खरीप कांदा शेती

खरीप कांदा शेती

 
krushi kranti :- कांदा हे एक महत्वाचे पीक (Onion Crop) आहे. भारतात कांद्याचे उत्पादन खरीप (Kharif), रांगडा व रब्बी (Rabbi) या तीनही हंगामात घेतले जाते. भारतात कांद्याच्या एकूण उत्पादन पैकी सुमारे २१.२१ टक्के उत्पादन खरिफ कांद्यापासून मिळते. खरिफ कांद्याचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात होते. खरीप कांद्याची  लागवड (Cultivation of kharif onions) जुलै ते ऑगस्ट दरम्यान केली जाते आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात काढणी केली जाते.
मागील वर्षी खरिफ कांद्याचे सदोष बियाणे, सतत पावसामुळे रोपवाटिकेत बुरशी रोगांचा प्रादुर्भाव इ. कारणांमुळे कांदा उत्पादनावर खूप परिणाम दिसून आला होता. म्हणून कांदा उत्पादनासाठी योग्य वाणांची निवड, खात्रीशीर बियाण्याची निवड तसेच रोपवाटिका व्यवथापन खूप महत्वाचे असते. बियाणाची तसेच वाणांची निवड करताना काही निकष लक्षात घेणे गरजेचे असते.
वाण निवडताना रोग आणि कीड प्रतिकारक्षमता, मानेची जाडी,  परिपक्वतेसाठी अवधी आणि रंग इ. निकष लक्षात घेणे गरजेचे असते. तसेच बियाणे खरेदी करताना देखील अनुवांशिकदृष्ट्या शुद्ध, शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले, चालू वर्षाचे बियाणे, प्रमाणित आयसोलेशन अंतर ठेऊन केलेले बीजोत्पादन, भेसळमुक्त बियाणे इ. निकष महत्वाचे असतात.
म्हणून बियाणाची खरेदी प्रमाणिक स्त्रोत (कृषिविद्यापीठ, फलोत्पादन संशोधन संस्था इ.) कडून करावी. जर खाजगी शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी करत असाल तर विश्वसार्हता असणे आवश्यक असते तसेच शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले बियाणे असावे. जर बियाणे अनुवांशिकदृष्ट्या शुद्ध नसेल तर कंद परिपक्वते अगोदर डेंगळे येणे तसेच भेसळयुक्त कांदे इ. समश्या येण्याची संभावना असते.

खरिफ हंगामासाठी वाणांची निवड (Selection of varieties for kharif season)

खरिफ हंगामासाठी अधिक आद्रता, दमटपणा अशा प्रकारच्या वातावरणास प्रतिसाद देणारी व ९०-१०० दिवसात तयार होणारी जात आवश्यक असते. बरेच शेतकरी पारंपारिकरित्या वाढवलेल्या हळवा कांद्याचे बियाणे वापरतात, त्यामुळे रंग, आकार व वजन याबाबत एकसारखेपणा नसतो. तसेच सर्वच कांदे एकसारखे पोसत नाहीत. चिंगळी कांद्याचे प्रमाण बरेच राहते.
भारतीय कृषि अनुसंधान परिषद-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, पुणे या केंद्राने विकसित केलेले वाण भीमा सुपर, भीमा राज, भीमा रेड, भीमा डार्क रेड, तसेच पांढऱ्या जाती भीमा शुभ्रा, भीमा श्वेता, भीमा सफेद, तसेच कृषिविद्यापीठ किंवा बागवानी संशोधन संस्था यांच्या बसवंत-७८०, फुले समर्थ, अग्रिफॉऊंड डार्क रेड अर्का कल्याण इ. जातींची निवड करावी. मुलभूत बीयाणे घेऊन दरवर्षी निवड करून दोन जातीमध्ये विहित केलेले विलगीकरण अंतर राखुन शेतकरी देखील बीजोत्पादन करू शकतो. मागच्या हंगामातील बीयाणे वापरणार असाल तर त्याची उगवणक्षमता तपासुन घेऊन प्रमाणित केलेले असावे.

खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन (Kharif Onion Nursery Management)

खरीप कांद्याच्या रोपवाटिका व्यवस्थापनेसाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. खरीप कांद्याच्या रोपवाटिकेसाठी सेंद्रीय पदार्थांनी समृद्ध, वालुकामय चिकणमातीयुक्त, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य ठरते. जमिनीचा सामू ६ ते ७.५ असावा. रोपवाटिकेत पाणी सतत साठून राहू नये म्हणून जमिनीला किंचित उतार असावा, जेणेकरून अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा होणे सोयीस्कर ठरते. रोपवाटिकेत सतत पाणी साठून राहण्याची स्थिती बुरशीजन्य रोगांच्या संसर्गास अनुकूल ठरते. जमिनीत चिकन मातीचे प्रमाण जास्त नसावे.
रोपवाटिका तयार करण्यासाठी पूर्वनियोजित वेळी खोल नांगरणी आणि गरजेनुसार वखरणी करून घ्यावी जेणेकरून जमीन स्वच्छ व भुसभुशीत होईल. तसेच तण, बुरशीजन्य रोग व जमिनीतील किडींचा उपद्रव कमी होण्यास मदत होईल. रोपवाटिकेत विविध बुरशीजन्य रोग (रायजोक्टोनिया, फाइटोप्थोरा, पीथियम आणि फ्यूजेरियम) येण्याची शक्यता असते. ज्या ठिकाणी रोपवाटिकेत बुरशीजन्य मानमोडी (डैम्पिंग ऑफ) किंवा मातीतून प्रसार होणा-या रोगांचा गंभीर परिणाम होतो अशा जमिनींमध्ये मृदा सौरिकरण (सोलॅरिझेशन) उपचाराची आवश्यकता असते.
मृदा सौरिकरण (सोलॅरिझेशन) उपचार पद्धतीने मानमोडी बुरशीजन्य रोगांपासून रोपवाटिकेचा बचाव करू शकतो. ज्या ठिकाणी रोपवाटिका करण्याचे नियोजित असते अशा क्षेत्राला हलक्या स्वरूपात पाणी देऊन जमीन थोडी ओलसर करून घ्यावी. मार्च ते मे दरम्यान रोपवाटिकेसाठी निवडलेली जागा २०० गेजच्या पांढऱ्या पारदर्शक पॉलिथीनने अश्या प्रकारे झाकून ठेवावी की आतील भागातील बाष्पयुक्त हवा बाहेर येणार नाही.
अशा प्रकारे ६-७ आठवडे पर्यंत झाकून ठेवल्यामुळे आतील तापमान ५० डिग्री सेल्सिअस पर्यंत टिकून राहील. ६-७ आठवड्यांनंतर पॉलिथीन काढून टाकून आवश्यक प्रतीक्षा काळानंतर रोपवाटिका करण्यासाठी वाफे तयार करावेत. रोपवाटिकेसाठी वाफे कशाप्रकारचे बनवावे हे ऋतू (हंगाम) नुसार अवलंबून असते. सपाट वाफ्यात पाणी एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे वाहत जाते म्हणून बियाणे वाहून जाण्याची शक्यता असते भारी (चिकणमाती) जमीनची पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. म्हणून खरिफ हंगामासाठी गादीवाफे करणे फायद्याचे असते.
खरिफ कांद्याची रोपवाटिका गादी वाफ्यावर करावी. गादीवाफ्याची लांबी २-३ मी., रुंदी १-१.५ मी. आणि जमिनीपासून १५ ते २० सें.मी. उंची गरजेची असते. तण काढणे सुलभ होण्यासाठी वाफ्याची रुंदी १-१.५ मी ठेवणे गरजेचे असते. या आकाराच्या प्रति वाफ्यानुसार ८-१० किलो चांगले कुजलेले शेणखत, १५० ग्रा. १९:१९:१९ (एन.पी.के.) आणि ५० ग्रा. कॉपर ऑक्सीक्लोराईड वाफे बनवताना मातीत एकसमान मिसळून देणे फायदेकारक ठरते.

कुजलेले शेणखत, १९:१९:१९ आणि कॉपर ऑक्सीक्लोराईड . मातीत मिसळून देणे  

ट्रायकोडर्मा हर्झियानम ३० ग्रा. प्रति वाफ्याप्रमाणे चांगल्या प्रकारे कुजलेल्या सेंद्रिय खतातून मातीत मिसळावे किंवा बुरशीजन्य मर रोग नियंत्रणसाठी व निरोगी रोपे मिळण्यासाठी प्रति हेक्टर प्रमाणे १.२५  किलो ट्रायकोडर्मा वापरण्याची शिफारस देखील केलेली आहे.
एक हेक्टर क्षेत्रावर कांदा पुनर्रलागवड करण्यासाठी ८-१० किलो बियाणे आवश्यक असते. जर ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीने रोपवाटिका नियोजन केले असेल तर प्रति हेक्टर ५-७ किलो बियाणे पुरेशे असते. मागील वर्षी खरीप कांद्याच्या रोपवाटिकेत अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता जसे की, बुरशीजन्य मानमोडी रोग, रोपांच्या मुळांची सड आणि रोपे पिवळे पडणे इ. म्हणून या सर्व समश्या कमी करण्यासाठी सुरुवातीच्या काळातच रोपवाटिकेची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी अशास्रिय पद्धतीने तयार केलेले बी वापरू नये.
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास २-३ ग्रा. कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी. पॅकेटबंद उपचार केलेल्या बियाण्यास पुन्हा उपचार करण्याची आवश्यक नसते. टीप- बाजारातून आणलेल्या बियाणे पाकिटावर कोणत्या रासायनिक घटकांची प्रक्रिया झाली आहे त्याची खात्री करावी. बियाणे ओळींमध्ये १-१.५ से.मी. खोलीवर टाकावे. ओळींमध्ये ५-७.५ से.मी. अंतर ठेवावे. बियाणे टाकून त्यावर कुजलेल्या शेणखत किंवा कंपोस्ट खताच्या बारीक भुकटीचा हलकासा थर द्यावा व नंतर हलके पाणी द्यावे.

गादीवाफ्यावर कांदा रोपवाटिका

रोपवाटिकेच्या विस्तार थोडा असेल तर बियाणाची उगवण होईपर्यंत झारीने पाणी द्यावे. रोपवाटिकेच्या विस्तार मोठा असेल आणि ठिबक किंवा तुषार सिंचनाची सोय उपलब्ध नसेल तर गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या पाटातून पाणी द्यावे.
नोंद गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूच्या भुईदंडामधून पाणी वाफ्याला पुरेशे पाणी मिळाले नाही तर उगवण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो म्हणून स्प्रिंकलर किंवा ठिबक किंवा रेनगेज पाईप द्वारे पाणी देणे आवश्यक असते. हे शक्य नसेल, जमीन योग्य उताराची, पाण्याचा योग्य निचरा क्षमता असलेली असल्यास या वाफा पद्धती ऐवजी सपाट वाफा पद्धती चा अवलंब करू शकता.  
गादीवाफ्यावर ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करून देखील यशस्वीरित्या रोपवाटिका वाढविता येते. स्वस्थ आणि तंदरुस्त रोपे तयार करण्यासाठी खरीप  हंगामात कांद्याच्या रोपवाटिकेत गरजेनुसार वेळीच खुरपीने गवत काढणे महत्वाचे असते. रोपवाटिकेत तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खुरपीच्या सहाय्याने २ खुरपण्या प्रभावी ठरतात. तणनाशकाच्या सहाय्याने तण नियंत्रण करायचे असल्यास रोपे उगवण्यापूर्वी वाफ्यावर पेंडीमॅथिलीन २ मि.ली. प्रति लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व बियाणे टाकल्यानंतर २०-२५ दिवसांनी हाताने खुरपणी करावी. ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यायचे असल्यास १६ मि.मी. व्यासाच्या लॅटरल चा वापर करावा. दोन ड्रीपर मध्ये ३०-५० से.मी. अंतर असावे.
ड्रिपरची प्रति तास ४ लिटर पाणी बाहेर टाकण्याची क्षमता असावी. तुषार सिंचन ने पाणी द्यायचे असल्यास २ लॅटरल मध्ये ६ मीटर अंतर ठेवावे व नोझलची पाणी फेकण्याची क्षमता प्रति तास १३५ लिटर असावी. परंतु रोपवाटिकेच्या विस्तार लहान असेल तर या २ पद्धतीने पाणी व्यवस्थापन करणे अवघड असते. रोपवाटिकेत खरिफ हंगामात पाणी जास्त होण्याची संभावना असते म्हणून आवश्यकतेनुसार पाणी बाहेर काढून टाकावे कारण सतत पाणी साठल्यामुळे जमिनीची ऑक्सिजनची वहन क्षमता कमी होते परिमाणी रोपांना मुळांद्वारे अन्नद्रव्ये घेणे कठीण होते. अशा वेळी बुरशीची देखील वाढ होऊ शकते व रोपे पिवळी पडून मरण्याची शक्यता असते. म्हणून जमिनीपासून २ मीटर उंचीवर ग्रीन शेडनेट किंवा ६० ते १०० मेश नायलॉनची कीडरोधक जाळीच्या साहाय्याने पावसाळ्यात रोपांना संरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचे असते.
रोपवाटिकेत रोपांवर विविध कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. म्हणून निरोगी, कीड आणि रोग मुक्त रोपे मिळण्यासाठी योग्यवेळी योग्य उपाययोजना करणे गरजेचे असते. फुलकिड कांद्यातील एक प्रमुख कीड आहे. फुलकिड नियंत्रणासाठी फिप्रोनिल ५ इ.सी. १ मि.ली. किंवा कार्बोसल्फान २५ % ई.सी. २ मि.ली. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. पावसाळ्यात स्टिकरचा वापर करावा. ढगाळ हवामान आणि दव स्थिती बुरशीजन्य रोगास अनुकूल असते. काळा आणि तपकिरी करपा रोग नियंत्रण करण्यासाठी मँकोझेब २.५ ग्रा. किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रा. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
पावसाळ्यात रोपवाटिकेत सतत पाणी साठून राहणे आणि जमिनीची अयोग्य पाणी निचरा क्षमता इ. स्थिती बुरशीजन्य रोगामुळे रोपांची मूळसड, मर रोग होण्यास अनुकूल ठरू शकते. नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईडचे ३ ग्रा. प्रति लिटर पाणी प्रमाणे द्रावणाची रोपांच्या ओळीत आळवणी करावी. मर रोगापासून नियंत्रण करण्यासाठी संयुक्त बुरशीनाशक मेटॅलॅक्झिल ४ % + मेंकोजेब ६४ % २ ग्रा. प्रति लिटर पाणी प्रमाणे द्रावण करून रोपांच्या ओळीत ओतावे.

बुरशीनाशक द्रावणाची रोपांच्या ओळीत आळवणी

सतत पडणाऱ्या पावसामुळे लीचिंगद्वारे पोषक अन्नद्रव्यांच्या मोठ्या प्रमाणातील ऱ्हासामुळे रोपे पिवळी पडण्याची शक्यता असते, म्हणून बीयाने टाकल्यानंतर २० दिवसांनी १९:१९:१९ (एन.पी.के.) आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण (जस्त ३ %, लोह २.५ %, मंगल १ %, तांबे १ % आणि बोरॉन ०.५ %) ची शिफारशीनुसार किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी केल्यास अन्नद्रव्यांची कमतरता कमी करू शकतो. अन्नद्रव्य व्यवस्थापन माती परीक्षण आणि पिकांचा प्रतिसाद किंवा जेव्हा पीक अन्नद्रव्यांच्या कमतरतेचे लक्षण दर्शवतात तेव्हा करणे गरजेचे असते व हे परिस्थितीनुसार बदलत असते.

कांद्याची पुनर्रलागवड (Onion replanting)

साधारणतः रोपे ४५६० दिवसांची झाल्यानंतर त्यांची १५ x १० से.मी. अंतरावर पुनर्रलागवड करतात. साधारणतः .. से.मी. मानेची जाडी असलेली २०३५ से.मी. उंचीचे रोपे लागवड करण्यासाठी उपयुक्त मानली जातात.
लागवडीसाठी तयार झालेल्या रोपांना साधारणतः दिवस पाणी देणे बंद करावे लागवासीसाठी रोपे उखडताना दिवस अगोदर हलक्या स्वरूपात पाणी द्यावे. पुनर्रलागवड करताना वाढलेल्या रोपांचा शेंड्याकडील एक तृतीयांश भाग कापून टाकावा. कार्बोसल्फान मि.लि. कार्बेन्डाझिम ग्रा. प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात रोपांची मुळे बुडवून नंतर लागवड करावी. म्हणून बुरशीजन्य रोग किडींचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो.

कांदा रोपांच्या मुळांना प्रक्रिया

अन्नद्रव्य व्यवस्थापन (Food management)

कांद्याचे अपेक्षित उत्पादनासाठी हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत वापरावे. हेक्टरी ट्रायकोडर्मा, अझोटोबॅक्टर आणि पी.एस.बी. प्रत्येकी ५ किलो शेणखतातून देऊ शकतो. जैविक घटक हे रासायनिक घटकांबरोबर देऊ नये. जर ट्रायकोडर्मा, अझोटोबॅक्टर आणि पी.एस.बी. द्रव स्वरूपात असतील तर ठिबक संचाद्वारे देखील देऊ शकतो (साधारणतः पायाभूत रासायनिक खताच्या मात्रेनंतर १० दिवसांनी). हेक्टरी २५० किलो निंबोळी पेंड देखील देऊ शकतो. माती परिक्षणानुसार अन्नद्रव्याची (खत) मात्रा द्यावी.
कांद्यासाठी नत्र १०० किलो (युरिया २१७ किलो), स्फुरद ५० किलो (सिंगल सुपर फोस्फट ३१३ किलो) आणि पालाश ५० किलो (म्युरेट ऑफ पोटॅश ८३ किलो) प्रति हेक्टर द्यावे. अर्धे नत्र (५० किलोयुरिया १०९ किलो), पूर्ण स्फुरद आणि पालाश पुनर्लागवडीच्या वेळी द्यावे. उर्वरित नत्र (५० किलोयुरिया १०९ किलो) पुनर्लागवडीनंतर १ आणि १.५ महिन्याने सामान हप्त्याने द्यावे. खते देण्यापूर्वी माती परीक्षण करून, त्याप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याने खताची मात्रा द्यावी.
लक्षणे दिसताच शिफारस खताच्या मात्रेबरोबर किंवा पीक लागवडीनंतर ३० आणि ४५ दिवसांनी सूक्ष्मअन्नद्रव्ये मिश्रण ग्रेड -४ (लोह ४ %,जस्त ६ % मँगेनीस १ % तांबे ०.५ % बोरॉन ०.५ %) २५० ग्रा. १२५ लिटर पाण्यातून देखील फवारणी करू शकतो. सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या विविध प्रमाणातील मिश्रणांची फवारणी करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

तसेच कांदा पुनर्लागवडीनंतर ३० आणि ४५-६० दिवसांनी १९:१९:१९ (०.५ %) आणि ६०-७५ दिवसांनी १३:००:४५/०:०:५० (०.५ %) या प्रमाणात फवारणी केल्यास कांद्याची फुगवण होऊन अधिक उत्पादनात घेऊ शकतो.

भानगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथील श्री. गणेश अप्पा साबळे या शेतकऱ्याच्या फुले समर्थ वाणाच्या खरीप कांदा शेतावर डॉ. व्ही. आर. जोशी (कांदा पैदासकार) महात्मा फुले कृषिविद्यापीठ, राहुरी, श्री. शिवाजीराव जगताप (उपविभागीय जिल्हा कृषि अधिकारी) जिल्हा अहमदनगर, कृषि विभाग महाराष्ट्र शासन, डॉ. साबळे पी. . शास्रज्ञ (फलोत्पादन विभाग) सरदारकृषिनगर दांतीवाडा कृषिविद्यापीठ, रदारकृषिनगर, गुजरात आणि श्री. पी. एस. म्हस्के (तालुका कृषि अधिकारी, श्रीगोंदा) आणि इतर कृषि अधिकारी यांची भेट.

कांदा काढणी व काटणी

डॉ. साबळे पी. . शास्रज्ञ (सहायक प्राध्यापक) उद्यानविदया विभाग, के.वि.के., सरदारकृषिनगर दांतीवाडा कृषिविद्यापीठ, साबरकांठा, गुजरात आणि डॉ. सुषमा साबळे, आचार्य पदवी (कृषिविदया विभाग) महात्मा फुले कृषिविद्यापीठ, राहुरी, महाराष्ट्र
संपर्क ८४०८०३५७७२

1 thought on “खरीप कांदा शेती”

Leave a Comment