Havaman andaj : ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसासह गारपिटीचा अंदाज

Havaman andaj : ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसासह गारपिटीचा अंदाज

 

उन्हाचा चटका असह्य होत असतानाच पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यांत विजा, मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली असून, तुरळक ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला आहे. आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कोकणापासून चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा आणि अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्र, गुजरातमध्ये पावसाची शक्यता असून, आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, सोमवारी (ता. ७) सायंकाळनंतर उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीट व वादळी पावसाने हजेरी लावली. मंगळवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे उच्चांकी ३७.४ सेल्सिअस तापमान नोंदले गेले. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. बहुतांश ठिकाणी सातत्याने ३३ ते ३७ अंशापेक्षा अधिक तापमान असल्याने उन्हाची ताप आणि उकाडा कायम आहे.

मंगळवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

पुणे ३४.६, नगर ३७.४, धुळे ३५.५, जळगाव ३५.६, कोल्हापूर ३३.५, महाबळेश्‍वर २८.१, मालेगाव ३५.६, नाशिक ३४, निफाड ३१.४, सांगली ३५.२, सातारा ३३.९, सोलापूर ३५.६, सांताक्रूझ ३३.७, डहाणू ३०.५, रत्नागिरी ३५, औरंगाबाद ३३.१, नांदेड ३४.६, परभणी ३४.७, अकोला ३६.१, अमरावती ३५, बुलडाणा ३५.४, ब्रह्मपुरी ३६.९, गडचिरोली ३५.४, गोंदिया ३४.५, नागपूर ३५.१, वर्धा ३५.५, यवतमाळ ३५.

वादळी पाऊस व गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

  • मध्य महाराष्ट्र : धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव.
  • मराठवाडा : औरंगाबाद, जालना.

विजा, मेघगर्जनांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

  • कोकण : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
  • मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर.
  • मराठवाडा : बीड, परभणी, हिंगोली, नांदेड
  • विदर्भ : बुलडाणा, अमरावती.

source:- ऍग्रोवन

Leave a Comment