कर्टुले लागवड संपूर्ण माहिती

कर्टुले लागवड संपूर्ण माहिती

 

कर्टुले लागवड प्राथमिक माहिती (Basic information of kartule cultivation)

 
करटुले ही एक रानभाजी आहे.
अनेक औषधी गुणधर्म युक्त रानभाजीउत्तम नियोजन केल्यास कमी वेळात चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे.
करटोली पिकाला उष्ण, दमट हवामान मानवते. लागवडीसाठी डोंगरउताराची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. हलकी ते मध्यम प्रकारच्या जमिनीत पीक घेता येते.

अभिवृद्धी

लागवड कंद, बिया व फाटे कलम यांच्यापासून केली जाते. करटोलीच्या पिकात मादी आणि नर वेल वेगवेगळे असतात. लागवड केलेल्या क्षेत्रात फळधारणेसाठी १० टक्के नर वेलांची संख्या आवश्यक असते. नर आणि मादी वेल फुलांवरून सहज ओळखता येतात. मादी फुलांच्या पाकळ्यांखाली खडबडीत गाठीसारख्या आकाराचा बीजांडकोश असतो. नर फुलांत तशी गाठ नसते.
बियांपासून लागवड केल्यास उगवण अतिशय कमी प्रमाणात होते. नर आणि मादी वेलांच्या संख्येबाबत खात्री देता येत नाही. तसेच वेलीवर फळधारणा उशिरा सुरू होते.
करटोलीची लागवड फाटे कलम वापरूनही करता येते. मात्र यात रोपे मरण्याचे जास्त असते.

लागवड पद्धत ( kartule cultivation ):  

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत लागवड पूर्ण करावी. जमीन नांगरट करून भुसभुशीत करावी. जमिनीत १.५ ते २ मीटर अंतरावर ६० सें.मी. रुंदीचे पाट काढावेत. पाटाच्या दोन्ही बाजूस १ मीटर अंतरावर ३०x३०x३० सें.मी. आकाराचे खड्डे घ्यावेत.
प्रत्येक खड्ड्यात १.५ ते २ किलो कुजलेले शेणखत टाकून मातीत मिसळून घ्यावे. प्रत्येक अळ्यात १० ग्रॅम युरिया, ६० ग्रॅम सुपर फॉस्फेट, १० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश आणि ५० ग्रॅम कार्बारिल हे कीटकनाशक मातीबरोबर  चांगले मिसळून घ्यावे.  प्रत्येक आळ्यात एक कंद लावावा.

बीजप्रक्रिया (kartule seeds) :

कंद कॉपर ऑक्सीक्लोराईड २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळलेल्या द्रावणात बुडवून घ्यावेत. त्यामुळे कंद कुजण्याचे प्रमाण कमी होते.

खत व्यवस्थापन : 

प्रतिहेक्टरी २० टन शेणखत, १५० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व ६० किलो पालाश द्यावे. लागवडीवेळी स्फुरद व पालाशची पूर्ण मात्रा द्यावी. नत्र लागवडीवेळी ५० किलो, लागवडीनंतर ३० दिवसांनी ५० किलो आणि ६० दिवसांनी ५० किलो द्यावे. वेल एक महिना वयाचा झाल्यावर प्रत्येक वेलास १०- १५ ग्रॅम युरिया द्यावा.

आंतरमशागत : 

लागवडीनंतर करटोलीचे वेल जोमाने वाढू लागतात. अशा वेळी वेलींना आधार द्यावा. त्यासाठी झाडाझुडपांच्या फांद्या किंवा बांबूचा उपयोग करावा किंवा वेल मांडवावर वाढवावे. वेलाच्या आजूबाजूचे तण खुरपणी करून काढून टाकावे. अाळ्यांना मातीची भर द्यावी.

जाती :

अंडाकृती आकाराच्या  फळाच्या जाती – फळांचा रंग हिरवा, फळांवर मऊ काटे अतात. आकार अंडाकृती असतो. एका फळाचे वजन १० ते १२ ग्रॅम इतके असते.
मध्यम गोल फळांच्या जाती – फळांचा रंग हिरवा, मध्यभागी फुगीर असून फळांवरील काटे टणक असतात. एका फळाचे सरासरी वजन १३ ते १५ ग्रॅम असते.
मोठा आकार, गोल फळे असणाऱ्या जाती – फळे आकाराने मोठी, फिकट हिरवा रंग व बियाणे कमी असते.

करटोलीची वैशिष्ट्ये 

कोवळी फळे स्वादिष्ट, पोट साफ होण्यासाठी, पित्ताचा स्त्राव नीट होण्यासाठी उपयुक्त.
इतर वेलवर्गीय भाज्यापेक्षा पोषक द्रव्यांचे प्रमाण अधिक.
पाणी ८४.१ टक्के, प्रथिने ३.१ टक्के, पिष्टमय पदार्थ ७.७ टक्के, तंतुमय पदार्थ ३ टक्के.
क्षार १.१ टक्के तसेच अ आणि क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात.
भाजी मधुमेही रुग्णांना उपयुक्त.
कंदाचा उपयोग मूतखडा, विषबाधा, हत्तीरोग, दमा, ताप, मूळव्याधीमध्ये गुणकारी.
टीप : केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे सन २०२० पासून कार्बारिलच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मानवी आरोग्य, पर्यावरण आणि जलस्रोतावर परिणाम होणार नाही, यादृष्टीने याचा वापर करावा. उत्पादनाच्या लेबलवरील शिफारशींचा काटेकोर वापर करावा.
source:- Sakal

Leave a Comment