कोंबडी खताचे महत्त्व

कोंबडी खताचे महत्त्व

 
krushi kranti :- रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमिनींची प्रत बिघडत चालली आहे. सेंद्रिय खतांचा वापर त्यासाठी वाढवताना कोंबडी खताचे मूल्य समजून घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. भारतात सुमारे 6.25 ते आठ दशलक्ष टन कोंबडी खताचे वार्षिक उत्पादन होते. सध्या रासायनिक खतांच्या तसेच पाण्याच्या अति वापराने जमिनींची सुपीकता कमी होत चालली आहे.
अशा परिस्थितीत सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे झाले आहे. चेन्नई येथील तमिळनाडू पशु वैद्यक व जनावरे शास्त्र विद्यापीठातील कुक्कुटपालन शास्त्र (पोल्ट्री) विषयाचे माजी प्रमुख डॉ. डी. नरहरी म्हणतात, की ज्यावेळी पिके एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता दाखवू लागतात त्याचवेळी शेतकरी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करतात.
 
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर पुरेशा प्रमाणात केला नाही तर पीक उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. विविध संशोधन तसेच जागतिक बँक व आशियायी विकास बँकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये आढळले आहे, की सेंद्रिय खतांच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण मातीत वाढवले तर केवळ कमतरता कमी होण्यावरच त्याचा परिणाम दिसून येणार नाही, तर अन्नसाखळी द्वारे मनुष्य तसेच जनावरे यांच्या शरीरातही त्यांचा अनुकूल प्रभाव दिसून येण्यास मदत होईल.
 
जे शेतकरी रासायनिक खतांच्या वापरावर भर देतात ते देखीलआपल्या शेतात सुरवातीचे डोस’ म्हणूनगां डूळ खत किंवा शेणखताचा वापर करतात. ही अनेक वर्षांपूर्वी पासूनची पद्धत आहे.
 
सेंद्रिय खत असो वा पोल्ट्री खत वा पिकांची टाकाऊ पाने वा अवशेष असोत, त्यांचा वापर केल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते याचे महत्त्व आता पुन्हा एकदा अधोरेखित होऊ लागले आहे. शेतकरी त्यांच्या वापरावर नव्याने भर देताना दिसत आहे. विकसित देशांमधील शेतकरी याबाबत अधिक जागरूक असून सेंद्रिय खतांचा वापर वाढविल्याने रासायनिक खतांच्या वापरात दहा टक्क्या पर्यंत बचत करणे त्याला शक्य झाले आहे असे प्रा. नरहरी यांचे म्हणणे आहे.
 
दुधाळ जनावरांच्या शेणखताविषयी शेतकरी अधिक माहीतगारअसला तरी पोल्ट्री खता विषयी त्याची तुलनेने जवळीक नाही. आधुनिक पोल्ट्री उद्योग भारतात अलीकडील काही दशकांमध्ये उदयाला आला आहे. त्यामुळे पोल्ट्री खताला चांगला वाव आहे. यात ऊस, बागमळा पिके, फळ व फुलपिके अशी पिके या खताला चांगला प्रतिसाद देतात. अर्थात द्विदल वर्गीय पिकांमध्ये या खताचा वापर मार्गदर्शक नाही.
 
प्रा. नरहरी पुढे म्हणतात, की पोल्ट्री खत पॅलेट स्वरूपात आणता येते. 5 ते 25 किलोच्या बॅगेत त्याचे रूपांतर करता येते. पोल्ट्रीचा व्यवसाय करणारे शेतकरी तर आपल्या शेतातील वापरासाठी त्याचा वापर करू शकतात. या खतामध्ये नत्र, स्फुरद व पालाश हे मुख्य घटक असतातच शिवाय त्यात कॅल्शिअम हा घटकही असतो. ते मुळातच सेंद्रिय असल्याने त्याचे कंपोसिंटग करण्याची गरज भासत नाही. त्याचा शेतात थेट वापर करता येतो.
 
सुकवलेल्या एक टन केज पोल्ट्री खताचे मूल्य हे 100 किलो युरिया, 150 किलो सुपर फॉस्फेट, 50 किलोपोटॅश, 125 किलो कॅल्शिअम कार्बोनेट, 30 किलो गंधक, दहा किलो मॅग्नेशिअम सल्फेट, पाच किलो फेरस सल्फेट एक किलो मँगेनीज सल्फेट, झिंक सल्फेट आदी व अन्य अंशात्मक घटकां एवढे असते. बाजारातील अन्य खतांच्या तुलनेत त्याची किंमत ही कमी आहे. त्याचा वापर वाढवणे गरजेचे असल्याचे प्रा. नरहरी यांचे आग्रही म्हणणे आहे.
 

खताचे महत्त्व

 1. पोल्ट्री शेडमधील लिटर शेडच्या बाहेर काढल्यानंतर त्याचे व्यवस्थित थर लावावेत.
 2. एक टन कोंबडी लिटरसाठी दोन किलो कंपोस्ट जिवाणू संवर्धक मिसळावे.
 3. पुरेसा ओलावा (३० ते ४० टक्के) राहील एवढे पाणी शिंपडावे.
 4. खताच्या ढिगाची एक महिन्याच्या अंतराने २ ते ३ वेळा नियमित चाळणी करावी.
 5. खताच्या ढिगाचे तापमान ४० ते ५० अंश सेल्सिअस एवढे राखावे.
 6. चांगल्या गुणवत्तेचे कोंबडी खत तयार होण्यास पाच महिन्यांचा कालावधी लागतो.
 7. सध्या कोंबडी खत हे व्यावसायिक स्वरूपात ही तयार करतात. कोंबडी खताच्या पॅलेट ५ ते २५ किलोच्या बॅगेत मिळतात.

 

खत वापरण्याची पद्धत

 • मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर कोंबडी खत जमिनीत मिसळावे. यानंतर कुळवाची पाळी द्यावी.
 • ताजे कोंबडी खत उभ्या पिकात, जमिनीत मिसळू नये. जर उभ्या पिकात द्यायचे असेल तर एक महिना अगोदर पाणी शिंपडून ते थंड होऊ द्यावे. म्हणजे त्याचे कर्ब नत्र गुणोत्तर स्थिर राहते. त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.
 • उभ्या पिकात खत देताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. नसेल तर पीक पिवळे पडते. ताजे कोंबडी खत लगेच पिकांना वापरू नये.
 • जमीन व पीक लागवडीनुसार प्रति एकरी ५ ते २० टन खताचा वापर करावा.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हवे :

जमिनीची सुपीकता घटत चालल्याचे मुख्य उदाहरण पाहण्यास मिळते ते ऊस शेतीत. या पिकामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन संकल्पना राबवणे गरजेचे झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शेणखत, कंपोस्ट किंवा प्रेसमड यांचा वापर त्यासाठी महत्त्वाचा आहे. तागा सारखे हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणून घेऊन लागवडीनंतर सुमारे 30 ते 45 दिवसांनंतर त्याचा वापर खत म्हणून करण्याची पद्धत आता अनेक शेतकरी वापरू लागले आहेत.
उसाच्या पानांमध्ये लोह किंवा जस्ताची कमतरता आढळल्यास फेरस सल्फेट व झिंक सल्फेटचा वापर करणे गरजेचे आहे. अझोस्पिरीलम आणि फॉस्फोबॅक्टेरिया यांचा वापर ही तितकाच महत्त्वाचा आहे. मातीचा सामूही नियंत्रित ठेवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ पुढे म्हणतात.

Leave a Comment