Havaman andaj : 5 जूनला मान्सूनचं कोकणात आगमन!

Havaman andaj : 5 जूनला मान्सूनचं कोकणात आगमन!

 

कोकणात पाच जून रोजी मान्सूनचं आगमन होणार आहे. हवामान विभागानं याबाबतचं भाकित वर्तवलं आहे. भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक कृष्णानंत होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली. खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत त्यांनी कोकणा मान्सूनच्या आगमनाचा मुहूर्त काय असेल, याचा अंदाज वर्तवलाय. पाच जून रोजी तळकोकणात पावसाचं आगमन झाल्यानंतर दोन ते तीन दिवसात मान्सूनचा पाऊस राज्यात सर्वदूर पसरेल, असंही होसाळीकर यांनी म्हटलंय. यंदा 99 टक्के पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच वेळेआधीच मान्सूनचा पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पुरेसा पाऊस होण्याआधी पेरणीची घाई करु नका, असं आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केलंय. मुंबई गुरुवारी खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी आढावा घेतला.

मान्सूनपूर्व पावसाच्या सुखावणाऱ्या सरी…

दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे सुखावले आहेत. कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्गातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगडसह बहुतांश ठिकाणी मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावली. गुरुवारी दुपारनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांशी भागात मान्सूनने वर्दी दिली.

यंदा राज्यातील बहुतांश भागाला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला. त्यामुळे आता सर्वांना पावसाची आस लागली आहे. दरवर्षी सर्वसाधारणपणे 7 जूनला महाराष्ट्रात येणारा मान्सूनचा पाऊस यंदा 5 जूनला राज्यात दाखल होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यात यंदा समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचाही अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यताय.

हे पण वाचा:- ‘या’ जिल्ह्यातील 470 कोटी रुपयांची कर्जमाफी, कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला लाभ?

कुठे कुठे पावसाची हजेरी?

रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्यात. दक्षिण आणि उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या दमदार सरी बरसल्याचं बघायला मिळालं. रत्नागिरी जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरु होती. अखेरच्या टप्प्यातील आंब्याचं मोठे नुकसान मान्सूनपूर्व सरींनी होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय.

संदर्भ:- tv9 marathi