धान्य व कडबा उत्पादनासाठी उन्हाळी बाजरी लागवड

धान्य कडबा उत्पादनासाठी उन्हाळी बाजरी लागवड

 
बाजरी हे अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे.  बाजरी पिकावर कीड, रोग आणि तणांचा जास्त प्रादुर्भाव होत नसल्यामुळे धान्य आणि कडबा हे दोन्ही उत्पन्न जास्त मिळते, त्यामुळेच बाजरीला गरिबांचे अन्न असेही म्हटल्या जाते
इतर तृणधान्या पेक्षा बाजरी हे पीक सर्वात जास्त ऊर्जा देते. १०० ग्रॅम बाजरी मधून ३६० कि. कॅलरी एवढी ऊर्जा आपल्याला मिळते. याशिवाय बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण १२ ग्रॅम, स्निग्ध पदार्थ ५ ग्रॅम, पिस्टमय पदार्थ ६७ ग्रॅम, कॅल्शियम ४२ मि. ग्रॅम व लोह ६० पीपीम इतक्या प्रमाणात असते.

उन्हाळी हंगामात हे पीक घेण्याची प्रमुख कारणे:-

१) उन्हाळ्यात हवामान कोरडे असल्याने अरगट, गोसावी व तांबेरा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो त्यामुळे धान्य व कडब्याची गुणवत्ता चांगली मिळते.
२) संरक्षित पाण्याची सोय असल्यास, खरीप हंगामातील बाजारीपासून येणाऱ्या उत्पादनापेक्षा उन्हाळी बाजारीपासून जास्त उत्पादन मिळते.
जमीन:- उन्हाळी बाजरी हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येऊ शकते. मध्यम ते भारी स्वरूपाची व  पाण्याचा निचरा होणारी तसेच ६.५ ते ७.५ च्या दरम्यान सामू असणारी जमीन आवश्यक आहे.
पूर्वमशागत:- पेरणीपूर्वी एक खोल नांगरणी व वखराच्या दोन आडव्या उभ्या पाळ्या देऊन शेवटच्या पाळी वेळेस जमिनीत १० ते १५ बैलगाड्या शेणखत पसरावे, त्यानंतर पेरणी करावी.
हवामान:- बाजरी पिकास उष्ण व कोरडे हवामान पूरक ठरते. या पिकाची वाढ 23 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमानात चांगली होते.तसेच पिकाच्या संपूर्ण जीवनकाळात स्वच्छ सूर्यप्रकाश हा उत्पादन वाढीस आवश्यक ठरतो.
पेरणीची कालावधी:- उन्हाळी बाजरीची पेरणी २५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करावी. उशिरा पेरणी केल्यास उत्पादनात सरासरी घट होण्याची शक्यता असते.
पेरणीची पद्धत:- जमीन ओलावून वाफसा आल्यावर दोन चाड्याच्या पाभरीने किंवा बियाणे हाताने जमिनीवर पसरून पेरणी करावी. बियाणे २ ते ३ सेंटिमीटर पेक्षा जास्त खोलीवर जाणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण बाजरीचा दाणा बारीक असल्याने खोलवर गेलेला दाणा उगवणार नाही.

बीजप्रकिया:-

) २०% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया: यामध्ये दोन किलो मीठ हे दहा लिटर पाण्यामध्ये विरघळावे व त्यात बी टाकावे,२० मिनिटानंतर पाण्यावर तरंगणारे बियाणे बाजूला काढून त्याचा नाश करावा. तळाला साचलेले बियाणे वेगळे काढून त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत वाळवावे व पेरणीसाठी वापरावे.
अरगट रोगासाठी ही बीजप्रकिया आवश्यक आहे.
आ) अँझोस्पिरिलम व पीएसबी प्रक्रिया: यामध्ये प्रति किलो बियाणास १० ते १५ ग्रॅम अँझोस्पिरिलम व पीएसबी या जीवणुसंवर्धनाची बीजप्रकिया करावी, असे केल्यास नत्र खतामध्ये २० ते २५ % बचत होते.
बियाणे:- बाजरी पेरणीसाठी ४ ते ५ किलो प्रति हेक्‍टर इतके बियाणे वापरावे. दोन ओळींमधील अंतर 45 सेंटिमीटर आणि दोन झाडांमधील अंतर १० ते १२ सेंटीमीटर ठेवावे, असे केल्यास हेक्टरी १,७५,००० ते २,००,००० एवढे झाडे आढळून येतात, जे सरासरी उत्पादनास उपयुक्त आहे.

वाणांची निवड:-

अ. क्र. वाणांचे नाव कालावधी
(दिवस)
 उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी) वाणांचे गुणधर्म
 श्रद्धा ७५-८० २५-३० अधिक उत्पादनक्षमता व केवडा रोगास बळी पडत नाही.
सबुरी ८५-९० ३०-३५ या वाणाच्या कणसावर केस असल्याने पक्षांचा उपद्रव कमी प्रमाणात होतो
जी.एच. बी-५५८ ७५-८० ३०-३५ दाणा टपोरा,लांब कणसे,फुटव्यांची संख्या ४ते ५, उन्हाळ्यासाठी अत्यंत उपयुक्त वाण
ए. एच.बी-१६६६ ७५-८० ३०-३५ गोसावी रोगास प्रतिकारक,इतर वाणांपेक्षा १५-२०% धान्याचे व २०% कडब्याचे अधिक उत्पन्न
ए. आय.एम. पी-९२९०१(समृद्धी) ८०-९० २०-२५ दाण्याचा रंग हिरवा व टपोरा, भाकरीची गुणवत्ता उत्तम,गोसावी रोगास प्रतिकारक,अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी योग्य.
शांती ८५-९० २५-३० गोसावी रोगास प्रतिकारक, दाण्याचा रंग राखी, कंसात घट्ट दाणे भरतात.

खत व्यवस्थापन:- 

उन्हाळी बाजरी साठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 40 किलो पालाश प्रति हेक्‍टरी याप्रमाणे वापरावे. त्यातील अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उर्वरित नत्र पेरणीनंतर ३-४ आठवड्यानंतर द्यावे.

पाणी व्यवस्थापन:-

पेरणीनंतर पिकास चौथ्या दिवशी हलके पाणी द्यावे, पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीच्या क्षमतेनुसार १० ते १५ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या ४ ते ५ पाळ्या द्याव्यात.
पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास पीक वाढीच्या अवस्थेत पाणी द्यावे. पहिले पाणी फुटवे वेळी, दुसरे पाणी पीक पोटरीत असताना व तिसरे पाणी दाणे भरण्याच्या वेळी द्यावे.

तण नियंत्रण:-

पेरणी केल्यापासून सुरुवातीचे तीन ते पाच आठवडे शेत तण विरहित ठेवावे. शेतामध्ये दोन वेळा खुरपणी व दोन वेळा कोळपणी करावी. जास्त खोलवर झाडाच्या मुळाशी कोळपणी टाळावी जेणे करून झाडाचे मूळ खराब होणार नाहीत. पीक उगवणीपूर्वी अट्रॅझिन ५० डब्ल्यू. पी. १.२५ किलो ग्रॅम  प्रति हेक्‍टरी ६०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. व एकात्मिक पद्धतीने तण नियंत्रण करावे.

कीड रोग व्यवस्थापन:-

कीड: केसाळ अळी व हिरवट सोनेरी रंगाचा सोंड किडा या दोन किडींचा बाजरी या पिकावर मोठा प्रादुर्भाव आढळतो. पीक फुलोऱ्यात असताना या किडी दिसून येतात. या किडींचा नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस १.५ हेक्टरी २० किलो या प्रमाणात धुरळावी. ही धूरळणी पीक फुलोऱ्यात असताना करावी.
रोग: गोसावी (केवडा) व अरगट(चिकटा) या रोगांचा प्रादुर्भाव उगवणी पासून ते दाणे भरेपर्यंत आढळतो. गोसावी या रोगामुळे रोपे पिवळी पडतात व वाढ खुंटून फुटवे फुटतात, काही वेळेस रोपे मरूनही जातात. तर अरगट या रोगामुळे फुलोऱ्यात काळसर चिकट द्रव्य पाझरतो व त्यामुळे कंसात दाणे भरत नाहीत.
या रोगांचा प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून नायनाट करावा. मेटॅलॅक्झिल एम.झेड.७२ ही पावडर ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर २०-२५ दिवसांनी फवारावे. तसेच कॉपर ओक्झिक्लोराईड हेक्टरी एक किलो प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
काढणी:- दाणे दाताखाली दाबल्यानंतर कट्ट असा आवाज आल्यास किंवा हातात कणीस दाबले असता त्यामधून दाणे बाहेर आल्यास पीक काढणीस आले असे समजावे. झाडे जमिनीलगत कापून दोन ते तीन दिवस शेतात वाळू द्यावे, त्यांनतर कणसे कापून वेगळी करून मळणी करून घ्यावी व झाडाच्या पेंढ्या बांधून कडबा म्हणून साठवून ठेवावा किंवा लगेच गुरांना खायला घालावा.
उत्पादन:- उन्हाळी बाजरी पासून प्रति हेक्टरी ३०-३५ क्विंटल धान्य आणि ५०-६० क्विंटल कडबा असे उत्पादन मिळते.
हे पण वाचा:-

 
 

                                                                गणेश घुगे, ज्योती जायभाये(घुगे) , संजय बडे

                                                                                             सहायक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग,

                                                                                         दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव

                                                                                ता. वैजापूर जि. औरंगाबाद, ४२३७०३, (८६००७०५७६८)

Leave a Comment