Sowing : पेरणी कधी करावी? पेरणीची योग्य वेळ कोणती?

Sowing : पेरणी कधी करावी? पेरणीची योग्य वेळ कोणती?

 

मृग नक्षत्रात पेरणी व्हावी अशी शेतकऱ्यांची इच्छा असते. पण अपुऱ्या पावसामुळे तसेच माहितीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरं जावं लागतं.

राज्यातील काही भागात थोड्या प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे सध्या चोहीकडे पेरणीची लगबग सुरू आहे. शेतकरी जमिनीची पूर्व मशागत करून ती पेरणी योग्य करताना दिसत आहे.

पण, पेरणीची योग्य वेळ कोणती असते? पेरणी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला हवी? याची माहिती आज आपण घेणार आहोत.

यासाठी बीबीसी मराठीनं कृषी क्षेत्रातले अधिकारी, तज्ज्ञ, हवामान विश्लेषक यांच्याशी बातचीत केलीय. पाहूयात ते काय म्हणाले…

‘जमीन थंड झाल्याशिवाय पिकांची लागवड करू नये’

डॉ. सुभाष टाले निवृत्त विभागप्रमुख, मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सांगतात, “यावर्षी तापमान जास्त असल्याने 100 मिलीमीटर पाणी झाल्याशिवाय पिक पेरणीची जोखीम शेतकऱ्यांनी घेऊ नये. 3 सेमी. ओल जमिनीत गेल्याशिवाय पिकांची लागवड करू नये.

जूनमध्ये पावसाचा अंदाज चुकल्याने खंड पडण्याची शक्यता आहे. जुलै-ऑगस्टमध्ये पावसाची शक्यता जास्त असल्यानं मूलस्थानी जलसंधारण बरडाच्या उताराला आडवी पेरणी ही पद्धत अवलंबयाला पाहिजे.”

‘कमी कालावधीच्या पिकांची पेरणी लवकर करावी’

बीबीसी मराठीने डॉ. सूर्यकांत पवार सहयोगी संचालक, संशोधन राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प औरंगाबाद, यांच्याशी बातचीत केली.

ते सांगतात, “जोपर्यंत 100 मिलीमीटर पावसाची नोंद होऊन जमिनीत पुरेशी ओल होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये.”

“कमी कालावधीची पिकं मूग, उडीद, तुर, सोयाबीन यांची लवकर पेरणी करावी. शक्यतो कमी कालावधीची पिकांची लागवड ही कोरडवाहू जमिनीतच करावी जेणेकरून त्यांना अतिरिक्त पावसाचा फटका बसणार नाही. माती परीक्षण केल्यानंतर खताची मात्रा विभागून द्यायला हवी त्यामूळे जमीनीचा पोत टिकून राहतो,” ते पुढे सांगतात.

पिकांची लागवड कशी करावी?

कपाशीसाठी लागवडीच्या वेळेस खताची मात्रा द्यावी. शिफारशीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा झिंक सल्फेट 8 ते 10 किलो, गंधक 2 किलो प्रति एकरात वापरावे, असं पवार सांगतात.

पुढे ते सविस्तर सांगतात, “सोयाबीन बियानाची उगवण क्षमता तपासूनच त्याची लागवड करावी. सोयाबीन पिकात खोड माशी, खोड किड्यांचा प्रभाव टाळण्यासाठी विटाव्हॅक्स 3 ग्रॅम प्रति किलोसाठी वापरावे. पेरणी करत असताना 2 ते 4 सेंटीमीटर अंतरावर वरच करावी जेणेकरून जास्त खोलात पेरणी झाल्यास त्याचा उगवण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. गरजेनुसार स्फुरद आणि पालाश एकरी 8 ते 10 किलोचा वापर केल्यास त्याचा उत्तम फायदा होतो.”

“तूर या पिकासाठी प्रतिबंधक वाणाची निवड करावी. घरच्या वाणाची निवड करू नये. तूर या पिकालासुध्दा 10 किलो प्रती एकर स्फुरद वापरावे. जास्त पाणी झाल्यास निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या जेणेकरून तुरीवर मर येणार नाही,” अशी माहिती डॉ. सूर्यकांत पवार देतात.

हे पण वाचा : खरीपातील सुधारित मूग लागवड तंत्रज्ञान

‘पिकानुसार जमीनीची निवड करावी’

डॉ. रवी आंधळे, सहयोगी प्राध्यापक, ग्रामीण कृषी हवामान सल्ला सेवा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या मते, “पेरणी करताना शेतकऱ्यांनी पिकानुसार जमीनीची निवड करावी.”

ते सांगतात, “राज्यात मान्सून पूर्व पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये. पिकानुसार जमीनीची निवड करावी . पण 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पिक पेरणी करून आर्थिक नुकसान ओढवून घेऊ नये. कृषी विद्यापीठांनी वेळोवेळी केलेल्या शिफारशींचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा.”

source : bbcNewsMarathi