Monsoon Update : कोकण आणि उत्तर महाराष्ट्रावरच मान्सूनची कृपा; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

Monsoon Update : कोकण आणि उत्तर महाराष्ट्रावरच मान्सूनची कृपा; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

 

महाराष्ट्रातच नव्हे तर देशात मान्सूनची मनमौज सुरु आहे. कारण पावसाचे आगमन होऊन महिना होत आला तरी देशातील 9 राज्यांमध्ये अद्यापर्यंत प्रवेशच झाला नाही. त्यामुळे मान्सूनचा लहरीपणा काय असतो याची प्रचिती देश अनुभवत आहेत. महाराष्ट्रात देखील कोकण आणि उत्तर महाराष्ट्राचा काही वगळता राज्यात पाऊस आला काय आणि नाही काय अशी स्थिती आहे. हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे आतापर्यंत संपूर्ण देशात पाऊस हा सक्रीय व्हायला पाहिजे मात्र, 9 राज्यात अजून प्रवेशच झाला नसल्याने त्याच्या लहरीपणाचा परिणाम जलसाठे आणि खरीप हंगामावर होणार असल्याचे सांगितले जात आहे. असे असाताना पुन्हा कोकण आणि उत्तर महाराष्ट्रावर कृपादृष्टी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकणात यलो अलर्ट, उत्तर महाराष्ट्रात मध्यम पाऊस

राज्यात आतार्यंत सर्वाधिक पाऊस हा कोकण विभागात बरसलेला आहे. ज्या भागातून राज्यात आगमन झाले त्याच विभागात मान्सूनने कृपादृष्टी दाखवलेली आहे. त्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगावसह इतर भागात पावसाने हजेरी लावल्याने आता कुठे खरीप पेरण्यांना सुरवात झाली आहे. असे असतानाही अजून कोकणावर मान्सून मेहरबान असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पाच दिवसांमध्ये राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून उत्तर कोकण,मध्य महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

किनारपट्टीलगत मुसळधार पाऊस

कोकणातील पावसामध्ये सातत्य राहणार आहे. त्याचबरोबर गोव्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात सरासरीप्रमाणे पावसाने हजेरी लावलेली असली तरी उर्वरित राज्यात मात्र मान्सूनने निराशा केली आहे. कारण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे पेरण्या सोडा खरीपपूर्व कामेही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे भविष्यात केव्हा पेरण्या होतील याबाबत शेतकरीही अनभिज्ञ आहेत. असे असतानाही आगामी चार दिवस मराठवाड्यातील शेतकऱ्यांची निराशा होणार आहे.

हे वाचा : सोयाबीनचे दरही घसरले, घटत्या दरावर नेमका परिणाम कशाचा ?

30 जूनपर्यंत देशभर मान्सूनची व्याप्ती

मान्सूनचे आगमन होऊन महिना होत आला तरी देशातील 9 राज्यांमध्ये पावसाने प्रवेशच केलेला नाही. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र, 30 जूनपर्यंत देशभर पाऊस हजेरी लावेल असा आशावाद आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या काही भागांमध्ये पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी मान्सूनची कशी वाटचाल राहते यावरच खरीप हंगामाचे भवितव्य आहे.

source: tv9marathi