Monsoon Update 2022 : राज्यात मान्सून ला सुरुवात १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट कुठे रिमझिम कुठे मुसळधार? वाचा सविस्तर

Monsoon Update 2022 : राज्यात मान्सून ला सुरुवात १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट कुठे रिमझिम कुठे मुसळधार? वाचा सविस्तर

 

मान्सून महाराष्ट्रात सक्रीय झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत असले तरी पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळेच अनेक भागात अजून शेती मशागतीसाठी आवश्यक असलेला पाऊसही झालेला नाही. मात्र, जून महिन्याच्या अंतिम टप्प्यात पावसाचे स्वरुप बदलत असल्याचे संकेत हवामान विभागाकडून दिले जात आहेत. शनिवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे तर दक्षिण कोकणात तर सोमवारपासून अति मुसळधार पाऊस बरसणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातून महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून आता गुजरातकडे आगेकूच करीत आहे.

या जिल्ह्यांना आहे ‘यलो अलर्ट’

हंगामाच्या सुरवातीपासूनच मान्सूने निराशा केलेली आहे. आतापर्यंतच्या तीन आठवड्यात मान्सून सक्रीय झाला पण बरसलाच नाही अशी स्थिती आहे. पण शनिवारपासू वातावरणासह पावसामध्येही बदल होणार असल्याचे संकेत आहे. त्यामुळेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट तर सिंधुदुर्गला 18 ते 21 जून आणि रत्नागिरीला 20 ते 21 जून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्याला मिळणार का दिलासा?

राज्यात मान्सून सक्रीय झाल्याचा दावा हवामान विभागाकडून केला जात असला तरी मराठवाडा अजूनही कोरडाठाक आहे. उलट ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. विभागातील अनेक जिल्ह्यात अजून पावसाला सुरवात देखील झालेली नाही. पण आता चित्र बदलणार असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारपासून मराठवाडा, विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस बरणार आहे. त्यामुळे वातावरणात बदल होऊन खरीप पेरण्या मार्गी लागतील अशी आशा आहे.

हे पण वाचा : कोणी पीक कर्ज देतं का? राज्य सरकारचे आदेश डावलत बॅंकांचा तोरा कायम..!

कोकणामध्ये अति मुसळधार बरसणार

मान्सूनचे राज्यात आगमन झाल्यापासून थोड्याबहुत प्रमाणात कोकणालाच दिलासा मिळाला आहे. त्यानंतर मुंबई आणि उपनगरात बरसलेल्या पावसाने उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही आगमन केले आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर कायम अवकृपा राहिलेली आहे. आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाने हजेरी लावली तर रखडलेली शेतीकामे वेगात होणार आहेत. 18 जूननंतर मराठवाडा, विदर्भ मध्यम ते जोरधार तर कोकणात अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

source: tv9marathi