भाजीपाला लागवड फायद्याची

भाजीपाला लागवड फायद्याची 
कोकणात बहुतेककरून पावसाळय़ात परसबागेमध्ये भाजीपाला घेण्याची पद्धत रूढ आहे. दैनंदिन गरज हाच यामागचा प्रमुख उद्देश असतो. भाजीपाला हे कमी कालावधीमध्ये येणारे पीक आहे. योग्य नियोजन आणि काळजी घेतल्यास भाजीपाल्यातून कमी वेळात जास्त नफा मिळतो. कणकवली, देवगड, मालवण, वैभववाडी येथे मुख्यत्वे कोल्हापूर येथून तर उर्वरित सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, दोडामार्ग येथील भाजीपाल्याची गरज बेळगावचे शेतकरी भागवतात. जिल्ह्यातील शेतक-यानी व्यावसायिक दृष्टिकोनातून बाजारातील उपलब्धता आणि मागणी यानुसार नियोजन करून भाजीपाला पिकवल्यास हा व्यवसाय आर्थिकदृष्टय़ा अधिक फायदेशीर ठरू शकतो, हे शेतक-यानी लक्षात घ्यायला हवे.
आंबा, फणस, करवंदाचा हंगाम संपला. आता पावसाळी भाजीपाला पिके जशी भेंडी, काकडी, पडवळ, दोडकी, कारली ही पिके परसबागेत व काही ठिकाणी व्यावसायिक पिके म्हणून घेतली जात आहेत. त्याचबरोबर सुरण, आलं, हळद ही पिकेदेखील लागवड केली जाऊ लागली आहेत. फळांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणा-या आपल्या जिल्ह्याचे हवामान व जमीन याची विविधता बघता येथे भाजीपाला पिके चांगल्या प्रकारे येऊ शकतात. माणसाच्या दैनंदिन आहारामध्ये भाजीपाल्याला विशेष महत्त्व आहे. मानवी शरीराला प्रथिने कबरेदके याचबरोबर जीवनसत्त्वे, खनिजे व तंतुमय पदार्थ यांचीही आवश्यकता असते. हे घटक भाजीपाल्याद्वारे पुरवले जाऊ शकतात. पालेभाज्यामध्ये भरपूर ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व असतात. पालेभाज्यांमुळे अन्नाचे पचन चांगले होते.
परसबाग करताना आपला हेतू असतो तो आपल्या रोजच्या खाण्यामध्ये आवश्यक असलेला भाजीपाला पिकवणे. या वेळी कमीत कमी जागेत जास्तीत जास्त प्रकारची भाजी कशी घेता येईल, याचा विचार करून जागेचे नियोजन करावे. हे नियोजन करताना सर्वप्रथम आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यानुसार भाजीपाला पिकांची निवड करावी. त्याचबरोबर रोजच्या जेवणात आवश्यकता असलेला भाजीपाला जसे आलं, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो यांसारख्या भाजीपाल्याचा समावेश करावा. तसेच काही वर्षावलंबी झाडे जशी कढीपत्ता, शेवगा लागवड केला जाऊ शकतो. याबरोबरच वेलवर्गीय भाजीपाला जसे घेवडा, करटोली, कंदपिके जशी सुरण, घोरकंद, कणगर यांचाही लागवडीसाठी उपयोग करता येईल. कौटुंबिक गरज भागवणे हे उद्दिष्ट असल्याने आपण कमीत कमी जागेचा वापर करुन जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो.
दुस-या प्रकारामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून लागवड केली जाते. यामध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार एक किंवा दोन अशा पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. एक किंवा दोन पिकांचे जास्तीत जास्त उत्पादन घेऊन त्याची विक्री करणे हा हेतू असतो. सध्या जिल्हय़ातील काही गावांमध्ये जसे सावंतवाडीतील विलवडे, वेंगुर्ले येथील वेतोरे, मातोंड, आडेली व जिल्ह्यातील इतर भागांत अनेक ठिकाणी भाजीपाला लागवडीतून व्यावसायिक दृष्टिकोन रुजत आहे. हा व्यवसाय फायदेशीर असून भाजीपाला शेतीकडे वळण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे.
पिकाचा हंगाम व जाती
हंगामनिहाय भाजीपाला पिकांची लागवड करावी. हंगामामध्ये कोकणामध्ये भेंडी, काकडी, दोडकी, पडवळ, दुधीभोपळा, कारली, घोसाळी तसेच आलं, हळद यांसारख्या पिकांची लागवड करणे शक्य आहे. पिकांच्या शिफारस केलेल्या जातीची लागवड करावी. जेणेक रून चांगले दर्जेदार उत्पन्न मिळेल व कीडरोगास प्रतिकार होतो. खरीप हंगामातील लागवड पाऊस कमी असताना जुलैच्या पहिल्या आठवडय़ात करावी.
जमिनीची निवड, मशागत व लागवड पद्धती
भाजीपाला लागवडीसाठी उत्तम निच-याची सेंद्रिय पदार्थाचे पुरेसे प्रमाण असलेली जमीन निवडावी. जमिनीची उभी-आडवी नांगरट करून धसकटे वेचून घ्यावी आणि हेक्टरी १५ टन या प्रमाणात शेणखत किंवा इतर कंपोस्ट खत मिसळावे. पिकांच्या लागवड पद्धतीप्रमाणे जमिनीची आखणी करावी.
लागवड पद्धती
वेलवर्गीय भाजीपाला लागवडीसाठी अळीपद्धत किंवा सरी पद्धतीचा वापर करावा. पडवळ, कारली व दोडकीचे वेल मांडवावर चढवणे आवश्यक आहे. यासाठी बांबूच्या सहाय्याने मंडप तयार करावेत. भेंडी, गवार यांसारख्या पिकांची सरी वरंबे पद्धतीने लागवड करावी. यासाठी दोन फूट अंतरावर सरी पाडाव्यात. सरीच्या बगलेत दोन फूट अंतरावर बियाणे टाकावे. हळद व आले या पिकांच्या लागवडीसाठी रुंद वरंबा किंवा गादी वाफा करून त्यावर लागवड करावी. आपल्या येथील पाऊस खूप असल्याने एक फूट उंचीचे व सहा फूट रुंदीचे वाफे तयार करावेत. वाफ्यावर दीड फूट ओळीत अंतर ठेवावे तर फूट अंतरावर कंदाची लागवड करावी. लागवडीपूर्वी कंदांना १० ते १५ मिनिटे बुरशीनाशके व कीटकनाशकांची प्रक्रिया करावी. यासाठी एक लिटर पाण्यामध्ये एक ग्रॅम बावीस्टीन किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड व अर्धा मिली क्लोरोपायरिफॉस यांचे द्रावण तयार करून कंद त्यामध्ये बुडवून ठेवावेत.
खत व पाणी व्यवस्थापन
जमीन नांगरणेवेळी हेक्टरी १५ ते २० टन शेणखत मिसळावे. पण प्रत्येक वेळी एवढे शेणखत उपलब्ध होत नाही. अशा वेळी ठरावीक अंतर निश्चित केल्यानंतर बियाणे लागवडीसाठी खो-याच्या सहाय्याने खड्डे तयार करावेत. एका खड्डय़ात अर्धा ते एक घमेले कु जलेले शेणखत आणि १०० ग्रॅम फॉलिडॉल पावडर टाकावी. सर्व खताची सर्वच पिकांसाठी एक तृतीयांश मात्रा, नत्र म्हणजेच युरिया, पूर्ण मात्र, स्फुरद-सिंगल सुपर फॉस्फेट व पालाश म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश, लागवडीचे वेळी मातीत चांगल्या प्रकारे मिसळेल अशा पद्धतीने द्यावी. तसेच एक तृतीयांश नत्राची मात्रा म्हणजेच युरिया लागवडीनंतर एक महिन्याने व शेवटची एक तृतीयांश नत्राची मात्रा म्हणजेच युरिया झाड फुलो-यावर आल्यानंतर फळे येण्यास सुरुवात होते, अशा वेळी द्यावी. पावसाळी हंगामात भाजीपाला पिकांना पाण्याची गरज भासत नाही. परंतु आठ दिवसांमध्ये जास्त दिवस पाऊस पडला नाही तर पाण्याची सोय करावी. तसेच अतिउपसा झाल्यास पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची काळजी घ्यावी.
काढणी व उत्पन्न
काकडी, पडवळ, दोडकी, कारली व भेंडी या फळांची तोडणी फळे कोवळी असताना करावी. आलं व हळद काढणी तयार होण्याकरिता जातीनुसार सात ते नऊ महिन्यांचा कालावधी लागतो. वेलवर्गीय भाजीपाला पिकांचे सरासरी उत्पन्न १५० ते २०० क्विंटल प्रति हेक्टर तर भेंडीचे उत्पन्न १०० ते १२० क्विंटल प्रति हेक्टर आणि हळदीचे उत्पन्न २५० ते ३०० क्विंटल प्रति हेक्टर व आल्याचे १०० ते १५० क्विंटल उत्पन्न प्रति हेक्टर चांगल्या व्यवस्थापनाखाली अपेक्षित आहे.
आर्थिक खर्चाचा ताळेबंद
व्यावसायिकदृष्टय़ा भाजीपाला लागवड करताना त्यातून नफा मिळवणे हा मुख्य हेतू असतो, त्यामुळे खर्चाचा ताळेबंद ठेवावा. यामध्ये कुटुंबातील सदस्यांकडून केलेल्या कामाची नोंद ठेवून त्यांचाही समावेश ताळेबंदामध्ये करावा. ताळेबंदानुसार आलेला खर्च आपल्याला कळू शकतो व त्यानुसार विक्री किंमत ठरवता येते.
मागणी असलेल्या पिकांची निवड
व्यावसायिकदृष्टय़ा भाजीपाला लागवड करताना जिल्ह्यातील ज्या भागात आपण भाजी विक्री करणार आहोत, त्या भागातील लोकांची आवड, त्यांचा प्राधान्यक्रम कोणत्या भाजीला आहे. हे जाणून घेऊन त्यानुसार पिकाची निवड करावी. तसेच एखाद्या पिकाच्या ठरावीक जातीलाही मागणी असते. जसे काही ठिकाणी पांढ-या कारल्याऐवजी हिरवी कारली व लांब वांग्यांपेक्षा जास्त गोल जांभळय़ा व काटेरी वांग्यांना जास्त महत्त्व असते. अशा प्रकारे योग्य पीक आणि जातीची हंगामनिहाय निवड करावी. तसेच काही ठिकाणी ठरावीक कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. जसे आपल्या जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी भेंडीवर केवडा रोगाचा प्रादुर्भाव असतो. तसेच वांगीवर्गीय भाज्यांवर येणा-या जीवाणूजन्य मररोगाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी होत असतो. अशा ठिकाणी त्या रोगांना प्रतिकार करणा-या जातींचा वापर करावा.
औषधी गुणधर्मामुळे वाढती मागणी
भाजीपाल्यामध्ये आहारमूल्यांबरोबरच औषधी गुणधर्मही आहेत. वांगी व कारली मधुमेहाच्या विकारावर उपयोगी पडतात. वांग्यामधील सोयासोडिन व कोबीमधील इंडोल तीन कार्बीनोल या घटकांचा विविध कॅन्सर रोगांवरील औषध निर्मितीमध्ये वापर होतो. मिरचीमधील कॅप्सासीन हे द्रव्य सांध्यावरील सुजेकरिता असलेल्या औषधामधील महत्त्वाचा घटक आहे. लसूण जंतुनाशक व पाचक आहे. हिरवी मिरची, लसूण व लिंबाचा रस यांची चटणी खाल्ल्याने हृदयक्रिया बंद पडणे व कर्करोग यांचा संभव कमी होतो. आहारतज्ज्ञांनुसार दरदिवशी प्रत्येक व्यक्तीने २८० ग्रॅम एवढय़ा भाजीपाल्याचा आहारामध्ये समवेश करणे गरजेचे आहे. परंतु सद्य:स्थितीला प्रति व्यक्ती प्रति दिन १७५ ग्रॅम एवढा भाजीपाला उपलब्ध आहे.
भाजीपाला रोपे विकत घेण्यासाठी खालील लिंकवर जाऊन संपर्क करा 
https://www.krushikranti.com/advertisement/nursery/rajmatoshri-nursery/

prahaar.in

Post Views: [views id=”4775″]

Leave a Comment