रापासूनच सर्वत्र साजरा केला जातो. ‘मृग नक्षत्र’ हे आकाशमंडपातलं वैशिष्टयपूर्ण देखणं असं नक्षत्र मानलं जातं. युगानुयुगांपासून सामान्यत: ७ किंवा ८ जूनला सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो असं मानलं जातं. अशा या ‘मिरगाच्या पावसा’च्या प्रारंभीची मेघगर्जना ऐकण्यासाठी आपण सारेच आतुरलो आहोत..आजपासून दर १५ दिवसांनी बदलत जाणा-या पर्जन्य नक्षत्रांची संस्कृती दर्शवणारी लेखमाला.
कोसळे मृगधार कलत्या सांजवेळी
रान झाले चिंब, धरणी चिंब ओली
काजळी काळ्या घनांची दाटलेली
काजळाने वृक्ष-खोडे माखलेली
मेघ का प्राणात भिनती गात गाणी?
गीत का काळेपणाचे घुमत कानी?
अर्थ झोंबे आर्त, झाकळल्या सुरांनी
मीही भिजतो गडद गहि-या कृष्णरानी..
मृग नक्षत्राच्या प्रारंभीची ही कवीमनाची तरल अवस्था, तिचं आदिकवी वाल्मिकीनं रामायणाच्या किष्किंधाकांडात पुढील प्रकारे वर्णन केलं आहे.
अयं स काल: सम्प्राप्त: समयोऽद्य जलागम:।
सम्पश्च त्वं नभो मेघै: संवृतं गिरिसंनिभै:।।
कवी ग. दि. माडगूळकरांनी
माऊलीच्या दुधापरी । आले मृगाचे तुषार
असं म्हणताना मृग नक्षत्रातल्या वर्षाधारांना ‘आई’च्या जीवनदायक दुधाची उपमा दिली.
‘मृग नक्षत्र आणि पहिल्या पावसाची’ ओढ ही केवळ कवींनाच नाही, तर समस्त भारतीय समाजमानसाला लागलेली असते. भारत हा देश कृषिप्रधान असल्यामुळे ‘काले वर्षतु पर्जन्य:, पृथिवी सस्यशालिनी’ ही या देशाची राष्ट्रीय प्रार्थना, असं म्हणावं लागेल.
वर्षाकाळी पर्जन्याचा व्हावा वर्षाव
धनधान्याने, समृद्धीने बहरावे गाव
देशामध्ये कधी नसावे क्षोभयुक्त क्रौर्य
अढळ राहावे विद्वानांचे क्षमाशील धैर्य
अशी कामना प्रकट करण्यासाठी भारतीय समाजमन आसुसलेलं असतं.
मृग नक्षत्राच्या प्रारंभी येणारं काळं मेघमंडल म्हणजे वर्षभराच्या समृद्धीचा जणू अग्रदूत. शेतामध्ये पिकणारी धनधान्याची रास या मेघमंडलाशिवाय निर्माण होणार नाही, अशी बळीराजाची धारणा असते.
सामान्यत: ७ किंवा ८ जूनला सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो. ‘मृग’ हे आकाशमंडपातलं एक विशेष देखणं नक्षत्र. हरिणाचे चार पाय, त्याच्या पोटात शिरलेला बाण आणि लगतच असलेला तेजस्वी व्याध तारा, असा भासणारा हा तारकासमूह मार्गशीर्ष महिन्यात पूर्ण रात्रभर आकाशात दिसतो. जूनमध्ये आकाशात मृग नक्षत्र दिसतच नाही, कारण सूर्याच्या सान्निध्यात त्याचं तेज लुप्त होत असतं.
मृग नक्षत्रात अवकाशात दिसणा-या ता-यांची प्रतिकृती
एकूण नक्षत्रं सत्तावीस. त्यांपैकी पावसाची नक्षत्रं नऊ. बिरबलाच्या चातुर्यकथांमध्ये ‘सत्तावीस वजा नऊ बरोबर शून्य’ असं गणित येतं. पावसाच्या नऊ नक्षत्रात जर वर्षावृष्टी झालीच नाही, तर या देशातलं जीवन शून्य होईल, असं सांगणारी ही कथा आहे आणि भारतीय शेतक-यांच्या दृष्टीनं ते एक भीषण वास्तवही आहे.
पावसाच्या प्रत्येक नक्षत्राबरोबर त्याच्या वाहनाचा उल्लेख हा असतोच. प्रत्येक नक्षत्रात पाऊस सारखा पडत नाही, तो कमी-जास्त पडतो. पावसाचं प्रमाण आधीच ठरवता यावं, अशी शेतक-यांची अर्थातच इच्छा असे. म्हणून काही पूर्वीच्या ज्योतिषांनी त्यासाठी काही ठोकताळे बसवले. त्यासाठी सूर्य नक्षत्र कोणत्या वाहनावर बसून येतं, ते शोधण्याचं त्यांनी एक गणित मांडलं. सूर्य नक्षत्रापासून दिवस नक्षत्रापर्यंतची नक्षत्रं ते मोजतात आणि त्या आकडय़ाला नऊ या संख्येनं भागतात. बाकी शून्य आली, तर वाहन हत्ती असतं, बाकी एक आली तर ते वाहन घोडा, बाकी दोन आली तर कोल्हा असतं. तीन आल्यास बेडूक, चार आल्यास मेंढा, पाच आली तर मोर, सहा आली तर उंदीर, सात आली तर म्हैस आणि आठ आली, तर वाहन गाढव असा हा संकेत आहे. बेडूक, म्हैस आणि हत्ती या वाहनांना मुबलक पाणी लागत असल्यानं त्यांना पाऊस खूप आवडतो, त्यामुळे ती भरपूर पावसाची सूचना देतात. मोर, उंदीर आणि गाढव ही अल्पवृष्टीसूचक वाहनं आहेत. कोल्हा आणि मेंढा ही वाहनं अवर्षण, दुष्काळ सुचवतात आणि घोडा हे वाहन पर्वतावर वृष्टी होईल असं सुचवतं. यावर्षी मृग नक्षत्राचं वाहन ‘हत्ती’ आहे. त्यामुळे मुसळधार पावासाची अपेक्षा बाळगता येईल.
पावसाविषयीचं पूर्वानुमान हा शेतक-यांचा कुतूहलाचा विषय. त्यासाठी त्यांना लोकज्योतिष्याची गरज भासे. ‘सहदेव जोशी’ ही अशा लोक ज्योतिषांपैकी एक जात आहे. या सहदेवाला जे आपला पूर्वज मानतात, ते सहदेव आणि भाडळी नावाची स्त्री यांच्या परस्पर संवादातली विधानं घेऊन ते पावसाविषयीची भाकितं सांगतात.
पडतील स्वाती तर पिकतील मोती,
रोहिणी वाजे गडगडाट, मग पडे दिवस आठ । भाडळी म्हणे सहदेवा, नद्या वाहती काठोकाठ ।।
अशा स्वरूपाची ही वचनं आहेत आणि अजूनही ती लोकप्रिय आहेत.
मृग नक्षत्राची चाहूल घेऊन येणारा ‘इंद्रगोप / मिरग (मखमली किडा)’
उत्तर भारतात ‘उत्तर-पश्चिम चमके बिजली, दक्षिण वाहे वात।’ ही पावसासाठीची आदर्श परिस्थिती असल्याचं समजतात. आज हवामान विभाग, त्यांनी ठरवलेली सोळा निष्कर्षसूत्रं, उपग्रहांवरून घेतलेली ढगांची छायाचित्रं असा मोठा फौजफाटा विज्ञानानं उपलब्ध करून दिलेला आहे. परंतु पावसाच्या अंदाजाबद्दल ‘चांगले दिवस’ अजून काही आलेले नाहीत, अशीच सर्वसामान्य शेतक-यांची भावना आहे. ते येतील ही आशा मात्र कायम आहे.
मृग नक्षत्राच्या प्रारंभी सर्वत्र पर्जन्यदेवासाठी नैवेद्य ठेवण्याची प्रथा आहे. केळीच्या पानावर वाढलेलं जेवण ‘नवेद्य’ म्हणून अंगणात किंवा शेतात ठेवलं जातं. अन्य नक्षत्रांना मात्र हे भाग्य नाही. कदाचित ते लक्षात घेऊनच मृग नक्षत्राच्या प्रारंभीच्या दिनासाठी कवी मर्ढेकरांनी ‘पाऊस पाडवा’ असा शब्द वापरलेला असावा.
कोकणातला शेतकरी मृग नक्षत्र सुरू होण्यापूर्वीच शेतीची साधनं बाहेर काढून, शेतीसाठी उपयुक्त असलेल्या साधनसामग्रीची साफसफाई आणि दुरूस्ती करून तयार असतो. जमीन भाजल्याशिवाय ती पिकणार नाही, असा परशुराम-भूमी(कोकण भूमी)ला शाप आहे. त्यामुळे ती आधीच भाजून घेतलेली असते. पहिल्या पावसानंतर नांगरणी-पेरणीची गडबड असते. मराठवाडा-विदर्भ या प्रदेशात पाऊस सुरू होण्यापूर्वीच पेरणी करतात, तिला ‘धुळपेरा’ असं म्हणतात. कितीही कठीण काळ आला, शेतीकाम परवडेनासं झालं, तरी शेतकरी राजा मृग नक्षत्राच्या स्वागतासाठी सज्ज होऊन कामाला लागतो.
ढगांचा गडगडाट सुरू झाला की, शेतक-यांला वाटतं, जणू परमेश्वरच पाठीवर हात ठेवून आपल्याला ‘लढ’ म्हणतो आहे. मेघाचा ध्वनी त्याला प्रेरणा देतो. आज, मृग नक्षत्राच्या प्रारंभी, मेघगर्जना ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत. ‘ये मेघा, वाजतगाजत ये, आमच्या मनाला उभारी दे, तुझं स्वागत आहे..’
ॐ नमःशिवाय
Source whatsapp
https://www.santsahitya.in/

विशेष जाहिराती

नवीन जाहिराती

Leave a Comment