Monsoon Update : मान्सूनची केरळात धडक, अल्पावधीतच महाराष्ट्रातही आगमन..!
वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची होणारी लाहीलाही…कडाक्याच्या उन्हामुळे तापलेल्या धरणी मायला आता दिलासा मिळणार आहे. कारण ज्या मान्सूनची प्रतिक्षा देशभरातील प्रत्येक नागरिकाला आहे तो मान्सून अखेर केरळात दाखल झाला आहे. मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण झाले आहे. केरळातील पर्जन्यमापकांची तपासणी केल्यानंतर हवामान विभाग या निकषावर पोहचला असून केरळात मान्सूनचे आगमन झाले आहे. दरवर्षी 1 जूनला आगमन होत असते. यंदा मात्र, लवकर आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. अखेर तो अंदाज खरा ठरला असून मान्सून रविवारी केरळात दाखल झाला आहे. असेच पोषक वातावरण राहिले तर 7 ते 8 जून पर्यंत हा पाऊस महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
आठवड्याभरात महाराष्ट्रात
मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण झाले असून हंगामाच्या सुरवातीलाच समाधानकारक पाऊस बरसणार असल्याचे सांगितले जात आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील 6 ते 7 दिवसांमध्ये त्याचे तळकोकणात आणि महाराष्ट्रात आगमन होईल असा अंदाज आहे. त्यामुळे यंदा सर्वकाही वेळेवर होणार असल्याचे संकेत आहेत. यंदा वेळेपूर्वीच मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला जात होता. त्याच प्रमाणे मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात केरळात मान्सून पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे आता 8 जूनपर्यंत तो महाराष्ट्रात सक्रीय होईल यामध्ये शंका नाही.
आगमनानंतर वेग मंदावणार
मान्सूनचे आगमन तर आता झाले आहे. मात्र, यानंतर आता हवेचा वेग मंदावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आगमन जरी दणक्यात झाले असले तरी हाच वेग आणि वाऱ्याने जोर कायम राहिला तर मात्र, महाराष्ट्रातही वेळेपूर्वीच मान्सून दाखल होईल. पुढील दोन आठवडे जर मान्सूचा वेग कमी राहू शकतो, असं देखील हवामान विभागानं सांगितलं आहे. मात्र, मान्सूनचा वेग कायम राहिल्यास मान्सून तळकोकणात 4 ते 5 जूनपर्यंत पोहोचू शकतो.
हे पण वाचा : बियाणांचा पुरवठा बाबत कृषी विभागाचा दिलासा, खतांबाबत मात्र सावध पवित्रा
खरिपासाठी पोषक वातावरण
हवामान विभागाने अंदाज जरी वर्तवला तरी शेतकरी हा कामाला लागला आहे. खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे ही पूर्ण झाली आहेत. आता मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली तर वेळीच पेरण्या होतील. यंदा खरिपाच्या दृष्टीने सर्वाकाही वेळेवर उत्पादनात देखील वाढ होणार आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाचा सर्वच गोष्टींवर परिणाम होणार आहे. हवामाव विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुसार आतापर्यंतच्या घटना घडल्या आहेत आता पावसाने हजेरी लावली की शेतकरी ही चाढ्यावर मूठ ठेऊन खरिपाचा पेरा करावा लागणार आहे.
source : tv9marathi