खरीपातील सुधारित मूग लागवड तंत्रज्ञान

खरीपातील सुधारित मूग लागवड तंत्रज्ञान

 

कडधान्य पिकामध्ये कमी कालावधीत ( ७० ते ७५ दिवस) तयार होणार मुग हे महाराष्ट्र राज्यातील महत्वाच पिक आहे हे पिक खरीप व उन्हाळी हंगामात घेतले जाते. विविध पिक पद्धतीत मुग पिकाचा समावेश केला जातो. मुग हे डाळवर्गीय पीक असून या पिकाच्या मुळावरील गाठीतील रायझोबियम जिवाणू मार्फत हवेतील नत्र शोषून त्याचे मुळावरील ग्रंथीमध्ये स्थिरीकरण केले जाते त्यामुळे इतर पिकांकरीता उत्तम बेवड तयार होतो तसेच हे पिक जमिनीत गाडल्यास त्याचे हिरवळीचे खत हे जमिनीचा कस व पोत सुधारण्यास मदत करते.

जमिनीची निवड : जमिन हि पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम ते भारी योग्य ठरते.

हवामान : २१ ते २५ अंश सेल्सिअस तापमान चांगले मानवते मात्र ३० ते ३५ अंश सेल्सीअस तापमानात ही हे पिक चांगले येते. मुग पिकाला ६५० ते ७०० मि.मी. समप्रमाणात पडलेला पाऊस मानवतो.

पुर्वमशागत : जमिन लागवड योग्य करतांना जमिनीची खोल नांगरनी करून जमिन भुसभुशीत करावी. पुर्वीचे पिक निघाल्यावर उन्हाळयात खोल नांगरट करावी त्यानंतर मृगाचा पहिला मोठा पाऊस पडून गेल्यावर वखर पाळी घालून घ्यावी. धसकटे, काडीकचरा इतर अवशेष वेचून घ्यावे. कुळवाच्या एक दोन पाळ्या देवून जमिन तयार करून पेरणीस योग्य होईल अशी करावी.

पेरणीची योग्य वेळ : मृगाचा पहिला पेरणी योग्य पाऊस झाल्यावर व जमीनीत वापसा येताच जुन च्या दुसऱ्या पंधरवडयात पेरनी पुर्ण करावी. पेरनीस फार उशिर करू नये. शक्यतो १० जुलैनंतर मुग पिकाची पेरणी करणे टाळावी.

बियाण्याचे प्रमाण : हेक्टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात राखण्यासाठी हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे.

लागवडीची पद्धत व अंतर खरीप मुगाची पेरणी साधारणतः पाभरीने करावी. पेरतांना दोन ओळीतील अंतर ३० से. मी. व दोन रोपांतील अंतर १० से. मी. ठेवून हेक्टरी रोपांची संख्या योग्य राखली जाईल.

बिजप्रक्रिया: पेरणीपूर्वी प्रतीकिलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा व २५ ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धक पावडर गुळाच्या थंड द्रावणात मिसळून लावावी त्यामुळे पिकांची उगवून चांगली होवून उत्पादनात वाढ होते.

पाणी व्यवस्थापन : मुग हे पिक पावसांवर येणारे आहे या पिकाला फुले येतांना आणि शेंगा भरतांना ओलाव्याची कमतरता भासू लागते अशा परिस्थितीत पाऊस नसेल आणि जमिनीत ओलावा खुपच कमी झाला असेल तर फुले येणे व शेंगा भरणे या अवस्थेत हलके पाणी द्यावे.

विद्राव्य खतांची फवारणी: फुलोरा अवस्थेत असतांना दोन टक्के युरिया म्हणजे २० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारावे व शेंगा भरत असतांना दोन टक्के डि.ए.पी. म्हणजे २० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारावे.

शिफारशीत वाणाची निवड:

अ.     क्र. वाणाचे नाव कालावधी (दिवस) उत्पादन (क्विंटल प्रती हेक्टर) वैशिष्टे
1 बी. एम-2002-01 65 ते 70 12 ते 14 दाणे टपोरे, शेंगा लांब, भुरी रोग प्रतीकारक्षम
2 बी. एम-2003-02 65 ते 70 12 ते 14 दाणे टपोरे, शेंगा लांब, भुरी रोग प्रतीकारक्षम व अधिक उत्पादन.
3 बी. एम-4 60 ते 65 10 ते 12 खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य
4 फुले एम-2 60 ते 65 10 ते 12 खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य
5 बीपीएमआर-145 60 ते 65 7 ते 8 लांब शेंगा, दाणे चमकदार
6 वैभव 70 ते 75 14 ते 15 अधिक उत्पन्न, भुरी

रोग प्रतीकारक्षम

7 पिकेव्हिएमकेएम-4 65 ते 70 12 ते 15 अधिक उत्पादन, मध्यम आकाराचे दाणे

 

खत व्यवस्थापन : चांगले कुजलेले शेणखत ५ टण प्रतीहेक्टरी हे शेवटची कुळवणीवेळी शेतात पसरवून द्यावे यानंतर रासायनिक खतांची मात्रा देतांना पेरणीच्यावेळी २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद व ३० किलो पालाश प्रतीहेक्टरी देणे आवश्यक आहे. नत्र व स्फुरद एकाच वेळी पेरणीच्यावेळेस जमिनीत बियाण्याच्या खाली पेरून द्यावे.

पिक संरक्षण: या पिकांवर प्रामुख्याने भुरी व पिवळा विषाणू या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. भुरी हा मुग पिकाच्या खालील पानांवर पांढरे ठिपके दिसतात व काही दिवसात पानांच्या बऱ्याचशा भागांवर अनियमित आकाराचे पिवळे चटटे दिसू लागतात या रोगांच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे गंधक १२५० ग्रॅम किंवा ५०० ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक ३० टक्के प्रवाही डायमेथोएट ५०० मिली ५०० लिटर पाण्यातून प्रतीहेक्टरी फवारावे. शेंगा पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस २० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी या किडनाशकाची फवारणी करावी. मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० ईसी १५ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारावे.

उत्पादन : खरीप मुगाचे योग्य नियोजनातून १२ ते १५ क्विंटल प्रतीहेक्टरी उत्पादन मिळते.

 

प्रा. संजय बाबासाहेब बडे

सहाय्यक प्राध्यापक (कृषि विद्या.)

दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय

दहेगांव ता. वैजापूर जि. औरंगाबाद 423703

मो.नं. 7888297859