Latur market : सोयाबीन एक हजार रुपये कमी दराने विक्रीची नामुष्की

Latur market : सोयाबीन एक हजार रुपये कमी दराने विक्रीची नामुष्की

लातूर : ज्याची भीती होती तेच आता सोयाबीनच्या बाबतीत होताना दिसत आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात दरात कमालीची घसरण झाली आहे. जानेवारीत 7 हजार 300 पोहचलेले सोयाबीन आता थेट 6 हजार 300 रुपये क्विंटलप्रमाणे विक्री करण्याची नामुष्की ओढावली आहे. शिवाय सध्या खरीप हंगामातील पेरणीची लगबग सुरु असून पिक पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज भासली आहे. त्यामुळे तब्बल 6 महिने सोयाबीन साठवून ठेऊनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. गेल्या तीन महिन्यापासून दरात वाढ तर झालीच नाही पण दिवसेंदिवस घट होऊन लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 6 हजार 300 असा दर मिळत आहे.

मागणी घटल्याने ओढावली परस्थिती

हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना सोयाबीनच्या मागणीत वाढ होऊन अपेक्षित दर मिळेल असा आशावाद प्रत्येक शेतकऱ्याला होता. पण सोयाबीनची मागणीच घटली आहे. प्रक्रिया उद्योगवाले देखील लागेल तेवढ्याच मालाची खरेदी करतात. साठवणूक करण्याची पध्दत आता मोडकळीस येऊ लागली आहे. शिवाय साठवणूकीवर शासनाकडून निर्बंधही आहेत. असा प्रतिकूल परस्थितीमुळे सोयाबीनच्या दरात घट होत आहे.

काय आहे सध्या दराची अवस्था?

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही सोयाबीनसाठी प्रसिध्द आहे. मराठवाड्यातून सोयाबीन या मार्केटमध्ये दाखल होते. पण यंदा शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. विक्रमी दर तर सोडाच पण सरासरीप्रमाणे सोयाबीनला किंमत मिळालेली नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनला 7 हजार 300 असा दर होता. तरी देखील अनेक शेतकऱ्यांनी त्याची साठवणूक केली त्याचेच आता परिणाम भोगावे लागत आहेत.

हे पण वाचा : Monsoon Updates आगामी पाच दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज 

खरिपामुळेच विक्रीची नामुष्की

राज्यात पावसाने हजेरी लावल्याने खरीप पेरणीच्या कामांना आता गती आली आहे. शिवाय पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे, खते त्याच बरोबर पेरणी आणि फवारणीचा खर्च पाहता एकरी 8 ते 10 हजार खर्च आहे. खरिपाची पेरणी करण्यासाठीच शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करावे लागत आहे. त्यावरच ही परेणी अवलंबून आहे. सोयाबीन विक्रीतून मिळालेल्या पैशावरच यंदाची खरिपातील पेरणी पूर्ण होणार आहे.

source : tv9 marathi