Wheat Crop : गव्हाचे उत्पादन घटले, गव्हाच्या दरात वाढ विक्रमी दरासाठी शेतकऱ्यांचा हे आहे नियोजन

Wheat Crop : गव्हाचे उत्पादन घटले, गव्हाच्या दरात वाढ विक्रमी दरासाठी शेतकऱ्यांचा हे आहे नियोजन

 

खरिपातील कापूस आणि सोयाबीनच्या बाबतीत जे घडले तेच आता रब्बीतील गहू आणि ज्वारीच्या बाबतीत होताना पाहवयास मिळत आहे. रब्बीतील या दोन्ही मुख्य पिकांच्या पेऱ्यात घट झाली होती. त्याचे परिणाम आता बाजारपेठेत पाहवयास मिळत आहेत. उत्पादन घटल्याने गतवर्षीच्या तुलनेत गव्हाचे दर 600 रुपयांनी वाढले आहेत तर ज्वारीच्या दरातही वाढ झाली आहे. ही दरवाढ होत असतानाच केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. दरवाढीची ही प्रक्रिया सुरु असतानाच आता अधिकचा दर मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी गव्हाच्या विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर देण्यास सुरवात केली आहे. एकंदरीत जे सोयाबीन आणि कापसाबाबत घडले तेच आता गहू आणि ज्वारीबाबत होत आहे. उत्पादन घटले असले तरी वाढीव दराने त्याची कसर भरुन निघेल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.

ऊसाचे क्षेत्र वाढल्याचा परिणाम

मराठवाड्यातही पाण्याची सोय आणि योग्य नियोजन होत असल्याने शेतकऱ्यांचा कल हा सर्वात मोठ्या नगदी पिकाकडे आहे. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले असून गव्हाच्या क्षेत्रात 30 टक्क्यांनी घट झाली आहे. शिवाय इतर राज्यातून गव्हाची होणारी आवकही यंदा ठप्प आहे. बाजारपेठेत गव्हाची आवक घटल्याने सध्या प्रतिक्विंटल गव्हाला 2 हजार 800 ते 3 हजार असा दर मिळत आहे. मराठवाड्यात ऊसाचे क्षेत्र वाढल्यानेच सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. गव्हाच्या क्षेत्रावरच ही लागवड झाली आहे.

गहू-ज्वारीचे असे आहेत दर

मराठावाड्यात गहू आणि ज्वारी हे रब्बी हंगामातील मुख्य पीके आहेत. मात्र, उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे. त्यामुळे क्षेत्र घटल्याने या दोन्ही पिकांच्या दरात वाढ झाली आहे. खुल्या बाजारपेठेत गव्हाला 3 हजार रुपये तर ज्वारीला 3 हजार 500 रुपये क्विंटल असा दर आहे. उत्पादनात घट झाल्याने ही दरवाढ झाली आहे. शिवाय भविष्यात आणखीन दर वाढतील या अपेक्षेने शेतकरी विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर देत आहेत. बाजारपेठेत आवक कमी राहिल्यास दर वाढतील असा अंदाज व्यापारी अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

हे पण वाचा : राज्यातील या 9 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता…!

 

निर्यातबंदीमुळे दरवाढीच्या आशा उंचावल्या

देशांतर्गत गव्हाची टंचाई भासू नये म्हणून केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात दरवाढ होईल या अपेक्षेने शेतकरी आता गहू विक्रीपेक्षा साठवणूक करु लागले आहेत. शिवाय उत्पादनात घट झाली असल्याने दरवाढ निश्चित मानली जात आहे. शेतकरीही आता बाजारपेठेचा अभ्यास करीत असून ज्याप्रमाणे कापसाला यंदा विक्रमी दर मिळाला त्याचप्रमाणे गव्हाबाबत परस्थिती घडवून आणण्याचा प्रयत्न राहणार आहे.

source : tv9marathi

Leave a Comment