Soybean Rate : खरिप हंगामात काय आहे सोयाबीन बियाणांची स्थिती?
बाजारपेठेत सोयबीनचे दर घसरुन आता स्थिरावले असले तरी आगामी खरीप पेरणीसाठी आवश्यक असलेल्या सोयाबीन बियाणाची काय स्थिती आहे हे देखील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये सोयाबीन 400 रुपयांनी घसरले असून सध्या 6 हजार 750 रुपये असे दर आहेत. सोयाबीनला सर्वसाधारण दर असला तरी दुसरीकडे सोयाबीन बियाणांच्या दरात गतवर्षीपेक्षा वाढ होणार हे स्पष्ट झालंय. सोयाबीनच्या प्रति बॅगमागे 300 ते 400 रुपयांची वाढ होणार आहे. किलोमागे 10 ते 15 रुपये दरवाढ करण्याचे संकेत उत्पादक कंपन्यांनी दिले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत सोयाबीनची किंमत कमी असली तरी याच बाजारपेठेतून अधिकच्या किंमतीने बियाणे खरेदी करुन शेतकऱ्यांना जमिनीत गाढावे लागणार आहे.
मे महिना मध्यावर, शेत शिवारात लगबग
मे महिना मध्यावर आला असताना आता शेतकऱ्यांना वेध लागले आहेत ते खरीप हंगामाचे. उत्पादनवाढीसाठी सर्वकाही करण्याची तयारी शेतकऱ्यांनी दर्शवली आहे. सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु असली तरी बियाणांचा पुरवठा कीती, खताची काय स्थिती अशी एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहेत. मात्र, रासायनिक खताबरोबरच बियाणांचाही पुरवठा होणार आहे. शिवाय यंदा सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने उत्पादन क्षेत्रात वाढ होईल असा आशावाद शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. वाढत्या क्षेत्राबरोबर उत्पादनही वाढणे तेवढेच महत्वाचे आहे.
खरिपात सोयाबीनवरच शेतकऱ्यांचा भर
मराठवाड्यातच नव्हे तर राज्यात सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक झाले आहे. गतवर्षी पावसामुळे नुकसान झाले असले तरी संपूर्ण हंगामात मिळालेले दर आणि पोषक वातावरण यामुळे यंदाही सोयाबीनचाच पेरा अधिक होणार असा अंदाज आहे. त्यामुळेच सोयाबीनच्याच बियाणांची मोठी उलाढाल होणार आहे. सध्या खत, बी-बियणांचा पुरवठा केला जात आहे तर बियाणांची नोंदणी करुन त्याप्रमाणे मागणी ही कंपनीकडे केली जात आहे. 15 मे नंतर बियाणांचा पुरवठा होण्यास सुरवात होईल.
हे पण वाचा : ई-केवायसीचे आता उरले 19 दिवस, अन्यथा लाभापासून वंचित..!
कृषी विभागाने दिले बियाणे
दरवर्षी बियाणांमधून शेतकऱ्यांची फसवणूक ह्या घटना ठरलेल्याच आहेत. यंदा शेतकऱ्यांनी घरच्या बियाणावर भर देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शिवाय शेतकऱ्यांना बियाणे करुन देण्यात कृषी विभागाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे यंदा बियाणांबाबत फारशी काळजी करण्यासारखे नाही. बियणांचा तुटवडा भासणार नसला तरी वाढीव दरानेच बियाणे शेतकऱ्यांना खरेदी करावे लागणार हे देखील तेवढेच खरे आहे. 30 किलो सोयाबीन बियाणांची बॅग यंदा 3 हजार 400 तर गतवर्षी ही बॅग 2 हजार 700 रुपयांना होती.
source : tv9marathi