Mansoon 2022: मॉन्सूनची वाटचाल पुन्हा सुरू

Mansoon 2022 मॉन्सूनची वाटचाल पुन्हा सुरू

 

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची  मंदावलेली वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे. अरबी समुद्रात  दाखल झाल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी गुरूवारी (ता. २६) मॉन्सूनने पुढे चाल केली आहे. श्रीलंकेच्या  निम्म्या भागासह, अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सूनने प्रगती केली आहे.

यंदा अंदमानात मॉन्सून यंदा वेळेआधी दाखल झाला. १६ मे रोजी अंदमानात आगमन झालेल्या मॉन्सूनने वेगाने वाटचाल करत ता. १८ मे रोजी संपुर्ण अंदमान-निकोबार बेटसमुह व्यापला. तर २० मे रोजी पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातूनही मॉन्सूनने वाटचाल सुरू केली. मात्र त्यानंतर मॉन्सून वाऱ्यांची पुढील प्रगती मंदावली होती.

गुरूवारी (ता.२६) मॉन्सूनने पुन्हा वाटचाल केली असून, श्रीलंका देशाच्या निम्म्या भाग मॉन्सूनने व्यापला आहे. तसेच नैर्ऋत्य व अग्नेय अरबी समुद्र, मालदीवचा आणखी काही भाग, भारताच्या दक्षिणेकडील आणि श्रीलंकेच्या पश्चिमेकडील कोमोरिन भाग, तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सूनने प्रगती केली आहे.

मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने शनिवारपर्यंत (ता. २८) दक्षिण अरबी समुद्र, संपुर्ण मालदीव, लक्षद्वीप बेटे आणि कोमोरीन समुद्राच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच मॉन्सूनच्या केरळातील आगमनाचेही हवामान विभागाकडून निरीक्षण सुरू आहे.

हे पण वाचा:- Chickpea Crop : नाफेडने अचानक मुदतीपूर्वीच खरेदी केंद्र बंद केले

केरळातील आगमनाचा मुहूर्त टळणार

यंदा मॉन्सून २७ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने यापुर्वीच वर्तविली होती. केरळातील आगमनात चार दिवसाची तफावत होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली होेती. मॉन्सूनचे केरळातील आगमन आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे. केरळातील आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.