Soybean Rate : सोयाबीनच्या दरात दणक्यात वाढ; चारच दिवसात बदलले चित्र!

Soybean Rate : सोयाबीनच्या दरात दणक्यात वाढ; चारच दिवसात बदलले चित्र!

 

ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा साठा केला किंवा ज्यांना उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन झाले त्यांचा बाजार उठलाच असे काहीसे वातावरण गेल्या आठवड्यात बाजारपेठेत झाले होते. केवळ सोयाबीनच्याच दरात घट नाही तर तूर आणि हरभऱ्याचेही दर घसरले होते. ऐन खरिपाच्या तोंडावर शेतीमालाचे दर घसरल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र, गेल्या चार दिवसांमध्ये सोयाबीनचे दर हे 400 रुपायांनी वाढले आहेत. प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी वाढल्याने हा बदल झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात 400 रुपयांची वाढ ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब असून गुरुवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 6 हजार 800 असा दर मिळाला होता.

केंद्राच्या धोरणाचा झाला होता परिणाम

7 हजार रुपये क्विंटलवर असलेले सोयाबीन थेट 6 हजारांवर येऊन ठेपले होते. त्यामुळे साठवलेल्या आणि उन्हाळी हंगामातील सोयाबीनचे काय होणार असा सवाल उपस्थित होत असताना बाजारपेठेत अमूलाग्र बदल होत आहे. चार दिवसांपूर्वी सोयाबीन हे 6 हजार 400 रुपयांवर होते ते गुरुवारी 6 हजार 800 य़ेऊन ठेपले आहे. मध्यंतरी केंद्राने सोयापेंडची आयात केल्यानंतर दरात मोठी घसरण झाली होती. सोयाबीनबाबत अनिश्चितता पसरत असतानाच झालेली वाढ दिलासादायक ठरणार आहे.

तूर, हरभऱ्याबाबत चिंता कायम

सोयाबीनच्या दरात वाढ झाली असली तरी दुसरीकडे हरभरा आणि तुरीच्या दरात घट ही कायम आहे. राज्यातील हरभरा खरेदी केंद्र बंद केल्याने आता खुल्या बाजारपेठेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आवक वाढली की हरभऱ्याच्या दरात यापेक्षा घट होईल असा अंदाज आहे. तर तुरीला 6 हजार 300 हमीभाव असताना बाजारपेठेत 6 हजार दर मिळत आहे. सध्या खरिपामुळे आवक घटली असली तरी दरात सुधारणा झालेली नाही. मात्र, सोयाबीनच्या वाढत्या दरामुळे वातावरण बदलले आहे.

काळजी घ्या : आकाशात वीज चमकत असताना

उन्हाळी सोयाबीनचाही आधार

यंदा कधी नव्हे राज्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग केला होता. पाण्याची उपलब्धता आणि पोषक वातावरण यामुळे उन्हाळी सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये वाढ झाली होती. मात्र, पीक पदरात येताच दर खलावल्याने चिंता व्यक्त केली जात होती. पण बाजारपेठेतील चित्र बदलले आहे. विशेषत: सोयाबीनच्या दरात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता तुरीच्या दरात वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

source : tv9marathi