शेवगा लागवड

शेवगा लागवड
 
शेवगा हे एक कमी पाण्यात येणारे पिक आहे.
शेवग्याची लागवड हि प्रामुख्याने दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर केली जाते. बाजारात आज उपलब्ध असलेल्या विविध जाती साधारणतः २०० ते ३०० शेंगा एका झाडापासुन देतात. मुख्य पिक आणि बांधा वरिल पिक म्हणुन देखिल शेवग्याची लागवड करता येणे शक्य आहे.
भारतात आंध्र प्रदेश, तमिलनाडु, आणि कर्नाटक राज्यात शेवग्याची फार मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. भारतातील एकुण शेवगा शेंगांचे उत्पन्न हे २.२ मिलियन टन ईतके आहे. भारतात शेवग्याची लागवड एकुण ३८००० हेक्टर क्षेत्रावर केली जाते. त्यात आंध्र प्रदेश लागवड आणि उत्पादनात क्रमांक एक चे राज्य आहे (क्षेत्र १५६६५ हे.) त्यानंतर कर्नाटक (१०,२८० हे.) आणि तमिलनाडु (७४०८ हे.) (आकडे सन २००४)
दक्षिण भारतातुन जुलै ते सप्टेंबर आणि मार्च – एप्रिल महिन्यात शेवग्याची आवक जास्त असते.
भारत देशा व्यतिरिक्त पाकिस्तान, श्रीलंका, जमैका, सिंगापुर, क्युबा, आणि ईजिप्त देशात शेवग्याची लागवड केली जाते.
तमिलनाडु राज्यात उन्हाळाच्या दिवसात शेवग्याची आवक मोठ्या प्रमाणावर असते.
 

जमिन व हवामान

शेवगा पिकाची लागवड हि उष्ण व समशितोष्ण अशा दोन्ही हवामानात केलेली चांगली ठरते. या पिकास जास्त तापमान आणि अती कमी तापमान सहन होत नाही. जमिन भुसभशीत आणि सेंद्रिय पदार्थ युक्त अशी असावी. ज्या जमिनीते क्ले (clay) चे प्रमाण जास्त आहे अशा जमिनीत लागवड शक्यतो करु नये, पाणी धरुन ठेवणारी जमिन पिकांस मानवत नाही. २५ ते ३० डि.से. तापमान पिकाच्या वाढीसाठी अत्यंत पोषक ठरते. कमी पाण्यात येणारे हे पिक, पाणी मिळाल्यास फुलो-यावर येण्यास उत्सुक असते. तापमान ४० डि. से. पेक्षा जास्त झाल्यास फुलगळ होते, आणि रात्रीचे तापमान १६ डि.से. पेक्षा कमी झाल्यास फळ धारणा होत नाही. (प्रभाकर et.al 2003). शेवगा ४८ डि.से. तापमानत देखिल तग धरु शकतो. (पालदा आणि चँग et.al.2003)
 

लागवड पध्दती
शेवगा पिकाची लागवड बीयांपासुन तसेच काड्यांपासुन केली जाते. काड्यांपासुन केली जाणारी लागवड हि बहुवार्षिक शेवग्याची केली जाते, वार्षिक शेवग्याची लागवड हि बियांपासुन करतात. साधारणतः १० ग्रॅम वजनात ३५ बिया असतात. (प्रती बी साधारणतः ०.२८८ ग्रॅम वजन). १ एकर क्षेत्रात लागवडी करिता २५० ग्रॅम बियाणे पुरेसे ठरते. (जवळपास एकुण ८७५ बिया, एक एकर क्षेत्रात २.५ x २.५ मीटर अंतरावर लागवड केल्यास ६४० रोप बसते.) बेड तयार करुन किंवा प्लास्टिक पिशव्या भरुन रोपांची निर्मिती केली जाते. बी लागवडी नंतर साधारणतः ३० दिवसांत रोप पुर्नलागवडीसाठी तयार होते. पिशवीत बीयांची लागवड ही २ से.मी. खोलीवर करावी. त्यात पिशवी भरण्यासाठी गाळ, माती, तसेच पुर्णपणे कुजलेले शेणखत किंवा त्याहुन अधिक उत्तम असे निंबोळी पेंड चा वापर करता येईल.
शेवगा पिकाची लागवड पाऊस पडल्यानंतर करावी, पाण्याची उपलब्धता असेल तर जुन-जुलै महिन्यात पाऊस वेळेवर नाही आला तरी लागवड केलेली चालते. उन्हाळ्यात आणि जास्त थंडीत लागवड करु नये.
साधारणतः महिन्यातुन एकदा पाणी दिले तरी हे पिक उत्पादन देण्यास सक्षम आहे. जमिनीच्या प्रकारानुसार ड्रिप ईरिगेशन असेल तर एका रोपाला शेवगा पिकाची २.५ x २.५ मीटर वर लागवड केल्यास एकरी ६४० रोप बसते. (१६०० रोप प्रती हेक्टर) लागवड करण्यापुर्वी ४५ x ४५ x ४५ से.मी. आकाराचे खड्डे घेवुन त्यात शेणखत, गांडुळ खत, मॅन्कोझेब, सिंगल सुपर फॉस्फेट मातीत टाकुन त्यानंतर खड्डे भरुन लागवड करावी.
शेवगा लागवडीनंतर ७० ते ७५ दिवसांनी त्याचा वाढणारा शेंडा खुडल्यास जास्त प्रमाणात फांद्या मिळुन फळांची संख्या वाढविण्यात मदत मिळते. ६० ते ७५ दिवसांत केलेल्या शेंडा खुडणे या क्रियेमुळे जास्तीत जास्त फांद्या मिळतात, त्यानंतर केलेल्या अशा प्रक्रियेमुळे मात्र हव्या त्या प्रमाणात जास्त फांद्या मिळत नाहीत. एका रोपास ६ ते १० फांद्या ठेवणे फायदेशीर ठरते.
खोलवर जाणारे सोटमुळ, कमीत कमी अशा संख्येत असणा-या जमिनीस समांतर लांब जाणा-या मुळ्या (Lateral roots) आणि जमिनीवर पडणारी अल्प अशी सावली यामुळे शेवगा हे पिक उत्तम आंतरपिक म्हणुन योग्य ठरते. शिवाय शेवगा पिकाच्या जमिनीवर पडणा-या पानांमुळे नविन लागवड होणा-या पिकावरिल पिथियम रोगाचे देखिल नियंत्रण होण्यास मदत मिळते.
पीकेव्ही १ हि जात अशा लागवड पध्दतीसाठी योग्य ठरते. शेवग्याची छाटणी केल्यानंतर त्याच्या फांद्या पाने जमिनीवर नैसर्गिक आच्छादन म्हणुन टाकली जातात. अशा प्रकारच्या नैसर्गिक आच्छादनामुळे जमिनीची धुप थांबविण्यात मदत मिळते, पाणी बाष्पीभवनाव्दारे उडुन जाण्याचे प्रमाण कमी होते आणि कालांतराने जमिनीत नैसर्गिक असे सेंद्रिय खत देखिल मिसळले जाते.
शेवगा पिक बहुतेक वेळेस मिरची, वांगी, कांदा, गवार, पिकात आंतरपिक म्हणुन दक्षिणे कडिल राज्यात घेतले जाते. गुजरात राज्यातील वडोदरा, अहमदाबाद तसेच काही इतर भागात शेवगा हे पिक बरेच ठिकाणी बांधावरिल पिक म्हणुन एक अतिरिक्त उत्पादन देणारे पिक आहे.

फुलोरा आणि फळ धारणा

शेवगा पिकांस अनेक वेळेस वर्षभर फुले येत राहतात. परंतु प्रामुख्याने ऑक्टोबर ते नोव्हेंबर आणि एप्रिल ते मे या काळात आर्थिक फायदा मिळवुन देतील ईतकी फुले जास्त प्रमाणात मिळतात.
फुल उमलल्यानंतर परागकण सकाळी ९ ते १० आणि त्याच दिवशी संध्याकाळी ६.३० ते ७ यावळेत जास्त सक्रिय असतात. शेवगा पिकांत परागीभवन क्रियेत मदत करणारे घटक जसे मधमाशी उपलब्ध असल्यास फळ धारणा हि एकुण फुलांच्या ६४ ते ६८ टक्के ईतकी असते, तर मधमाशांच्या अनुपस्थितीत फळ धारणा केवळ ४२ ते ४७ टक्के ईतकी असते. म्हणजेच एकंदर ५० टक्के उत्पादन हे केवळ मधमाशांच्या उपस्थितीत वाढते. जे शेतकरी मधमाशा पालन आणि सोबत शेवगा लागवड करु ईच्छितात त्यांनी २० ते २५ शेवगा रोपांच्या साठी एक मधमाशांचे लाकडी बॉक्स ठेवण्यास हरकत नाही.
फुल उमलल्या नंतर ६५ ते ७५ दिवसांत फळ जास्तीत जास्त लांबी आणि वजन प्राप्त करते.
शेवगा पिकात फळ काढणीनंतर रोप जमिनीपासुन साधरणतः १ मीटर अंतरावर कापुन टाकतात, जेणे करुन नवीन फुट येवुन त्यावर हवामानानुसार ४ ते ६ महिन्यात पुन्हा फळधारणा होते. तसेच फळे हाताने काढता येतिल अशा उंचीवर रोपाची वाढ होते.

खत व्यवस्थापन

शेवगा हे पिक तसे रासायनिक खतांच्या बाबतीत फार चोखंदळ असे पिक नाही.
शेवगा पिकाच्या शेंगांच्या अन्नद्रव्याचे विश्लेषण केल्यास आपणास दिसुन येते कि, त्यात व्हीटामीन सी – १२० मि.ग्रॅ/१००ग्रॅ., कॅरोटिन ११० मि.ग्रॅ./१००ग्रॅ, फॉस्फोरस ११० मि.ग्रॅ/१०० ग्रॅम, मॅग्नेशियम २८ मि.ग्रॅ/१०० ग्रॅम, पोटॅशियम २५९ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम, सल्फर १३७ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम, आणि क्लोरीन ४२३ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम इतक्या प्रमाणात विविध पोशक तत्वे आढळुन येतात.
शेवगा पिकांस एका वर्षाला एका रोपासाठी ८ ते १० किलो चांगले कुजलेले शेणखत द्यावे.

रासायनिक खते

तमिलनाडु येथे बागायती परिस्थितीत शेवगा पिकाची लागवड केली असता त्यासाठी प्रती रोप ५६ ग्रॅम नत्र, २२ ग्रॅम स्फुरद आणि ४५ ग्रॅम पालाश आणि अझोस्पिरिलम हे नत्र स्थिर करणारे जीवाणू आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणु हे लागवडीच्या वेळेस दिले गेले, अशा परिस्थितीत प्रती हेक्टर ४५.९० मे.टन इतके जास्त उत्पादन मिळविण्यात आलेले आहे.
(राजेश्वरी आणि मोहिदिन २००४)
हंचीनामणी आणि मदालागीरी यांनी धारवाड कर्नाटक येथे केलेल्या संशोधनानुसार १ वर्ष वयाच्या रोपांस प्रती रोप २५० ग्रॅम नत्र, १२५ ग्रॅम स्फुरद, १२५ ग्रॅम पालाश प्रती रोप दिले असता जास्तीत जास्त उत्पादन मिळते ( ११७ शेंगा प्रती रोप, ५.२४ किलो शेंगा प्रती रोप) मात्र आर्थिक नफा हा २०० ग्रॅम नत्र, १०० ग्रॅम स्फुरद आणि १०० ग्रॅम पालाश व्दारे मिळतो.

पाणी व्यवस्थापन

शेवगा हे तसे कमी पाण्यात येणारे पिक आहे.
ज्यावेळेस पिकाची लागवड हि संरक्षित पाणी उपलब्ध असतांना ड्रिप ईरिगेशन न वापरता केली जाते तेव्हा पिकास पाऊस नसतांनाच्या काळात महिन्यातुन एकदा पाणी दिले गेले त्यावेळेस १६.८६ मे.टन इतके उत्पादन प्रती एकर मिळाले (एन आर सी एस २००२). थंबुराज (२००१) यांच्या मते पिकास १० ते १५ दिवसांतुन एकदा पाणी दिले तरी पुरेसे होते.
ड्रिप ईरिगेशन असेल तर उन्हाळाच्या काळात ८ ते १० लि. पाणी प्रती दिवस ( २ लि. क्षमतेचे ड्रिपर ४ तास) आणि ईतर काळात त्याच्या निम्मे म्हणजेच ४ ते ५ लि. पाणी प्रती दिवस (२ लि. क्षमतेचे ड्रिपर २ तास) दिल्यास पिकापासुन चांगले उत्पादन मिळते.

शेवगा पिकातील किड व रोग

शेवगा पिक हे तसे किड व रोगांना प्रतिकारक पिक आहे. या पिकावर सहसा किड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव दिसुन येत नाही.
१. केसाळ अळी (Eupterote mollifera Walker)अळीचा रंग हा फिक्कट पांढरा असतो, अळीच्या शरिरावर काळसर रंगाचे केस आढळुन येतात. किडीचा पतंग हा ६ ते ८४ मि.मी. लांबीच्या पखांचा असतो. अळीच्या नियंत्रणासाठी किटकनाशक वापरतांना काळजी घ्यावी, शेवगा हे पिक जास्त क्षमतेच्या किटकनाशकांना तसेच जास्त प्रमाणात वापरल्या जाणा-या किटकनाशकांना फार संवेदनशील असे पिक आहे, त्यामुळे किटकनाशक वापर काळजी पुर्वक करावा.
२. बड वर्म (Noorda moringae Walker) शेवगा पिकाच्या पानांवर मोठ्या प्रमाणावर हल्ला करते. पिकाची पाने पुर्णपणे नाहीसी करण्याची क्षमता आहे.
३. पाने खाणारी अळी (Noorda blitealis Walker)
४. शेंगां वरिल माशी (Gitona distigma Meigen) – शेवगा पिकाचे ७० टक्के पर्यंत नुकसान करण्याची क्षमता असलेली किड. या किडीच्या नियंत्रणासाठी स्पिनोसॅड (०.२ मिली/लि.) , डायक्लोरोव्हॉस (०.५ मिली/लि.), मिथोमिल (१ ग्रॅ/लि.), थायमॅथॉक्झाम (०.२ ग्रॅ/लि.), इमामेक्टिन बेन्झोएट (०.२५ ग्रॅ/लि.), डेल्टामेथ्रीन (०.५ मिली/लि.) यांचा वापर करता येण्यासारखा आहे.
५. साल पोखरणारी अळी (Indarbela tetraonis Moore)

शेवगा पिकावरिल रोग

१. डॅपिंग ऑफ (Pythium aphanidermatum (Edson) Fitzp, P. debaryanum R. Hesse, and Rhizoctonia solani J.G. Kühn)
२. फांदी वरिल कॅकर (Fusarium pallidoroseum (Cooke) Sacc)
केसाळ अळी

केसाळ अळी१ चा पतंग
शेंगावरिल माशी
साल पोखरणारी कीड
agriplaza.in

Leave a Comment