Soybean Rate : आठवड्यानंतर सोयाबीन उत्पादकांना दिलासा…!

Soybean Rate : आठवड्यानंतर सोयाबीन उत्पादकांना दिलासा…!

 
गेल्या 8 दिवसापासून सोयाबीनच्या दरात घसरण सुरु होती. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी साठवणूक केली होती त्यांचा जीव टांगणीलाच होता. पण शुक्रवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही दिलासादायक चित्र होते. सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात का होईना वाढ झाली होती तर तूर आणि रब्बी हंगामातील हरभऱ्याचे दर हे स्थिरच होते. सोयाबीनचा हंगाम हा अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आता तर दरात सुधारणा झाली नाही तर मिळेल त्या दरात विक्री केल्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्यायच नव्हता. शुक्रवारी मात्र, 200 रुपयांनी दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर आवक ही गेल्या 4 महिन्यापासून स्थिरच आहे. आता उन्हाळी हंगामातील सोयाबीन बाजारात दाखल होण्यापूर्वी खरिपातील साठवणूक केलेले सोयाबीन विक्रीवर शेतकऱ्यांचा भर राहणार आहे.

सोयापेंडच्या आयातीमुळे दरावर परिणाम

यंदा सोयबीनचे उत्पादन घटूनही दरात म्हणावी तशी तेजी आली नाही. हंगामाच्या अंतिम टप्प्यात तरी वाढीव दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण येथेही सरकारच्या धोरणाचा फटका उत्पादकांना बसलेला आहे. केंद्र सरकारने सोयापेंडच्या आयातील परवानगी दिल्याने येथील स्थानिक प्रक्रिया उद्योजकांनी सोयाबीन खरेदीकडे दुर्लक्ष केले. परिणामी मागणी घटल्याने गत आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात घसरण सुरु होती. दर कमी होऊन देखील आवक ही स्थिर होती. शुक्रवारी 200 रुपयांनी दर वाढल्यावर आवकचे चित्र काय राहते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हरभरा, तूरही स्थिरावले

सोयाबीन बरोबर हरभरा आणि तुरीच्या दरातही घसरण ही सुरुच होती. त्यामुळे ज्या तूर, हरभरा आणि सोयाबीन पिकांची अधिकची आवक होती त्या सर्व मालाचे दर घसरले होते. तूर आणि हरभरा आता खरेदी केंद्रावर विकला जात आहे. तर उन्हाळी सोयाबीन काढणीपूर्वी खरिपातील सोयाबीन विकण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.सध्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर, हरभरा आणि सोयाबीनचीच अधिकची आवक आहे.
हे पण वाचा : सोयाबीनच्या दरात घसरण सुरुच, शेतकऱ्यांना चिंता उन्हाळी हंगामातील पिकांची

घटत्या दराचा परिणाम आवकवर

सोयाबीनचे दर घटूनही आवक ही कायम होती तर दुसरीकडे तुरीच्या आणि हरभऱ्याच्या आवक मात्र परिणाम झाला होता. सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने शेतकरी आता दराचा फारसा विचार न करता विक्रीवर भर देत आहे. पण हरभरा आणि तुरीची साठवणूक करुन ठेवली तर आगामी काळात दर वाढतील असा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीन बाजारात आणि तूर व हरभरा वाढीव दराच्या प्रतिक्षेत थप्पीला अशी अवस्था पाहवयास मिळत आहे.
source : tv9marathi

Leave a Comment