फायदेशीर दुग्धव्यवसाय

फायदेशीर दुग्धव्यवसाय
काटेकोर व्यवस्थापनातून फायदेशीर दुग्धव्यवसाय
दुग्धव्यवसायात जनावरांना संतुलित खाद्यपुरवठा न झाल्यास दुग्धोत्पादनात घट, दर्जात घट, प्रजनन समस्या अगदी  समस्या निर्माण होतात. त्यामुळे शारीरिक पोषण, वाढ, दुग्धोत्पादन आणि  प्रजननासाठी गायी म्हशींच्या आहारात  उत्तम दर्जाचे पशुखाद्य, हिरवा चारा, वाळलेला चारा, खनिज मिश्रणे व जीवनसत्वे यांचा समावेश असे आवश्यक आहे.
दुग्धव्यवसायातील व्यवस्थापनाच्या काही महत्वाच्या टिप्स
आपल्याकडील जनावरांची संपूर्ण वंशावळ, प्रजाती, वय, रंग, विशेष खुणा, विण्याची तारीख, किती वेळा व्याल्याची नोंद, दूध उत्पादन, माजाची तारीख यांच्या नोंदी करून ठेवाव्यात.
जनावरांच्या खाद्यावर ७० टक्के खर्च होतो. त्यामुळे चाऱ्याचे खात्रीशीर नियोजन करून ठेवावे. घरच्या शेतात अर्धा ते दीड एकरावर ज्वारी, बाजरी, भुईमूग इ. हंगामी आणि  डी. एच. एन. – ६, ल्यूसर्न, जयवंत इ. बहुवार्षिक चारापिकाची लागवड करावी.
खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी जनावरांना पोषक आहार बनविण्यासाठी स्थानिक बाजारपेठेत काय उपलब्ध आहे? याची चाचपणी करावी. उदा. तुरीची चुणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल, तर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने संतुलित आहार तयार करावा. घरच्या घरी पशुखाद्य तयार केल्यास किलोसाठी १५ ते १६ रु. खर्च येतो. तर, बाजारातील विकतचे खाद्य २४ ते २५ रु. किलो दराने मिळते.
बाजारात शेतमालास कमी दर मिळत असल्यास अशा पिकांचा किंवा धान्याचा जनावरांच्या आहारात पशुवैद्यकाच्या सल्ल्याने समावेश करावा.
जनावरांचा गोठा कमीत कमी खर्चात तयार करावा. ऊन, वारा व पाऊस यांपासून जनावरांचे संक्षण होईल, अशा प्रकारचा गोठा बांधावा. खाद्य खाण्यासाठी गव्हाण असावी. सिमेंटपासून बनविलेल्या जमिनीवरून मूत्र वाहून जाईल एवढा उतार द्यावा. सिमेंटची जमीन करताना, सिमेंट ओले असताना खराटा फिरवावा, त्यामुळे जमीन खडबडीत होते. छताची उंची मध्यभागी १५ फुटांपर्यंत असल्यास उत्तम. उन्हाळ्यात उन्हाच्या झळा गोठ्यात येऊ नये म्हणून हिरव्या शेडनेटचा उपयोग करावा. गोठा थंड राहण्यासाठी छतावर पाण्याचे स्प्रिंकलर लावावेत किंवा छतावर भाताचे काड अथवा इतर पालापाचोळा पसरावा.
जनावरांना उन्हाळ्यात सकाळी ८ पूर्वी व संध्याकाळी ६ नंतर खाद्य द्यावे.
ब्रशच्या साहाय्याने खरारा करावा त्यामुळे जनावरांचे रक्ताभिसरण सुधारते. जनावरांना ताजे-तवाने वाटते.
जनावरांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पावसाळ्यापूर्वी व हिवाळ्यापूर्वी आवश्‍यक ते रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे. जसे घटसर्प, लाळ्याखुरकुत या रोगासाठी पावसाळ्यापूर्वी लसीकरण करावे. त्याचप्रमाणे हिवाळ्यापूर्वी लाळ्याखुरकुत या रोगाचे लसीकरण करावे. लसीकरण करण्याआधी जंतनाशकाची मात्रा द्यावी.
जनावरांच्या डोळ्यांचा अंतत्वचेचे निरीक्षण करावे. अंतरत्वचा जास्त फिक्कट तर नाही? याची खात्री करावी. डोळ्यांच्या अंतत्वचेचे निरीक्षण करण्यासाठी, जनावरांस योग्य प्रकारे नियंत्रित करावे. नंतर डोळ्यांवरील वरची पापणी (डोळ्यांवर) हाताच्या एका बोटाने दाबावी. दुसऱ्या हाताच्या बोटाने डोळ्याची खालची पापणी, खालच्या बाजूस हळूच (कातडीस) ओढावी, असे केल्याने खालच्या पापणीच्या अंतत्वचा दिसते. यावरून जनावरांच्या शरीरात रक्ताबाबत अंदाज येतो. अंतत्वचा फिक्कट असल्यास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशकाची मात्रा द्यावी.
उत्तम आरोग्याचे लक्षण म्हणजे गाईच्या शरीरातील फक्त शेवटच्या तीन बरगड्या दिसायला हव्यात, जास्त बरगड्या दिसत असतील, तर गाय हडकुळी अाहे, असे समजावे. गाईची पशुवैद्यकाकडून तपासणी करावी. जर, गाईच्या शेवटच्या तीन बरगड्या दिसत नसतील, तर ती लठ्ठ आहे, असे समजावे व समतोल आहार द्यावा.
व्याल्यानंतर गाय ८५ दिवसांत गाभण राहायला हवी. म्हणजे दर वर्षी एक वासरू व एक वेत मिळेल.
दुधाचा रतीब ग्राहकांना एकसारखा ठेवण्यासाठी, नेहमी ७० टक्के जनावरे ही दुधात असायला हवीत. त्यासाठी उदा. एका पशुपालकाकडे १० गाई असल्या, तर साधारणतः दर महिन्याला एक गाय व्यायला पाहिजे व एक गाभण जायला पाहिजे. म्हणजे ग्राहकांना कायमचा संतुलित दूधपुरवठा करणे शक्य होते. त्यासाठी माज ओळखण्याचे तंत्र अवगत करायला हवे.
गाभण गाई-म्हशींची विशेष काळजी घ्यावी. गाभण गायी-म्हशींना २ किलो जास्तीचा, पूरक आहार द्यावा. गाभण जनावरांना मारक्या जनावरांपासून वेगळे ठेवावे.
विण्याच्या तारखेची जवळच्या पशुवैद्यकास कल्पना देऊन ठेवावी व आपलेसुद्धा बारीक लक्ष असू द्यावे. शक्य झाल्यास जनावरे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत ठेवावे. गायी-म्हशीची प्रसूती पशुवैद्यकाच्या निगराणीत करावी.
जनावरांच्या खुरांची जास्त किंवा असमान वाढ झाल्यास, जनावरांच्या सांध्यावर परिणाम होतो. परिणामी, पाय दुखतात, जनावरे सतत पाय दुखत असल्याने अन्न ग्रहण कमी करतात म्हणून दूध कमी देतात, वजन वाढत नाही. म्हणून खुरांची योग्य झीज होण्यासाठी, जनावरे जास्तीत जास्त वेळ, मातीच्या जमिनीवर राहतील, याकडे लक्ष द्यावे. नियमित खुरांची कापणी करावी.
दुधाळ जनावरांना दररोज ५० ते १०० ग्रॅम खनिज मिश्रण खाऊ घालावे. त्यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होते; तसेच प्रजनन नियमित होते.
https://en.wikipedia.org/

Leave a Comment