Soybean Rate : सोयाबीनचे दर स्थिरावले..!
ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीनचे दर स्थिरावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरात घसरण झाली असली तरी गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनला 6 हजार 450 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. सध्या खरिपाच्या अनुशंगाने आवक वाढली असतानाही हा दर मिळत असल्याने शेतकरी समाधानीआहे पण खुश नाही अशीच स्थिती आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरिपातील सोयाबीन, तूर आणि रब्बीतील हरभऱ्याची आवक सुरु आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील हरभरा खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर 4 हजार 500 रुपयांवर असलेला हरभरा आता 4 हजार 350 रुपये क्विंटलवर येऊन ठेपला आहे. उन्हाळी सोयाबीनबाबत शेतकऱ्यांनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे.
उन्हाळी सोयबीनचे बियाणे करा
यंदा कधी नव्हे ते मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन पदरात पडले आहे. पाण्याची उपलब्धता आणि पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली होती. मात्र, सध्या अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन हे बियाणे म्हणून विक्री केले तर अधिकचा फायदा होणार आहे. सध्या खरीप पेरण्यामुळे बियाणाला मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य बाजारपेठे शोधून बियाणे म्हणून सोयाबीन विकले तर प्रति किलो 80 रुपये असा दर मिळणार आहे. मात्र, बियाणांची प्रक्रिया होणे गरजेचे असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.
सोयाबीनची आवक वाढली
खरीप हंगामातील सोयाबीन पीक हे आता अंतिम टप्प्यात आहे. शिवाय खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पैशाची गरज भासू लागली आहे. त्यामुळे खरिपातील सोयाबीनची साठवणूक न करता थेट बाजारपेठेत आणले जात आहे. आतापर्यंतच्या हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षित दर सोयाबीनला मिळालाच नाही. त्यामुळे किमान खरीप हंगामाचा खर्च तरी भागेल या आशेने आता आवक वाढली आहे.
हे पण वाचा : मान्सून मध्ये होतोय बदल, आठवड्याच्या शेवटी काय होणार बदल?
खरेदी केंद्र बंद हरभऱ्यावर परिणाम
1 जून रोजी राज्यातील बहुतांश हरभरा खरेदी केंद्र ही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नाफेडचे हरभरा खरेदीचे उद्दिष्टपूर्ण झाल्यामुळे हा निर्णय झाला होता. मात्र, त्याचा परिणाम अजूनही हरभरा दरावर होत आहे. कारण गेल्या 15 दिवसांमध्ये हरभरा दरामध्ये 150 रुपयांची घसरण झाली आहे. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना 5 हजार 230 रुपये असा हमीभाव देण्यात आला होता. तर खुल्या बाजारपेठेत 4 हजार 500 दर होते. मात्र, खरेदी केंद्र झाल्याने आहे त्या दरातही घट झाली आहे. त्यामुळे आधारभूत किंमतीचा आधारच हरभरा उत्पादकांना मिळालेला नाही.
source : tv9marathi