लातूर मार्केट : सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा!

लातूर मार्केट : सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा!

 
सोयाबीनच्या दरात पुन्हा चढ-उतार सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता योग्य संधी साधून सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला तर एवढ्या दिवस केलेल्या साठवणूकीचा फायदा होईल. गेल्या 15 दिवसांपासून सोयाबीनचे दर हे 7 हजार 200 वर स्थिरावले होते. गुढी पाडव्यानंतर पुन्हा सोयाबीनच्या दरात दिवसाकाठी सुधारणा होऊ लागली आहे. बुधवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 7 हजार 350 रुपये क्विंटल असा दर मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी साठवणूकच करणार की विक्रीचा निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे. कारण उन्हाळी हंगामातील सोयाबीनही आता मार्केटमध्ये दाखल होईल शिवाय रशिया-युक्रेनचाही परिणाम कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यात दर कमी झाले तर पुन्हा वाढतील का नाही याबाबत व्यापारीही संभ्रमात आहेत. त्यामुळे शेतकरी काय निर्णय घेणार यावरच सर्वकाही अवलंबून आहे. सध्या लातुरात 25 हजार पोत्यांची आवक सुरु आहे.

सोयाबीन वाढले तुरीच्या दरात घट

गेल्या तीन ते चार दिवसांपासून सोयाबीन दिवसाकाठी 50 ते 100 रुपयांनी वाढत आहे. त्यामुळेच 7 हजार 200 वर आलेले सोयाबीन आता पुन्हा 7 हजार 350 वर य़ेऊन ठेपले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी साठवणूक केली होती त्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे तुरीच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. केंद्र सरकारने डिसेंबरपर्यंत तुरीची आयात ही सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम थेट तुरीच्या दरावर दिसून येत आहे. कारण चार दिवसांपूर्वीच तूर ही 6 हजार 500 रुपये क्विंटलवर होती. बुधवारी मात्र, चित्र बदलले होते. तुरीला 6 हजार 350 प्रमाणे दर मिळाला आहे. तुरीचे दर हमीभावा समानच झाले आहेत. सरकारच्या निर्णयाचाच फटका असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकरी काय निर्णय घेणार?

सोयाबीनचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. अवघ्या काही दिवसांनी पुन्हा उन्हाळी सोयाबीनची आवक सुरु होणार आहे. यंदा केवळ बियाणापुरते नाही तर उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचा पेरा केला होता. हे सोयाबीन जोमात असून लवकरच याची आवक सुरु होणार आहे. त्यामुळे खरिपातील साठवलेले सोयाबीन शेतकऱ्यांनी आता विकले तर फायद्याचे राहणार असल्याचे व्यापारी अशोत अग्रवाल यांनी सांगितले आहे. आता दर वाढत आहेत म्हणून शेतकरी काय भूमिका घेणार हे देखील तेवढेच महत्वाचे आहे.
source:- tv9 marathi

Leave a Comment