Monsoon Update : जुलैत महिन्यात राहणार समाधानकारक पाऊस; पाहा हवामान विभागाचा अंदाज

Monsoon Update : जुलैत महिन्यात राहणार समाधानकारक पाऊस; पाहा हवामान विभागाचा अंदाज

 

पावसाच्या दृष्टीने जूनपेक्षा जुलै अधिक समाधानकारक ठरण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या पूर्वानुमानावरून निर्माण झाली आहे. उत्तर भारत, मध्य भारत आणि दक्षिण भारताच्या बहुतांश भागात जुलैमध्ये सरासरी किंवा सरासरीहून अधिक पाऊस पडण्याचे अनुमान आहे. पूर्ण देशामध्ये दीर्घकालीन सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के पावसाची शक्यता आहे. १९७१ ते २०२० या कालावधीतील सरासरीनुसार देशात जुलैमध्ये २८० मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद होते.

२९ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार मध्य भारतात पर्जन्यमानात ३३ टक्के तूट होती. दक्षिण भारतात १४ तर, वायव्य भारतात २० टक्के आणि पूर्व तसेच ईशान्य भारतात २१ टक्के तूट होती. देशभरात सरासरीहून १० टक्के कमी पाऊस होता. मात्र जुलैमध्ये मध्य भारतातील स्थिती सुधारेल असे अनुमान आहे. पूर्व आणि ईशान्य भारतात तसेच मध्य भारताच्या लगतच्या भागांमध्ये, दक्षिण भारताच्या पश्चिम क्षेत्रामध्ये पाऊस सरासरी किंवा त्याहून कमी असण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा:- Shettale Anudan : शेततळ्यासाठी 75 हजाराचे अनुदान, ‘या’ सरकारनेच अनुदनावर केला शिक्कामोर्तब..!

या कालावधीमध्ये प्रशांत महासागर विषुववृत्तीय क्षेत्रामध्ये ला निना स्थिती कायम राहण्याचीही शक्यता आहे. जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये नकारात्मक इंडियन ओशन डायपोलचा संभव आहे. हा घटक भारतातील पावसावर परिणाम करत असल्याने पावसामध्ये खंड पडू शकतो. या पार्श्वभूमीवर समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानावरही नजर ठेवली जात आहे.

जुलैमध्ये विदर्भाचा काही भाग वगळता बहुतांश महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पाऊस होईल, असे अनुमान वर्तवण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांमध्ये तसेच रायगड, ठाणे, मुंबई क्षेत्रामध्ये सरासरीइतका पाऊस पडू शकेल, असे पूर्वानुमानानुसार स्पष्ट होत आहे.

हे पण वाचा:- Dap fertilizer : शेतकरी मित्रांनो डीएपी बद्दल नो टेन्शन,रशिया बनला सर्वात मोठा खतपुरवठादार

अधिक तापमानाची शक्यता

देशाच्या बहुतांश भागामध्ये चालू महिन्यात सरासरी किंवा त्याहून अधिक कमाल तापमान असेल. किमान तापमानाही बहुतांश भागामध्ये सरासरी किंवा त्याहून अधिक असेल. पश्चिम भारत, ईशान्य भारत आणि दक्षिण भारताच्या टोकाच्या भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

source:- महाराष्ट्र टाइम्स