सेंद्रिय शेती म्हणजे काय ?

सेंद्रिय शेती म्हणजे काय ? 

 
सेंद्रिय शेती म्हणजे काय ?  (what is organic farming?)  नैसर्गिक साधनाचा वापर करून औषध(medicine), खते(fertilizer) तयार करणे व पारंपारिक बियाणाचा(seeds) वापर करून केलेली विषमुक्त म्हणजेच रसायनाचा वापर टाळून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय.  सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत शेती होय. शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते.
हरितक्रांतीच्या अगोदर शेतामध्ये केवळ शेणखत वापरत असत. बियाणे सरळवाण म्हणजेच कोणत्याही प्रकारची प्रकिया न केलेले वापरत. यामुळे पिकांची गुणवत्ता वाढत असते. जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकाची वाढ योग्य होऊन उच्च प्रतीच्या व आरोग्यास पोषक असण्याऱ्या उत्पादनाची निर्मिती होते.
कृषिप्रधान देश म्हणून भारताला सर्व जगात ओळखले जाते. देशानी कृषी तंत्रज्ञान आणि संशोधनात चांगलीच प्रगती केली आहे. यावरून भारताची कृषीक्षेत्रातील वाटचाल बऱ्याच प्रमाणात स्वालंबी होण्याच्या दिशेने होत आहे. हा एक चांगला मापदंड आहे! प्राचीन काळापासून जमिनीला मातेचे स्थान देण्यात आले आहे त्यामुळे आपण जमिनीला भूमाता असे संबोधतो. चला तर पाहू या सेंद्रिय शेती म्हणजे काय ?

 • माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.

 

 
ज्याप्रमाणे पशुपक्षी, प्राणी व वनस्पती जिवंत आहे. त्याचप्रमाणे माती सुद्धा जिवंत आहे. त्यात असंख्य जीवजंतू वास्तव्य करून राहतात म्हणून आपण भूमाता सजीव आहे असे समजतो. मनुष्य दिवसेंदिवस स्वार्थी होत आहे. तो स्वत:च्या फायद्यासाठी शेतजमिनीकडे दुर्लक्ष करतो. मनुष्य ज्याप्रमाणे श्वासोच्छ्वास करतो त्याप्रमाणे माती सुद्धा श्वास घेते. मनुष्याला जसे उन, वारा, पाऊस, रोग यापासून संरक्षणाची गरज आहे तसे मातीचे सुद्धा संरक्षण होणे गरजेचे आहे.
सेंद्रीय पद्धतीने शेती हरितक्रांती पर्यंत झाली. हरितक्रांतीमध्ये रासायनिक खताचा अवलंब भारतात होऊ लागला. सुरुवातीच्या काळात शेतमालात मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू लागले मात्र जमीन कठीण होऊ लागली. १९६० च्या काळात जमिनी लाकडी नांगराने नांगरत असत. ती नंतरच्या काळात लोखंडी नागाराने नांगरावी लागे. त्यानंतर ट्रक्टरने शेती केली जाऊ लागली.
त्यामागे लवकर शेतीची(farming) मशागत करणे व लोखंडी नांगराने जमीन नांगरली जाऊ शकत नाही. म्हणजेच रासायनिक औषधामुळे जमीन कठीण म्हणजेच मृत होत चालली आहे.
सेंद्रीय शेती पद्धतीनुसार  पारंपरिक बी-बियाणे वापरणे, जमिनीची धूप थांबविणे त्यासाठी योग्य ठिकाणी बांध घालणे, मशागत करणे शेण-गोमूत्राचा जास्त वापर करणे यामुळे वाफ्यात पाणी टिकून राहते. बैलांच्या मशागतीने जमिनीची नांगरणी उत्तम होते. नांगरणी उत्तम झाल्यामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते. तर रासायनिक खतांचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीचा कस कमी होऊ लागला आहे. त्यावर उपाय म्हणजेच सेंदिय शेती होय.
बहुतांश राज्ये जास्त उत्पन्न मिळावे म्हणून रसायनांचा अतिवापर करीत आहेत. परिणामे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉ. रश्मी सांघि (संधोधन शास्त्रज्ञ, आय.आय.टी. कानपूर) यांनी सांगितले की, रासायनिक शेतीतून मिळालेल्या उत्पादनाचे सेवन केल्याने आईच्या दुधामध्ये रासायनिक औषधाचे अंश मिळाले आहेत.
सिक्किमने देशातले पहिले सेंद्रिय राज्य होण्याचा मिळवला आहे.  सिक्किमच्या खालोखाल केरळनेसुध्दा सेंद्रिय शेतीला आपल्या राज्यामध्ये मोठा बढावा दिलेला आहे. कारण या दोन राज्यातल्या कृषीतज्ञांना आणि विशेषतः शेतकर्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व लक्षात आले आहे. आज देशातले पहिले सेंद्रिय राज्य म्हणून सिक्किमला मान दिला जातो आणि तेथील ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती सुरू करण्यात आली आहे.

सेंद्रिय शेती खालील महत्वपूर्ण मुद्यांवर अवलंबून आहे. (what is organic farming definition)

 • मातीचे संवर्धन. (Soil conservation)
 • तपमानाचे व्यवस्थापन.(Temperature management)
 • पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि संवर्धन.(Rainwater planning and conservation)
 • सौर उर्जेचा अधिकतम वापर व उपयोग.(Maximum use and utilization of solar energy)
 • गरजांमध्ये स्वावलंबन.
 • नैसर्गिक क्रमचक्र आणि जीवनाच्या स्वरूपांचे अनुपालन.
 • जनावरांची एकीकृतता.(Integration of animals)
 • नवीनीकरणीय संसाधनांवर अधिकतम अवलंबन, जसे पशु-बल.

 

सेंद्रिय शेतीचे वैशिष्ट्ये  :-  (benefits of organic farming)

 
1) मातीचा सुपीकपणा कायम ठेवण्यास मदत :-
सेंद्रीय शेती ही एक स्थायी आणि पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादन प्रक्रिया आहे, ज्यामध्ये लहान शेतकऱ्यांसाठी विशिष्ट लाभ आहेत. सेंद्रीय शेती खालील सुविधांच्या योगे अन्न-सुरक्षा आणि गरीबांच्या हाताला काम आणि दोन पैसे जास्त फायदा मिळवून देते.

 • कमी संसाधने व पाऊसपाणी असलेल्या क्षेत्रांत उत्पादनाची वाढ होणे,
 • शेत आणि आसपासच्या क्षेत्रात जैव विविधता आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन होणे,
 • मिळकत वाढवणे किंवा खर्च कमी करणे,
 • सुरक्षित आणि विभिन्न खाद्यान्नांचे उत्पादन घेणे.

2) मातीचे संवर्धन :- रसायनांचा वापर थांबविणे, ओल्या गवताच्या जागी पिकाचे अवशेष उपयोगात आणणे, सेंद्रीय आणि जैविक खताचा उपयोग करणे, पीक क्रमचक्र आणि बहु-पिकांचा अवलंब करणे, अत्यधिक नांगरणी करणे टाळा आणि मातीस हिरव्या किंवा ओल्या गवताखाली झाका.
3) तपमानाचे व्यवस्थापन :- माती झाकून ठेवा, बांधावर झाडे-झुडपे लावा.
माती आणि पावसाच्या पाण्याचे संवर्धन :-  पाझर टाक्या खणा, उतार असलेल्या जमिनीवर समोच्च बांध घाला आणि समोच्च पंक्ति शेतीचा अवलंब करा, शेत-तलाव खणा, बांधांवर कमी उंचीचे वृक्षारोपण करा.
४) सौर उर्जेचा वापर करणे :-  वर्षभर विविध पिके आणि वृक्षारोपण कार्यक्रमाच्या संयोजनाच्या माध्यमाने अधिक हिरवाई मिळवा.
 ५) स्वतःच्या गरजांमध्ये स्वावलंबन :-  स्वत:च बियाण्याचा विकास करा, कंपोस्ट, वर्मीकंपोस्ट, वर्मीवॉश, द्रव खते आणि वनस्पति अर्काचे उत्पादन.
६) जैववैविध्याचे अनुपालन :- जीववैविध्य टिकून राहावे म्हणून आवास विकास करा, कीटकनाशकांचा वापर कधीही करू नका, जैववैविध्य निर्माण करा.
७) जनावरांची एकीकृतता :- जनावरे ही सेंद्रीय व्यवस्थापनाचे महत्वपूर्ण घटक आहेत आणि हे फक्त पशु-उत्पादनेच पुरवित नाहीत तर मातीमध्ये वापर करण्यासाठी पुरेसे शेण आणि मूत्र प्रदान करतात.
८) नवीनीकरणीय उर्जेचा वापर :- सौर उर्जेचा, बायोगॅस आणि बैलांच्या द्वारे चालविण्यात येणारे पंप, जनरेटर आणि इतर यंत्रे ह्यांचा उपयोग करा.
 

सेंद्रिय खतांचे प्रकार :- (types of organic farming)

 

1) शेणखत (Manure) :-

शेण,मुत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकापासून तयार होणा-या खताला शेणखत म्हणतात. त्यामध्ये नत्र, स्फूरद व पालाश असते. शेणाचा महत्त्वाचा उपयोग म्हण्जे बायोगँसमध्ये उर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणुन वापरले जाते.

2) कंपोस्ट खत (Compost manures) :-

शेतातील गवत, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, उसाचे पाचट, कापसाची धसकटे इ. सेंद्रिय पदार्थाचे सुक्ष्मजीवजंतु मुळे विघटन होऊन त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट म्हणतात. यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश असते.

३) हिरवळीची खते (Green manures) :-

लवकर वाढणा-या पीकांची निवड करून, त्यांची दाट पेरणी करुन पीक फुलो-यावर येण्याच्या आधी ते नागराच्या सहाय्याने जमिनीत गाडतात त्यापासून जमीनीला नत्र मिळते. जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते. अशा खतांना हिरवळीचे खत म्हणतात. गाडलेल्या पिकांना कुजण्य़ासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालवधी लागतो.  ताग, धैच्या, मूग, चवळी, गवार, शेवरी, बरसीम, ग्लीरीसिडीया तागापासून नत्राचा पुरवठा ५ ते ६ आठवड्यात होतो.
मुगाचा पालापाचोळा जमिनीत गाडल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ होते. जमिनीत ताग, धैंचा इत्यादी पिके पेरून साधारण १०% फुलोऱ्यात असताना नांगराच्या साहाय्याने जमिनीत गाडून टाकावीत व त्या जमिनीमध्ये पाणी सोडावे. या हिरवळीच्या खतांच्या वापरामुळे जमिनीची पाणी धरण्याची शक्ती वाढून पिकास पोषक अन्न द्रव्याची उपलब्धता वाढते.

4) गांडूळ खत (Earthworm  manure) :-

खतात गांडूळाची विष्ठा, नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ, गांडूळाची अंडीपूंज, बाल्यावस्था आणी अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असलेल्या खताला गांडूळ खत म्हणतात. गांडूळाच्या नैसर्गिक कार्य करण्याच्या सवयीचा उपयोग सेंद्रिय पदार्थपासून तयार झालेले खत म्हणजे गांडूळ खत होय. यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम, संजीवके व सूक्ष्मद्रव्य इत्यादी शेणखताच्या तुलनेत जास्त असते.
मराठीमध्ये गांडूळांना दानवे, वाळ, केचवे, शिदोढ, काडुक किंवा भूनाग या नावाने देखील ओळखले जातात. गांडूळाच्या 3000 जाती असून भारतामध्ये 300 जातीचे गांडूळे आहेत.  गांडूळ खत निर्मितीसाठी (इसिनीया फोइटिडा) या जातीचा वापर करतात.

5) माशाचे खत (Fish manure) :-

समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून जे खत तयार होते.  ज्यात नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण भरपूर असते याला माशाचे खत म्हणूनही म्हटले जाते.

6) खाटीकखान्याचे खत (Slaughterhouse manure):-

खाटीकखान्यात जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवितात त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात यात नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणत असते.

७) सेंद्रिय संजीवनी (Organic resuscitation) :- 

सेंद्रिय संजीवनी तयार करण्यासाठी जनावरांचे 200 किलो शेण त्यात 25 किलो सुपर फॉस्पेट टाकून लाकडी काटीच्या सहाय्याने ते चांगले एकजीव करून घ्यावे आणि हे तयार झालेले मिश्रण खताच्या रिकाम्या गोण्यात भरून त्यांची तोंडे बांधावीत व त्या गोण्या 30 दिवसापर्यंत सावलीत ठेवाव्यात.
साधरण 30 दिवसात सेंद्रिय खत तयार होते. ते खत चहा पावडर सारखे बनते यालाच सेंद्रिय संजीवनी म्हणतात. अशाप्रकारे सर्व जैविक पदार्थांचा वापर करून शेती कसावी, आजच्या घडीला सेंद्रिय शेतीतील उत्पादनाला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळताना दिसते आहे.

सेंद्रिय शेतीमुळे होणारे फायदे :- (Benefits of Organic Farming)

 
१) नत्र पुरवठा (Nitrogen supply) :- जमिनीत सेंद्रिय खत टाकल्यास नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थांत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. शेणखत व्यतिरिक्त कोंबड्यांपासून मिळणारे खत (कॊंबडीची विष्ठा), रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात.
२) जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते :-जमिनीला ०.५ % ते १.० % सेंद्रिय पदार्थ दिल्यास पाणी धरुन ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते. जमिनीतील सेंद्रिय खतांचा वापर झाडांद्वारे केला जातो. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत जातात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता व पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
३) स्फुरद व पालाश :- सेंद्रिय खतांमुळे झाडांना विविध अवस्थेत स्फुरद व पालाश उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांद्वारे शोषले जातात.
४) जमिनीचा सामू :- सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल, विम्ल व क्षारयुक्त होत नाही.
५) कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी (CEC) :- कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती होय. सेंद्रिय खतांमुळे कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी २० ते ३० % ने वाढते .त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते व झाडांना संतुलित पोषकद्रव्ये मिळतात.
कर्बाचा पुरवठा :- कर्ब किवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जिवाणूंना त्याचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी होतो. हे जिवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्य उपलब्ध करुन देतात.
सेंद्रिय खतांचा परिणाम : सेंद्रिय खतांमुळे मातीवर सावली होऊन तापमान वाढत नाही. सेंद्रिय पदार्थ माती घट्ट धरून ठेवतात. उष्ण तापमानात जमिनीला थंड करणे व कमी तापमानात जमीन गरम ठेवणे सेंद्रिय खतामुळे शक्य आहे. सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते. त्यांत रोग निर्माण करणारे जीवाणूपण वाढीस लागू शकतात. अशा वेळी ट्रायकोडरमा नावाचे जिवाणू जमिनीत सोडल्यास रोग निर्माण करणाऱ्या जिवाणूंचा नाश होऊ शकतो.
सेंद्रिय शेतीतील त्रुटी :-   
१.सेंद्रिय शेतीबद्दलचे शेतकय्रांना असलेले अपुरे ज्ञान, यामुळे या पद्धतीच्या वापरावर मर्यादा येत आहेत.
२.जास्त वेळ खाऊ पद्धत आहे.
३.यांत्रिकीकरणामुळे शेतकय्रांजवळचे पशुधन कमी झाले आहे, त्यामुळे शेतीला शेतीला योग्य प्रमाणात शेणखताची उपलब्धता होत नाही.
४.सेंद्रिय शेतमालाला मिळणारा कमी भाव.
 
सेंद्रिय शेतीची  तत्त्वे :- (what is organic farming pros and cons)
 
१) आरोग्याचे तत्त्व :- हवा, माती, धान्याची रोपे, पशू, पक्षी, मनुष्यप्राणी व निसर्गचक्र यांचे आरोग्य वाढविणे हा सेंद्रिय शेतीचा उद्देश आहे. सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून मानवाचे आरोग्य वाढते.
२)पर्यावरणीय तत्त्व :- सेंद्रिय शेती ही निसर्गाच्या जीवनचक्रावर अवलंबून व अनुरूप हवी. ती जीवसृष्टीला धरून चालणारी हवी.  यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही.
३) निष्पक्षतेचे तत्त्व :- सेंद्रिय शेती ही निसर्गचक्रातील परस्परांच्या संबंधात कोणत्याही एका बाजूस कलणारी नसावी, निष्पक्षतेची खात्री देणारी असावी.
४) संगोपनाचे तत्त्व :- यात अंतर्भूत असलेल्या सर्व घटकांचे संगोपन सुयोग्यरीत्या व्हावयास हवे. परिणामी, या व पुढच्या पिढीतील सर्वांचे आरोग्य व कल्याण योग्यरितीने राखले जाईल.
 
जीवाणू खतांचा वापर करताना घ्यायची काळजी.

 1. जीवाणू खते नेहमी थंड, कोरड्या तसेच सुर्यप्रकाश विरहित ठिकाणी ठेवावीत.
 2. जीवाणू खते वापरल्याने रासायनिक खतांची उणीव पुर्णपणे भरून काढता येत नाही, तेव्हा जीवाणू खतांबरोबर सेंद्रिय खते, गांडुळ खते वापरावीत.
 3. जीवाणू खते रासायनिक खतांबरोबर मिसळू नये.
 4. बीजप्रक्रिया करताना बुरशीनाशके किंवा किटकनाशके लावायची असल्यास अगोदर त्यांची प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी आणि नंतर जीवाणू खतांची प्रक्रिया करावी.
 5. जैविक खते पाकिटावर नमूद केलेल्या विशिष्ट पिकांना आणि विशिष्ठ कालावधीत द्यावीत.

शेती टिकविण्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यास रासायनिक खतांवर व औषधांवर होताना खर्च वाचून शेतकऱ्यांना कमी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. शेतकऱ्यांना शेंद्रिय शेती बद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न वरील लेखात केला आहे.
 लेखक –
1) प्रा. सावन गो. राठी
   (सहायक प्राध्यापक- मृदाशास्त्र विभाग)
   श्री. संत शंकर महाराज कृषि महाविद्यालयपिंपळखुटाता. धामणगाव रेल्वेजि. अमरावती
        इ.मेल. :- sawanrathi499@gmail.com
 
2) प्रा. हरिष  अ. फरकाडे
    (सहायक प्राध्यापक-वनस्पती रोगशास्त्र विभाग)
    श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविध्यालय, अमरावतीजि. अमरावती.
    मो. नं.-८९२८३६३६३८  इ.मेल. agriharish27@gmail.com
 गजानन नचोपडे (एम.एस.सी. किटकशास्त्र विभागडॉपं.दे.कृ.वीअकोला.
आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या
 

Leave a Comment