Milk Rate : दूध उत्पादनात महाराष्ट्र अव्वल स्थानी, रेट वाढले तरी उत्पादकांची निराशा कायम

Milk Rate : दूध उत्पादनात महाराष्ट्र अव्वल स्थानी, रेट वाढले तरी उत्पादकांची निराशा कायम

 
एप्रिल महिन्यात एक नव्हे तर दोनवेळा  दूधाच्या दरात वाढ झाली आहे. असे असतानाही दूध उत्पादकांच्या वाटेला आलेली निराशा ही कायम आहे. कारण दूध दर वाढीच्या तुलनेत पशूखाद्यांचे दर दुपटीने वाढत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात दूधाचे उत्पादन सर्वाधिक असले तरी दर मात्र, इतर राज्यांच्या तुलनेत कमीच आहेत. सध्याचे दूधाचे दरआणि उत्पादनावर होत असलेला खर्च पाहता शेतीचा मुख्य जोड व्यवसायही तोट्यातच असल्याचे दिसून येत आहे.दूधाचे दर हे सहा महिन्यातून एकदा वाढतात तर पशूखाद्याच्या दरात महिन्याकाठी वाढ होत आहे. शिवाय होत असलेली दूध दरवाढ ही सरसमान नसून यामध्येही तफावत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे दूध उत्पादनात महाराष्ट्र अव्वल असला तरी दराच्या बाबतीत चिंतेचा विषय आहे.

4 वर्षातून एकदा झाली दूध दरात वाढ

एप्रिल महिन्याच्या सुरवातीला दूध दरात झालेल्या वाढीचा मोठा गाजावाजा होत आहे. पण ही वाढ तब्बल 4 वर्षानंतर झालेली आहे. शिवाय गायीच्या दूध दरात 3 रुपये तर म्हशीच्या दूध दरात 2 रुपये लिटरमागे वाढ झाली आहे. तर दुसरीकडे खुराक, कळणा, पेंड तसेच हिरवा चारा यामध्ये सहा महिन्यातून वाढ ही ठरलेलीच आहे. त्यामुळे दूधाच्या दरात वाढ झाली तरी शेतकऱ्यांच्या पदरात काय हा सवाल कायम आहे.

दूध उत्पादनात महाराष्ट्र अव्वल स्थानी

प्रतिकूल परस्थितीमध्येही दूध उत्पादनात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. सन 2020-21 मध्ये देशाचे वार्षिक उत्पादन हे 63 कोटी 20 हजार लिटर एवढे होते. यामध्ये सर्वाधिक वाटा हा महाराष्ट्राचा होता. अजूनही शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशूपालनाकडेच पाहिले जाते. पण जनावरांचा सांभाळ, शेतकऱ्यांचे परिश्रम आणि मिळणारा दर यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे दूध व्यवसयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू लागला आहे.
हे पण वाचा:- खत अनुदान वाढीनंतर ‘या’ गोष्टीचा धोका..!

पशुखाद्याचे असे वाढले दर

दूधाच्या दरात वाढ झाली तर ती 1 किंवा 2 रुपयांनी वाढ होते. मात्र, गेल्या पाच महिन्यांमध्ये खाद्यच्या दरात दुपटीने वाढ झालेली आहे. कळण्याचे 50 किलोचे पोते हे 600 वरुन 1000 वर गेले आहेत. मक्यापासून बनवलेली कांडी ही 1000 हून 1400 तर सरकी 600 वरुन 1000 वर तर खापरी पेंडीचे दर हे चार महिन्याखाली 2000 वर होते तेच दर आता 2700 वर गेले आहेत. त्यामुळे मेहनत आणि खर्चाचा विचार करता शेतीचा मुख्य जोडव्यवसाय हा अडचणीत आलेला आहे.
संदर्भ:- tv9 marathi
लेखक: राजेंद्र खराडे 

Leave a Comment